‘धुरंधर’च्या सेटवर अक्षयच्या वागणुकीबद्दल अभिनेत्याचा खुलासा; बोलून झाल्यावर तो..
'धुरंधर' या चित्रपटात रेहमान डकैतची भूमिका साकारून अभिनेता अक्षय खन्ना सर्वाधिक चर्चेत आला आहे. परंतु त्याचसोबत त्याच्या स्वभावाचीही चर्चा होत आहे. आता या चित्रपटातील एका अभिनेत्याने सेटवर अक्षय कसा वागायचा, याविषयीचा खुलासा केला आहे.

आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा चित्रपट प्रदर्शित होऊन जवळपास महिना होत आला असला तरी बॉक्स ऑफिस आणि सोशल मीडियावर त्याचीच क्रेझ पहायला मिळतेय. या चित्रपटात अक्षय खन्नाने रेहमान डकैतची तर रणवीर सिंहने हमजाची भूमिका साकारली आहे. या दोघांच्या दमदार अभिनयकौशल्याचं कौतुक होत आहे. त्यातही अक्षय त्याच्या स्वभावामुळे सोशल मीडियावर विशेष चर्चेत आला आहे. ‘धुरंधर’च्या सेटवर तो कसा वागायचा, याविषयीचा खुलासा चित्रपटातील एका अभिनेत्याने केला आहे. या अभिनेत्याचं नाव आहे नवीन कौशिक. नवीनने या चित्रपटात डोंगाची भूमिका साकारली आहे. सेटवर अक्षय आणि रणवीर कसे वागायचे, याबद्दल तो मोकळेपणे व्यक्त झाला आहे.
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत नवीन म्हणाला, “सेटवर रणवीर नेहमी आमच्यासोबत मित्रासारखा वागायचा. पण अक्षय खन्ना थोडा वेगळा राहत होता. कारण तो त्याच्या भूमिकेत पूर्णपणे बुडाला होता. मजेशीर बाब म्हणजे चित्रपटात त्यांचं जे ऑनस्क्रीन नातं दाखवलं होतं, तेच खऱ्या आयुष्यातही पहायला मिळत होतं. संपूर्ण गँग एकत्र बसून हसत, मस्करी करत. तर रेहमान डकैतची भूमिका साकारणारा अक्षय थोडा वेगळा एकटाच बसायचा. संपूर्ण शूटिंगदरम्यान असंच होतं.”
सेटवर अक्षय खन्नाशी बोलायला किंवा भेटायला मिळणं हे सर्वांत कठीण होतं, अशीही अफवा होती. परंतु ही अफवा खोटी असल्याचं नवीनने स्पष्ट केलं. “अक्षयशी आम्ही बोलायला जायचो, तेव्हा तो अत्यंत प्रेमाने आणि उत्साहाने आमच्याशी बोलायचा. पण बोलणं संपल्यानंतर तो पुन्हा त्याच्या जागेवर बसायचा आणि आम्ही आमच्या जागेवर जायचो. तो त्यावेळी मेथड अॅक्टिंग करत होता की नाही माहीत नाही. परंतु जसा रेहमान डकैत गप्प राहायचा, सर्वांचं निरीक्षण करायचा आणि कधीही अनपेक्षितपणे वागायचा, तसाच अक्षय खन्ना खऱ्या आयुष्यातही होता. तो सेटच्या गोंगाटापासून दूर राहायचा आणि फक्त त्याच्या भूमिकेवर लक्ष केंद्रीत करायचा”, असं तो म्हणाला.
नवीन कौशिकने यादरम्यान रणवीर सिंहच्या स्वभावाविषयीही सांगितलं. तो म्हणाला, “रणवीरने त्याच्या खऱ्या आयुष्याच्या एकदम विरुद्ध अशी भूमिका साकारली आहे, जे अजिबात सोपं नव्हतं. हमजा आणि रणवीर पूर्णपणे वेगवेगळे आहेत. रणवीर तर ऊर्जेचा पॉवरहाऊस आहे, एखाद्या हजार वोल्टच्या वीजेसारखा. सेटवर येताच सर्वांना हॅलो-हाय म्हणायचा. दिग्दर्शक जेव्हा कट बोलायचा, तेव्हा रणवीर लगेच त्याच्या मूळ स्वभावात परत यायचा. मी खूप मोठा स्टार आहे, असा माज त्याने कधीच दाखवला नाही.”
