असरानी यांचा सिनेमा प्रवास कसा घडला?..घरच्यांचा विरोध मोडून ते कसे यशस्वी झाले
ज्येष्ठ अभिनेते असराणी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या प्रदीर्घ चित्रपटांच्या प्रवासाबद्दल यानिमित्ताने चर्चा होत आहे. त्यांना चित्रपटसृष्टीत स्थिरावण्यासाठी खूप कष्ट करावे लागले.

कॉमेडियन असरानी यांचे निधन झाले आहे. त्यांचे संपूर्ण नाव गोवर्धन असराणी आहे. त्यांचा जन्म १ जानेवारी १९४१ मध्ये पंजाबच्या गुरदासपूर येथे झाला होता. चित्रपटाच्या वेडापायी घर सोडून ते मुंबईत आले होते. ते अभिनयाची एबीसीडी पुण्याच्या फिल्म एण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) येथून शिकले. त्यांच्या कुटुंबियांचा सिनेमा लाईनला विरोध होता. एकदा तर त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना पडद्यावर अभिनय करताना पाहून त्यांना पुन्हा गुरदासपुरला नेले होते.
लहानपणापासून असरानी यांना चित्रपटाचे वेड होते. ते शाळेतून पळून सिनेला पाहायला जायचे. घरातल्या लोकांनी त्यांच्यावर सिनेमा पाहण्याची बंदी घातली होती. त्यांच्या वडीलांना वाटायचे त्यांनी सरकारी नोकरी करावी. जसे ते मोठे झाले तसे त्यांच्या चित्रपटाबद्दल वेड वाढतचे गेले. त्यानंतर त्यांनी एकदा कोणालाही न सांगता गुरदासपूर सोडले आणि ते मुंबईला आले.
पुण्यातील फिल्म इन्स्टीट्यूटमध्ये प्रवेश
मुंबईत आल्यानंतर असरानी यांना फिल्मलाईनमध्ये येण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. परंतू यश मिळाले नाही. त्यांनी एका मुलाखती सांगितले की त्यांना चित्रपटात येण्यासाठी पुणे फिल्म इन्स्टीट्यूटमधून डिप्लोमा करण्याचा सल्ला मिळाला. १९६० मध्ये पुण्यात फिल्म एण्ड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूटची स्थापना झाली होती. अभिनयासाठीच्या पहिल्या बॅचची जाहीरात वृत्तपत्रात पाहून त्यांनी अर्ज केला आणि त्यांची निवड झाली. त्यांनी १९६४ मध्ये एक्टींगचा डिप्लोमा पूर्ण केला आणि त्यानंतर चित्रपटात काम शोधायला सुरुवात केली.
पुण्यातून डिप्लोमा केल्यानंतर मुंबईत आलेल्या असरानी यांना चित्रपटात छोटे- मोठे रोल मिळू लागले. परंतू सीमा चित्रपटाच्या एका गाण्यातून त्यांना पहिली ओळख मिळाली. गुरदासपुरातील घरच्यांनी हे गाणे पाहिले तेव्हा ते थेट मुंबईला त्यांना घरी नेण्यासाठी आले. त्यांना आपल्या सोबत पुन्हा गुरदासपुरला घेऊन गेले. काही दिवस गावी राहिल्यानंतर घरच्यांना कसे तरी पटवून ते पुन्हा मुंबईला आले.
एफटीआयआयमध्ये शिक्षक बनले
मुंबईत चांगला रोल न मिळाल्याने ते पुन्हा पुणे फिल्म इन्स्टिट्यूटला गेले. आणि ते एफटीआयआयमध्ये शिक्षक बनले. त्यावेळी त्यांची अनेक चित्रपट निर्मात्यांशी ओळख झाली. त्यानंतर ऋषिकेश मुखर्जी यांच्या १९६९ मध्ये आलेल्या ‘सत्यकाम’ चित्रपटात त्यांना मोठा ब्रेक मिळाला. परंतू १९७१ रोजी आलेल्या ‘गुड्डी’ चित्रपटातून ते लाईमलाईटमध्ये आले,त्यात त्यांना कॉमिक रोल मिळाला, त्यांचा रोल प्रेक्षकांना खूप आवडला, परंतू त्यामुळे त्यांच्यावर कॉमेडियनचा शिक्का कायमचा लागला.
असरानी यांच्या करीयरमध्ये दिग्दर्शक ऋषिकेश मुखर्जी आणि गुलजार यांचा रोल मोठा होता. या दोघांच्या अनेक चित्रपटात ते दिसले. असराणी पिया का घर, मेरे अपने, शोर, सीता और गीता, परिचय, बावर्ची, नमक हराम, अचानक, अनहोनी सारख्या चित्रपटातून गाजले. या चित्रपटात त्यांनी चरित्र भूमिका केल्या असल्या तरी त्यांना लोकांना त्या विनोदी वाटल्या. १९७२ मध्ये आलेल्या कोशिश आणि चैतालीमध्ये असराणी निगेटिव्ह रोलमध्ये होते.
‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ ने ओळख
अभिताभ बच्चन यांच्या अनेक चित्रपटात असरानी सहकलाकार होते. अभिमान ( १९७३ ) मध्ये चंदर आणि चुपके चुपके ( १९७५ ) मधील प्रशांत कुमार श्रीवास्तव रोल गाजला.छोटीसी बात ( १९७५ ) मधील नागेश शास्रीचा रोल हिरो पेक्षा कमी नव्हता. शोले ( १९७५ ) मधील एका डायलॉगमुळे त्यांना ओळख मिळाली. ‘अंग्रेजों के जमाने के जेलर’ या डायलॉगने त्यांना ओळख मिळाली.
दिग्दर्शनही केले
असरानी यांनी दिग्दर्शक म्हणूनही काम केले आहे. ‘चला मुरारी हीरो बनने’ नावाचा एक सेमी बायोग्राफिकल सिनेमा त्यांनी बनवला होता. त्यांच्या जीवनावर हा चित्रपट बेतला होता.हा चित्रपट चालला नाही तरी त्यांनी हार मानली नाही. ‘सलाम मेमसाब’ (१९७९), ‘हम नहीं सुधरेंगे’ (१९८०), ‘दिल ही तो है’ (१९९३) आणि ‘उड़ान’ (१९९७) सारखे चित्रपट बनवले.त्यांनी गुजराती चित्रपटातही काम केले. बसु चटर्जी, शक्ती सामंत, गुलजार, ऋषिकेश मुखर्जी, एल.व्ही. प्रसाद सारख्या दिग्गज दिग्दर्शकांच्या हाती काम केले. पुण्याच्या फिल्म इन्स्टीट्युटमध्येही ते अखेरपर्यंत शिकवायला जात होते.
