Dashavatar : ‘दशावतार’ची ऑस्कर झेप! 150 चित्रपटांमध्ये निवड; मराठी चित्रपटाची ऐतिहासिक कामगिरी
'दशावतार' या मराठी चित्रपटाची अत्यंत प्रतिष्ठित ऑस्कर पुरस्काराच्या मुख्य स्पर्धेत निवड झाली आहे. दिलीप प्रभावळकर यांच्या या चित्रपटाने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. यानिमित्त दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
दिलीप प्रभावळकर, प्रियदर्शिनी इंदलकर, सिद्धार्थ मेनन, महेश मांजरेकर यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘दशावतार’ या मराठी चित्रपटाने ऑस्कर झेप घेतली आहे. आगामी ऑस्कर पुरस्कारांसाठीच्या कंटेन्शन लिस्टमध्ये या चित्रपटाची अधिकृतपणे निवड झाली आहे. ऑस्कर कंटेन्शन लिस्ट ही जगभरातून सादर केलेल्या 2000 हून अधिक चित्रपटांमधून तयार केली जाते. त्यापैकी 150 ते 250 चित्रपट श्रेणींमध्ये निवडले जातात. या यादीत स्थान मिळवणं हे ऑस्कर पुरस्कारासाठीच्या मूल्यांकन प्रक्रियेतील पहिलं औपचारिक पाऊल आहे. त्यामुळे ‘दशावतार’ हा आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेच्या चित्रपटांसोबत थेट स्पर्धेत उतरला आहे. या चित्रपटाने ऑस्कर श्रेणीत निवडला जाणारा पहिला मराठी चित्रपट बनवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे.
‘दशावतार’ हा ऑस्करच्या स्क्रीनर रुमवर प्रदर्शित होणारा पहिला मराठी चित्रपट बनला आहे. तिथे अकादमीचे सदस्य त्याचं मूल्यांकन करतील आणि त्यावरून मतदान होईल. यानिमित्त चित्रपटाचे दिग्दर्शक सुबोध खानोलकर यांनी पोस्ट लिहित भावना व्यक्त केल्या आहेत. ‘कष्टाचं, प्रामाणिकपणाचं, मोठं स्वप्न पाहण्याचं चीज होतंच.. फक्त कामावर विश्वास हवा, खाली मान घालून कष्ट करत राहण्याची चिकाटी हवी, पडल्यावर पुन्हा उभं राहण्याची जिद्द हवी आणि विश्वास ठेवणाऱ्या माणसांची खंबीर साथ हवी’, असं त्यांनी लिहिलंय. याविषयी त्यांनी पुढे म्हटलंय, ‘आज दशावतार ऑस्करच्या मुख्य स्पर्धेत निवडला गेल्याचा ई-मेल आला आणि गेली अनेक वर्षे आम्ही सगळ्यांनी जी मेहनत घेतली त्याची दखल घेतली गेल्याचं समाधान मिळालं. हे समाधान फक्त ‘दशावतार’ निवडला गेलाय म्हणून नाही, तर आपला मराठी चित्रपट जागतिक स्तरावर तोडीस तोड उभा राहू शकतो, हे पुन्हा एकदा सिद्ध होतंय म्हणून आहे.’
View this post on Instagram
‘जिंकणं हरणं नंतरची गोष्ट, पण मुख्य जागतिक प्रवाहात मराठी चित्रपटाची दखल घेतली जाणं हे प्रचंड अभिमानास्पद आहे. ही फक्त सुरुवात आहे, आम्ही सातत्याने चांगलं काहीतरी तयार करण्याचा आणि ते जगासमोर आणून मराठीची मान उंचावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहू, प्रेम आणि आशीर्वाद असू द्या,’ अशी पोस्ट खानोलकर यांनी लिहिली आहे.
कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार’ हा चित्रपट आहे. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार आहे.
