घटस्फोटाच्या 5 महिन्यांनंतर धनश्री वर्माचा मोठा खुलासा; मी अजूनही चहलशी..
युजवेंद्र चहलची पूर्व पत्नी धनश्री वर्मा नुकतीच फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये झळकली होती. यावेळी ती घटस्फोटानंतर चहलसोबत नातं कसं आहे, याविषयीचा खुलासा केला. त्याचप्रमाणे लोकांच्या टीकेमुळे दुखावल्याची भावनाही तिने व्यक्त केली.

क्रिकेटर युजवेंद्र चहलची पूर्व पत्नी आणि कोरिओग्राफर-डान्सर धनश्री वर्मा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. घटस्फोटाच्या जवळपास पाच महिन्यांनंतर ती विविध मुलाखतींमध्ये चहलबद्दल मोकळेपणे बोलताना दिसतेय. घटस्फोटानंतर आता त्या दोघांचं नातं कसं आहे, याविषयीही तिने खुलासा केला आहे. कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक फराह खानच्या युट्यूब व्लॉगमध्ये धनश्री प्रमुख पाहुणे म्हणून झळकली होती. धनश्री आणि युजवेंद्र यांनी 2020 मध्ये लग्न केलं होतं. लग्नाच्या पाच वर्षांतच त्यांनी घटस्फोट घेतला. घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान आणि त्यानंतरही दोघांमध्ये कटुता स्पष्ट दिसून आली.
घटस्फोटानंतर चहलसोबतचं नातं कसं आहे, याविषयी बोलताना धनश्रीने सांगितलं, “आम्ही दोघांनी सर्व गोष्टींचा स्वीकार केला असून आपापल्या आयुष्यात पुढे गेलो आहोत. आपापल्या आयुष्यात आम्ही खुश राहावं अशी दोघांची इच्छा आहे. मी मेसेजद्वारे युजीच्या संपर्कात आहे. तो मला ‘माँ’ म्हणायचा, तो प्रेमळ आहे.” घटस्फोटाच्या शेवटच्या सुनावणीदरम्यान चहलच्या टी-शर्टवरील मजकुराने सर्वांचं लक्ष वेधलं होतं. ‘Be Your Own Sugar Daddy’ असा मजकूर त्यावर लिहिला होता. त्यावरून धनश्रीने केवळ पैशांसाठी चहलशी लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.
फराह खानशी बोलताना धनश्री लग्नानंतरच्या तिच्या आयुष्याविषयीही व्यक्त झाली. “करिअर आणि खासगी आयुष्य या दोन्ही गोष्टींमध्ये समतोल साधणं सोपं नाही. मला सतत प्रवास करावा लागत असल्याने बऱ्याच गोष्टी कठीण होत्या. मला गुरुग्रामला जावं लागत होतं, त्यानंतर पुन्हा मुंबईला यायचं आणि सर्व सामान घेऊन पुन्हा प्रवास करायचा.. हे सर्व सोपं नव्हतं. पण माझ्या आईने मला शिकवलं होतं की मला हे सर्व करावं लागणार आहे. मला माहितीये मी माझे 100 टक्के दिले आहेत”, असं ती म्हणाली. घटस्फोटामुळे माझ्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला, परंतु लोकांच्या टीकेमुळे माझ्या मनावर फार आघात झाला, असंही ती म्हणाली. परंतु चहलसोबत आता सर्व काही मतभेद दूर झाल्याचं तिने स्पष्ट केलं.
मार्च महिन्यात धनश्री आणि चहल अधिकृतरित्या विभक्त झाले. परंतु त्यांनी त्यामागचं कारण सांगितलं नव्हतं. या दोघांमध्ये नेमकं कोणत्या कारणावरून भांडण सुरू झालं होतं, याबाबत जेष्ठ पत्रकार विक्की लालवानी यांचा रिपोर्ट चर्चेत आला होता. या रिपोर्टमध्ये त्यांनी म्हटलं होतं की चहल आणि धनश्री यांच्यात कुठे राहायचं यावरून वाद होता. लग्नानंतर दोघं चहलच्या आईवडिलांसोबत हरियाणामध्ये राहत होते. परंतु काही वेळानंतर धनश्रीने मुंबईत राहण्याची इच्छा व्यक्त केली होती. हे चहलला मात्र मंजूर नव्हतं.
