चांगल्या गाण्याची वाट..; ‘दिसला गं बाई दिसला’च्या नवीन व्हर्जनवर नेटकरी नाराज, गौतमी पाटीलसोबत थिरकला ललित प्रभाकर
'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटात आजच्या काळातील प्रेमाचं वास्तव, त्यातील बदलती नाती, डिजिटल युगातील संवादाचं रूप अधोरेखित करण्यात आलंय. याच चित्रपटातील नवीन गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून त्यावर नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

‘प्रेमाची गोष्ट 2’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येत असतानाच या चित्रपटातील तिसरं गाणं नुकतंच प्रदर्शित झालं आहे. ‘दिसला गं बाई दिसला’ या जुन्या गाण्याचं हे नवीन व्हर्जन आहे. विशेष म्हणजे ‘दिसला गं बाई दिसला 2.0’मध्ये गौतमी पाटील थिरकली आहे. तिच्यासोबत अभिनेता ललित प्रभाकरसुद्धा झळकला आहे. हे गाणं प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी त्यावर विविध प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. राम कदम आणि अविनाश-विश्वजीत यांनी या गाण्याला संगीत दिलं असून जगदीश खेबुडकर आणि विश्वजीत जोशी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. तर पॉल मार्शलने या गाण्याची कोरिओग्राफी केली आहे.
‘दिसला गं बाई दिसला’ या जुन्या गाण्याचे बोल आणि त्याला दिलेले नवीन बीट्स.. अशी ही झंकाराची मिसळ आहे. यामध्ये गौतमी पाटीलने स्फूर्तीदायक सादरीकरण केलं आहे. याविषयी दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ”हे गाणं तयार करतानाच आमच्या मनात तरुणाई होती. जुनं गाणं नव्या पिढीपर्यंत पोहोचवायचं होतं, परंतु त्याचा सार कायम ठेवायचा होता. गौतमी पाटीलच्या एनर्जीमुळे गाण्याला जिवंतपणा आला आणि तिचा परफॉर्मन्सच या गाण्याचं आकर्षण ठरलं.”
View this post on Instagram
हे गाणं ऐकल्यानंतर मात्र नेटकऱ्यांनी त्याला ट्रोल केलंय. हे बघण्यासाठी 350-400 रुपये खर्च करून मराठी माणूस थिएटरमध्ये येईल का, असा सवाल एकाने केला. तर ‘काय वाट लावताय. एवढं सुंदर गाणं अन् त्या गाण्याला असं मॉडिफाय केलं. आपल्याच मायबोली गाण्यांची अशी वाट लावताय,’ असं दुसऱ्याने लिहिलंय. ‘चांगल्या गाण्याची वाट लावली’ अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
‘प्रेमाची गोष्ट 3’ या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सतीश राजवाडे यांनी सांभाळली आहे. ललित प्रभाकर, ऋचा वैद्य, रिधिमा पंडित, स्वप्निल जोशी, भाऊ कदम यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 21 ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये ललितच्या आयुष्यात आलेली वळणं ठळकपणे पहायला मिळाली. लग्न, घटस्फोट आणि त्यानंतर पुन्हा समोर आलेलं जुनं प्रेम. या सगळ्यामुळे त्याचं आयुष्य जणू एका वादळात सापडलं आहे. स्वतःच्या चुकांचा आणि नशिबाचा हिशेब करताना तो सगळ्याचा दोष देवाला देताना दिसतोय. परंतु देव त्याला खरंच नशिब बदलण्याची दुसरी संधी देणार का? आणि दिलीच, तरी लालितचं नशिब खरंच बदलेल का? याचं उत्तर प्रेक्षकांना चित्रपट पाहूनच मिळणार आहे.
