Dashavatar : ‘कोकणातल्या कांतारा’नं प्रेक्षकांना लावलं वेड; ‘दशावतार’ची 2 दिवसांत तगडी कमाई
Dashavatar : कलासक्त वृद्ध दशावतारी बाबुली मेस्त्री आणि त्याच्या आयुष्यातल्या वादळांची गोष्ट दर्शवणारा ‘दशावतार' प्रेक्षकांना खूप आवडतोय. अवघ्या दोन दिवसांत या चित्रपटाने कोटींमध्ये कमाई केली आहे. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ही सकारात्मक बाब आहे.
एखादी कलाकृती किंवा एखादा चित्रपट खऱ्या अर्थाने लोकांच्या मनात तेव्हा घर करतो, जेव्हा सर्वसामान्य लोक आपल्या पद्धतीने त्याचा गौरव करतात, त्याची चर्चा करतात आणि त्या कलाकृतीशी एक आत्मीय नातं जोडतात. ‘दशावतार’ या बहुचर्चित चित्रपटाबाबत असाच अनुभव सध्या येत आहे. या चित्रपटाच्या टीझर, ट्रेलरलाही प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला होता. ‘कोकणातला कांतारा’ अशी त्याची चर्चा झाली होती. त्यामुळे प्रेक्षक त्याच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत होते. अखेर 12 सप्टेंबर रोजी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आणि अवघ्या दोन दिवसांत चांगली कमाई केली.
बॉक्स ऑफिस कलेक्शन ट्रॅकर ‘सॅकनिल्क’ने दिलेल्या वृत्तानुसार, ‘दशावतार’ या चित्रपटाने प्रदर्शनाच्या दिवशी 58 लाख रुपयांचा गल्ला जमवला. तर दुसऱ्या दिवशी थेट कोट्यवधींमध्ये त्याची कमाई झाली. शनिवारच्या कमाईचा आकडा 1.39 कोटी रुपयांवर पोहोचला. त्यामुळे दोन दिवसांत जगभरात या चित्रपटाने 2.2 कोटी रुपये कमावले आहेत. माऊथ पब्लिसिटीमुळे वीकेंडच्या कमाईत चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांच्या तुलनेत ‘दशावतार’ला प्रेक्षकांकडून खूप सकारात्मक प्रतिसाद मिळतोय.
महाराष्ट्रात, विशेषत: कोकणात, गणेशोत्सवासोबतच दशावतार ही कलापरंपरा दिमाखात साजरी केली जाते. या सांस्कृतिक परंपरेला मोठा सलाम करत ‘दशावतार’ हा भव्य मल्टीस्टारर चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, सिद्धार्थ मेनन, अभिनय बेर्डे आणि प्रियदर्शिनी इंदलकर यांसारख्या दिग्गज कलाकारांची भक्कम फौज लाभली आहे. तसंच या चित्रपटात विजय केंकरे, सुनील तावडे, रवी काळे, लोकेश मित्तल, आरती वडगबाळकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. कोकणातील इरसाल माणसांचे नमुने, तिथल्या प्रथा परंपरा, दशावतारी नाट्यकला यांचा सुरेख मिलाफ म्हणजे ‘दशावतार’ हा चित्रपट आहे. कोकणातील समृद्ध निसर्गवैभव, गर्द देवराया, देवरायांचे राखणदार यांची गूढरम्यता म्हणजे दशावतार आहे.
‘तुझ्यात जीव रंगला’, ‘ भागो मोहन प्यारे’, ‘माझा होशील ना’, सध्याची लोकप्रिय मालिका ‘कमळी’ अशा अनेक यशस्वी मालिका देणारे आणि ‘संदूक ‘, ‘हापूस’सारख्या लोकप्रिय चित्रपटांचे लेखक सुबोध खानोलकर यांनी या चित्रपटाच्या कथा – पटकथा लेखनाबरोबरच दिग्दर्शनाची प्रथमच स्वतंत्रपणे धुरा सांभाळली आहे. तर गुरु ठाकूर यांनी संवाद आणि गीतलेखन केलं आहे.
