आईवडिलांच्या घटस्फोटानंतर अशी होती गिरीजा ओकची अवस्था, घ्यावी लागली थेरपी; म्हणाली “माझ्यात काहीतरी चुकतंय..”
अभिनेत्री गिरीजा ओक तिच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. गिरीजा लहान असतानाच तिच्या आईवडिलांनी घटस्फोट घेतला. त्याचा परिणाम तिच्या मनावर खोलवर झाला होता. यासाठी तिला थेरपी घ्यावी लागली होती.

निळ्या साडीतील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मराठमोळी अभिनेत्री गिरीजा ओक अनेकांची ‘नॅशनल क्रश’ बनली. गिरीजा लवकरच ‘परफेक्ट फॅमिली’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून ही सीरिज फॅमिली थेरपीवर आधारित आहे. गिरीजासाठी हा विषय खूप जवळचा आणि ओळखीचा होता, कारण किशोरावस्थेपासून तिने थेरपीचा आधार घेतला आहे. आईवडिलांच्या घटस्फोटानंतर तिला थेरपीचा आधार घ्यावा लागला होता. गिरीजा ही प्रसिद्ध मराठी अभिनेते गिरीश ओक यांची मुलगी आहे. पालकांच्या घटस्फोटाचा तिच्यावर कसा परिणाम झाला, याविषयी ती नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोकळेपणे व्यक्त झाली.
‘न्यूज 18’ला दिलेल्या मुलाखतीत गिरीजा म्हणाली, “मी एका विभक्त कुटुंबातून आहे. मी लहान असतानाच आईवडील वेगळे झाले. मी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून थेरपी घेतली नव्हती. तर मी ज्या लक्षणांचा सामना करत होती, त्यावर उपचार शोधण्यासाठी ती थेरपी होती. माझ्यात नेमकं काय चुकतंय हे पाहण्यासाठी आधी मी फॅमिली डॉक्टरकडे गेले. माझ्यात काहीतरी चुकतंय, हे नक्की पण ते फक्त शारीरिकदृष्ट्या नव्हतं. मला मानसोपचारतज्ज्ञांची गरज असल्याचं फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं. मी 17 वर्षांची असताना पहिल्यांदा थेरपी घेतली होती.”
“थेरपी ही माझ्यासाठी एक आंतरिक प्रक्रिया आहे. परंतु जर मी पुन्हा मागे जाऊन त्यात माझ्या पालकांनाही सोबत आणू शकले, तर मी ते आवर्जून करेन. कारण त्यामुळे त्यांच्यासाठीही खूप मोठा फरक पडला असता. जेव्हा कुटुंब विभक्त होतं, तेव्हा अशा अनेक गोष्टी असतात, ज्या खरोखरच आपण इतक्या लवकर सोडवू शकत नाही. त्यावर कोणतेही सोपे उपाय नाहीत. त्यांच्यातही खूप अपराधीपणाची भावना होती. वैयक्तिकरित्या त्यांनी स्वत: साठी काय करावं आणि संपूर्ण कुटुंब म्हणून काय करावं यापैकी त्यांना एक निवडायचं होतं. त्यावेळी माझ्या मनात खूप प्रश्न होते”, अशा शब्दांत ती पुढे व्यक्त झाली.
आजही थेरपीमुळे अधिक मदत होत असल्याची कबुली गिरीजाने दिली. कारण कुटुंबासमोर मोकळेपणे बोलणं नेहमीच सोपं नसतं, असं ती म्हणते. “माझी आई कदाचित मला खूप चांगल्याप्रकारे ओळखते म्हणून मी तिच्यासोबत बऱ्याच गोष्टी शेअर करू शकत नाही. जर ती माझ्यासाठी अनोळखी असती तर मी कदाचित तिच्याशी मोकळेपणे बोलू शकले असते. त्यामुळे जेव्हा जेव्हा मला मन मोकळं करावंसं वाटतं, तेव्हा मी माझ्या थेरपिस्टकडे जाते. हे एक खूप जुनं नातं आहे आणि ते फक्त एकाच थेरपिस्टशी नाही. मी पुन्हा त्याच व्यक्तीकडे जाऊ शकत नव्हती म्हणून मी गेल्या काही वर्षांत थेरपिस्ट बदलले. पण माझ्यासाठी ही एक सतत चालणारी प्रक्रिया आहे”, असं गिरीजाने स्पष्ट केलं.
