टॅलेंट विकायला आले स्वत:ला नाही..; ‘रामायण’ फेम अभिनेत्रीचा कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव
अभिनेत्री इंदिरा कृष्णनने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कास्टिंग काऊचचा धक्कादायक अनुभव सांगितला. बॉलिवूडपेक्षा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत असे अनुभव अधिक आल्याचं तिने म्हटलंय. ही अभिनेत्री आगामी 'रामायण'मध्ये कौशल्याची भूमिका साकारणार आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीत अनेकदा कास्टिंग काऊचच्या घटना समोर येतात. अभिनयक्षेत्रातील अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेल्या धक्कादायक अनुभवांचा खुलासा केला आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री इंदिरा कृष्णनने तिच्यासोबत घडलेला प्रसंग सांगितला आहे. कामाच्या बदल्यात कशा पद्धतीने तडजोड करण्यास सांगितलं गेलं, याविषयी ती मोकळेपणे व्यक्त झाली. इतकंच नव्हे तर बॉलिवूडच्या तुलनेत दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत अशा प्रकारच्या अनुभवांचा अधिक सामना करावा लागत असल्याचं तिने म्हटलंय. इंदिरा लवकरच नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ या बिग बजेट चित्रपट कौशल्याच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.
‘बॉलिवूड बबल’ला दिलेल्या मुलाखतीत इंदिरा म्हणाली, “माझ्यासोबत असं फक्त एकदा नाही तर अनेकदा घडलंय. मी असं म्हणणार नाही की कास्टिंग काऊचचे अनुभव मला हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा मुंबईत अधिक आले. किंबहुना दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत मी या गोष्टी जास्त पाहिल्या आहेत. मला एका मोठ्या निर्मात्याने त्यांच्या खूप मोठ्या प्रोजेक्टसाठी निवडलं होतं. त्या प्रोजेक्टच्या बाबतीत आमच्यात काही मतभेद होते. मी त्या प्रोजेक्टसाठी पूर्णपणे तयार नव्हती. परंतु शेवटच्या क्षणी एका छोट्याशा गोष्टीने सर्वकाही उद्ध्वस्त केलं. फक्त एक ओळ, एक वक्तव्य आणि सर्वकाही संपलं.”
View this post on Instagram
“मला आठवतंय, मी सर्वांत आधी हा विचार केला की हा चित्रपट माझ्या हातून गेला. नंतर घरी पोहोचल्यावर मी त्याला एक मेसेज टाइप करून पाठवला. कारण ज्या पद्धतीने तो माझ्याशी बोलत होता, त्याची बॉडी लँग्वेज आणि सर्व अपेक्षा खूप वाढल्या होत्या. त्यासोबतच माझ्यावरील दबावसुद्धा वाढला होता. त्या परिस्थितीला मी आणखी हाताळू शकत नाही, असं मला जाणवलं. जर उद्यापासून शूटिंग सुरू झाली, तर हे नातं आणखी खराब होईल, याचा मी विचार केला. मग मी अत्यंत सन्मानाने त्यांना म्हटलं की, मी माझी प्रतिभा विकायला आली आहे, स्वत:ला नाही. कदाचित माझे शब्द कठोर होते, परंतु मला वाटतं की तुम्ही जितके स्पष्ट असाल, तितकं उत्तम असतं. त्यामुळे तुम्हाला तुमची ऊर्जा वाढवण्यात, गती कायम ठेवण्यात आणि पुढे चालत राहण्यास मदत मिळते.”
इंदिरा कृष्णनने पुढे सांगितलं की कास्टिंग काऊचचा हा पहिला किंवा शेवटचा अनुभव नव्हता. यामुळे तिने बरेच चांगले प्रोजेक्ट्स गमावले होते. करिअरच्या याच टप्प्यावर असताना तिने टीव्हीकडे आपला मोर्चा वळवला होता. छोट्या पडद्यावर काम करून मानसिक समाधान मिळाल्याचं तिने स्पष्ट केलं.
