
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं नुकतंच निधन झालं. त्यांच्या जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून फक्त कुटुंबियच नव्ह तर चाहतेही शोकाकूल आहे. धर्मेंद्र यांचे चित्रपट, व्यावसायिक आयुष्य जितकं चर्चेत असायचं तितकीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही लोकांना उत्सुकता असायची. पहिली पत्नी आणि मुल असतानाही ते हेमा मालिनी यांच्या प्रेमात पडले, त्यांच्याशी लग्नही केलं. ईशा आणि आहना अशा दोन मुलीही त्यांना झाल्या. पण हेमामालिनी (Hema Malini) आणि धर्मेंद्र (Dharmendra) याचं लग्न, संसार एवढा सोप्पा नव्हता. प्रकाश कौर यांच्याशी आधीच लग्न झालेल्या धर्मेंद्र यांना 4 मुलं होती. लग्नापूर्वी हेमा मालिनी या एकदा प्रकाश कौर यांना भेटल्या होत्या, मात्र धर्मेंद्र यांच्याशी लग्न झाल्यावर मात्र त्यांनी प्रकाश कौर यांच्याशी अंतर राखलं.
हेमा मालिनी या त्यांच्या घरात मुली, ईशा-आहना यांच्यासोबतच रहायच्या. धर्मेंद्र हे कधीकधी त्यांना भेटायला यायचे. एवढंच नव्हे तर धर्मेंद्र यांची आई, सतवंत कौर या देखीलएकदा हेमा मालिनी यांना भेटायला आल्या होत्या.
हेमा मालिनी यांनी सांगितला तो किस्सा
Hema Malini: Beyond The Dream Girl या आपल्या बायोग्राफीमध्ये हेमा मालिनी यांन याबद्दल सांगितलं होतं. धर्मेंद्र यांची आई मला खूप प्रेमाने भेटल्या. ‘धरम जी यांची आई खूप प्रेम करणार स्त्री होती. एकदा त्या मला माझ्या भेटण्यासाठी जुहू येथील डबिंग स्टुडिओमध्ये आल्या होत्या, मी ईशाच्या वेळी गरोदर होते. पण त्यांनी घरी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी त्यांना नमस्कार करायला वाकले, तेव्हा त्यांनी माझी गळाभेट घेतली आणि म्हणाल्या – मुली, आनंदी रहा. त्या मला पाहून खुश झाल्या हे पाहून मलाही आनंद झाला’ असं हेमा मालिनी यांनी नमूद केलं.
धर्मेंद्र यांच्या वडिलांनाही होतं ममत्व
धर्मेंद्र यांची आईच नव्हे तर त्यांचे वडील केवल किशन सिंह देओल हे देखील अनेकवेळा हेमा मालिनी यांना भेटायचे. तेव्हा भेट्यावर हस्तांदोलन करण्याऐवजी ते तिच्याशी आर्म रेस्टलिंग (पंजा लढवणं) करायचे. खरी ताकद ही दुथा-तुपाने मिळते, इडली-सांबारने नव्हे, असंही ते जिंकल्यावर मजेत म्हणायचे .
प्रकाश कौर यांच्यापासून दूर राहिल्या हेमामालिनी
हेमा मालिनी म्हणाल्या, “मला कोणालाही नाराज करायचे नव्हते, म्हणून मी प्रकाश कौर यांच्यापासून दूर राहिले. मी त्यांच्याशी कधीही बोलले नाही, पण मी आणि माझ्या मुली त्यांचा आदर करतो. धरमजी यांनी माझ्यासाठी आणि माझ्या मुलींसाठी सगळं काही केले. मी माझी कला आणि संस्कृती जोपासत राहिले, ज्यामुळे माझा सन्मान अबाधित राहिला.” असंही त्यांनी नमूद केलं.
पुढे हेमा मालिनी म्हणाल्या: “ नवऱ्याने वेगळ्या घरात राहावे असं कोणालाही वाटत नाही, पण कधीकधी परिस्थिती अशी असते. पती-पत्नी आणि मुलांनी एकत्र रहावं असं प्रत्येक महिलेला वाटतं, पण माझं आयुष्य थोडं वेगळं होतं, मी दु:खी नाही. मी माझ्या दोन्ही मुलींचं नीट पालन केलंय” असंही त्या म्हणाल्या.
प्रकाश कौर यांची प्रतिक्रिया
धर्मेंद्र यांच्या पहिल्या पत्नी प्रकाश कौर एकदा म्हणाल्या होत्या की, “लोक माझ्या पतीला ‘womaniser’ का म्हणतात? अर्धी इंडस्ट्री असंच करते. हेमासारख्या महिलेला कोण नाही म्हणेल? प्रत्येक पुरूषाला ती आवडेल. ते (धर्मेंद्र) सर्वोत्तम पिता आहेत. ते त्याच्या मुलांवर खूप प्रेम करतात” असंही त्यांनी नमदू केलं.
पण हेमा मालिनी यांनी जे केलं त्यावर त्यांची सहमती नव्हती. ‘ हेमा हिला काय झेलावं लागतंय हे मी समजू शकते, पण जर मी हेमा मालिनी हिच्या जागी असते तर मी असं कधीच केलं नसतं. एक स्त्री म्हणून मी तिच्या भावना समजू शकते, रण एक पत्नी आणि आई म्हणून मला हे योग्य वाटत नाही’ असं त्यांनी नमूद केलं होतं.