छगन भुजबळांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही; अशोक सराफ असं का म्हणाले?
अशोक सराफ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात हा किस्सा सांगितला आहे. मुलगा अनिकेत सराफ पॅरिसला शिक्षणासाठी गेला असता एकेदिवशी त्याच्यावर छोटा हल्ला झाला होता. त्यात त्याची बॅग चोरीला गेली होती आणि त्यात पासपोर्ट होता.

दिग्गज अभिनेते अशोक सराफ आणि अभिनेत्री निवेदिता सराफ यांचा मुलगा अनिकेत हा व्यवसायाने शेफ आहे. आईवडिलांच्या करिअरपेक्षा पूर्णपणे वेगळं असलेलं हे क्षेत्र स्वत: अनिकेतनंच निवडलं आणि त्यानंच सगळं स्वत:चं स्वत: केलं, असं ते म्हणतात. कॉलेज शोधण्यापासून ते अॅडमिशन घेण्यापर्यंतच्या सगळ्या गोष्टी अनिकेतने केल्या होत्या. यासाठी त्याने पॅरिसमधल्या एका कॉलेजमध्ये अॅडमिशन घेतलं होतं. त्यावेळी पॅरिसला वास्तव्यास राहणाऱ्या सचिन पिळगांवकर यांच्या एका मित्र जोडप्याने अनिकेतची खूप मदत केली होती. परंतु पॅरिसमध्ये असताना अनिकेतसोबत एक घटना घडली होती आणि भारतात आल्यानंतर छगन भुजबळ यांनी त्याप्रकरणी अशोक सराफ यांची खूप मदत केली होती. ‘मी बहुरुपी’ या आत्मचरित्रात अशोक सराफांनी हा किस्सा सांगितला आहे. छगन भुजबळांचे ऋण मी कधीच विसरू शकणार नाही, असंही त्यांनी त्यात म्हटलंय.
अनिकेत पॅरिसला असताना त्याच्यावर एक छोटासा हल्ला झाला होता आणि त्याची बॅग चोरीला गेली होती. त्या बॅगेत त्याचा पासपोर्ट होता. पुन्हा पासपोर्टसाठी आणि स्टुडन्ट व्हिसा मिळवण्यासाठी अर्ज करणं आवश्यक होतं. त्यासाठी त्याचं भारतात येणं गरजेचं होतं आणि हे सगळं एका आठवड्यात व्हायला हवं होतं. या घटनेमुळे अशोक सराफ आणि निवेदिता खूपच हतबल झाले होते. पण तेव्हा छगन भुजबळांनी आम्हाला खूप मदत केली, असं त्यांनी सांगितलं. “त्यांच्यामुळे अनिकेतचं वर्ष वाया गेलं नाही. त्याचं शिक्षण सुरळीत सुरू राहिलं. भुजबळसाहेब नेहमीच माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत, माझ्या कुटुंबीयांना मदत केलेली आहे. ते माझे जवळचे मित्र आहेत”, असं अशोक सराफ यांनी या आत्मचरित्रात लिहिलं आहे. छगन भुजबळ यांची निर्मिती असलेल्या दोन चित्रपटांमध्ये अशोक सराफ यांनी भूमिकासुद्धा साकारली होती.
View this post on Instagram
या आत्मचरित्रात ते मुलाविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. पालक म्हणून अनिकेतच्या बाबतीत आम्ही समाधानी आहोत. तो आयुष्यात यशस्वी होईलच याची खात्री आहे. कारण यश आम्ही पैशांत मोजत नाही, त्याच्या आनंदी असण्यात आहे. माणूस म्हणून तो चांगला होणं म्हणजे यश आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केल्या.
