मला कोर्टात मेलोड्रामा नकोय..; मुलीची फी न भरल्याचा दावा करणाऱ्या करिश्माला न्यायाधीशांनी सुनावलं
संजय कपूरच्या 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरू आहे. यावेळी करिश्मा कपूरने मुलीच्या शाळेची फी न भरल्याचा दावा केला. त्यावर न्यायाधीशांनी तिला सुनावलं की, मला कोर्टात मेलोड्रामा नकोय.

अभिनेत्री करिश्मा कपूरचा पूर्व पती आणि दिवंगत बिझनेसमन संजय कपूरच्या संपत्तीचा वाद दिल्ली उच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. करिश्माच्या मुलांकडून कोर्टात संजय कपूरची पत्नी प्रिया सचदेवकपूरविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान करिश्माच्या मुलांच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की गेल्या दोन महिन्यांपासून समायराच्या (करिश्मा आणि संजय यांची मोठी मुलगी) शाळेची फी भरलेली नाही. करिश्माच्या मुलांची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील महेश जेठमलानी यांनी दिल्ली उच्च न्यायालयात सांगितलं, “घटस्फोटानंतर कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार संजयने मुलांचा खर्च भागवायचा होता. मुलांची मालमत्ता आता प्रिया कपूरकडे आहे आणि त्यामुळे सगळं तिच्यावर अवलंबून आहे.”
वकिलांची बाजू ऐकल्यानंतर न्यायमूर्ती ज्योती सिंह यांनी टिप्पणी केली, “मला या सुनावणीत मेलोड्रामा नकोय.” करिश्माची मुलगी समायरा अमेरिकेत शिक्षण घेते. तिची दोन महिन्यांची फी भरली गेली नाही, असा दावा जेठमलानी यांनी केला. त्यानंतर प्रिया कपूरची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील राजीव नायर यांनी या दाव्याला आव्हान दिलं. मुलांचा सर्व खर्च पूर्ण करण्यात आला आहे, फक्त बातम्यांसाठी असं म्हटलं जात असल्याचं ते म्हणाले. त्यावर न्यायमूर्ती सिंह यांनी प्रिया कपूरचं प्रतिनिधित्व करणारे वरिष्ठ वकील शैल त्रेहान यांना असे मुद्दे पुन्हा न्यायालयात येऊ नयेत याची खात्री करण्यास सांगितलं. “मला यावर 30 सेकंदांपेक्षा अधिक वेळ घालवायचा नाही. हा प्रश्न माझ्या न्यायालयात पुन्हा येऊ नये. मला ही सुनावणी मेलोड्रॅमिक नको आहे”, असा इशाराच न्यायमूर्तींनी दिला.
नेमकं काय आहे प्रकरण?
वडील संजय कपूरच्या मृत्यूपत्राची बनावट कॉपी तयार करून प्रिया कपूरने संपूर्ण मालमत्तेवर नियंत्रण मिळवल्याचा आरोप करिश्माच्या मुलांनी त्यांच्या याचिकेत केला आहे. जून महिन्यात लंडनमध्ये पोलो खेळताना संजय कपूरचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं होतं. त्याच्या निधनानंतर जवळपास 30 हजार कोटी रुपयांच्या मालमत्तेच्या वाटणीवरून कोर्टात वाद सुरू आहे.
