Dhurandhar : अक्षय खन्नाला प्रसिद्धी मिळताच कोणाच्या पोटात दुखलं? म्हणाला “हा रणवीरवर अन्याय..”
'धुरंधर' या चित्रपटातील रेहमान डकैतच्या भूमिकेमुळे अभिनेता अक्षय खन्ना सध्या यशाच्या शिखरावर आहे. थिएटरपासून सोशल मीडियापर्यंत सर्वत्र त्याचीच चर्चा सुरू आहे. परंतु यामुळे रणवीर सिंहसोबत अन्याय झाल्याची भावना धुरंधरमधल्याच एका अभिनेत्याने व्यक्त केली आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट मल्टिस्टारर असूनही त्यातल्या प्रत्येक भूमिकेनं आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर विशेष छाप सोडली आहे. त्यातही रेहमान डकैतची भूमिका साकारलेला अभिनेता अक्षय खन्ना आणि हमजाच्या भूमिकेतील रणवीर सिंह यांचा एक वेगळाच चाहतावर्ग निर्माण झाला आहे. परंतु अक्षयइतकंच दमदार काम रणवीरने करूनही अक्षयचीच सर्वाधिक चर्चा होत असल्याचं मत काहींनी मांडलं आहे. यामध्ये ‘धुरंधर’ फेम अभिनेत्याचाही समावेश आहे. अक्षय खन्नाला जितकी प्रसिद्धी मिळतेय, त्यामुळे कुठेतरी रणवीरवर अन्याय होत असल्याची भावना त्याने व्यक्त केली आहे. हा अभिनेता दुसरा-तिसरा कोणी नसून ‘धुरंधर’मध्ये डोंगाची भूमिका साकारलेला नवीन कौशिक आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नवीन रणवीर आणि अक्षय या दोघांविषयी मोकळेपणे व्यक्त झाला. “सेटवर रणवीर सिंह आमच्याशी अगदी मित्रासारखा वागायचा. परंतु अक्षय थोडंसं अंतर राखूनच होता. याचं मुख्य कारण म्हणजे तो त्याच्या व्यक्तिरेखेत खूप गुंतलेला होता. सेटवर सगळी गँग एकत्र बसायची. आम्ही हसायचो, मजामस्ती करायचो. पण अक्षय आमच्यापासून दूरच बसायचा. संपूर्ण शूटिंगदरम्यान असंच चित्र होतं. त्याच्याशी आम्ही बोलायला गेलो तर तो छान बोलायचा. पण बोलणं संपल्यावर पुन्हा त्याच्या झोनमध्ये परत जायचा. ते शांत राहून सर्वकाही निरीक्षण करत होता”, असं त्याने सांगितलं.
रणवीरबद्दल तो पुढे म्हणाला, “रणवीर त्याच्या हमजाच्या भूमिकेपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. त्याच्यात भरपूर ऊर्जा आहे. सेटवर आल्यावर तो सर्वांना भेटायचा. त्याला रिकामं बसायला आवडत नाही. दिग्दर्शकाने कट म्हणताच तो भूमिकेतून बाहेर पडायचा आणि लहान मुलासारखी मस्ती करायचा. आपण मोठे स्टार आहोत, याचा अजिबात अहंकार त्याच्यात नव्हता.”
“मला असं वाटतं की एकंदरीत रणवीरवर अन्याय झाला आहे. अक्षय सरांनी वर्षानुवर्षे लक्षात राहणारी व्यक्तिरेखा साकारली आहे, यात काही शंका नाही. पण रणवीरनेही खूप छान काम केलं आहे. आवाज बदलण्यापासून ते हमजाची भूमिका साकारण्यासाठी त्याची ऊर्जा बाजूला सारण्यापर्यंत.. त्याचं काम खूप कठीण होतं. रणवीरची व्यक्तिरेखा जाणूनबुजून कमी दाखवण्यात आली आहे. त्याला त्याच्यावरच फोकस नको होता. जर रणवीरमध्ये अहंकार असता तर तो सहजपणे स्वत:कडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करू शकला असता. पण त्याने तसं केलं नाही. एखादा असुरक्षित अभिनेताच असं करू शकतो. रणवीरने मात्र दुसऱ्यांना चमकण्याची संधी दिली”, असं मत नवीनने मांडलं आहे.
