माझ्याशी लग्न करशील? चाहत्याचं प्रपोज, जिनिलिया वहिनीच्या या उत्तराने रितेश दादाही होईल आनंदी!
अभिनेत्री जिनिलिया देशमुखला सोशल मीडियावर एका चाहत्याने लग्नासाठी प्रपोज केलं. त्यावर तिने जे उत्तर दिलं, ते वाचून रितेश देशमुखलाही आनंद होईल. जिनिलियाने 'आस्क मी एनिथिंग' या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला होता.

अभिनेत्री जिनिलिया देशमुखने बऱ्याच वर्षांनंतर हिंदी चित्रपटात पुनरागमन केलंय. आमिर खानच्या ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली. या चित्रपटाच्या निमित्ताने तिने सोशल मीडियावरील ‘आस्क मी एनिथिंग’ या सेशनद्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी तिने चाहत्यांच्या विविध प्रश्नांची उत्तरं दिली. या सेशनदरम्यान एका चाहत्याने त्याच्या मनातली गोष्ट जिनिलियाला बोलून दाखवली. त्याने प्रेम व्यक्त करत जिनिलियाला चक्क लग्नासाठी मागणी घातली. त्यावर जिनिलियाने दिलेलं उत्तर चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिचं हे उत्तर वाचून पती रितेश देशमुखलाही आनंद होईल.
‘मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्याशी लग्न करशील का’, असं एका चाहत्याने जिनिलियाला विचारलं. त्यावर उत्तर देताना तिने लिहिलं, ‘मी विचार केला असता, पण मी सर्वांत सुंदर व्यक्तीशी लग्न केलंय.’ यावेळी एका चाहत्याने तिला रिलेशनशिपसाठी सर्वोत्तम सल्ला काय, असंही विचारलं. त्यावर जिनिलियाने तिच्याच अंदाजात उत्तर दिलं. कोणाचेच सल्ले ऐकू नकोस, कारण तुझे अनुभव हे तुझेच असतील, असं तिने म्हटलंय.

रितेश देशमुख आणि जिनिलिया डिसूझा ही बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वांत लोकप्रिय जोड्यांपैकी एक आहे. या दोघांना एकत्र पाहिलं की, जोडी असावी तर अशी.. हेच वाक्य अनेकांच्या तोंडी ऐकायला मिळतं. या दोघांनी काही वर्षे डेट केल्यानंतर 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. लग्नाच्या दोन वर्षांनंतर जिनिलियाने रियानला जन्म दिला. त्यानंतर 2016 मध्ये जिनिलिया आणि रितेश यांना दुसरा मुलगा झाला. त्याचं नाव राहील असं आहे. मुलांच्या आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळण्यासाठी जिनिलियाने अभिनयातून काही काळ ब्रेक घेतला होता.
जिनिलियाने मध्यंतरीच्या काळात ‘जय हो’ आणि ‘फोर्स 2’मध्ये पाहुण्या कलाकाराच्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र 2012 मधील ‘ना इष्टम’ या तेलुगू चित्रपटानंतर ‘वेड’ या मराठी चित्रपटामध्येच तिने मुख्य भूमिका साकारली होती. ‘वेड’नंतर ती आता ‘सितारें जमीन पर’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली. यामध्ये तिने आमिर खानच्या प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
