बॉलिवूडमध्ये काम मिळेना..; ए. आर. रेहमान यांच्या वक्तव्यावर जावेद अख्तर म्हणाले..
बॉलिवूडमध्ये काम मिळत नसल्याची तक्रार ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बोलून दाखवली. त्यावर आता ज्येष्ठ लेखक आणि गीतकार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर नेमकं काय म्हणाले, ते जाणून घ्या..

प्रसिद्ध संगीतकार, गायक ए. आर. रेहमान यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गेल्या 8 वर्षांत त्यांना बॉलिवूडमध्ये खूपच कमी कामाच्या संधी मिळाल्याचा खुलासा केला. फिल्म इंडस्ट्री सांप्रदायिक होत चालली असून त्यामुळे मंदी आल्याचीही टीका त्यांनी यावेळी केली होती. यावर ज्येष्ठ गीतकार-पटकथालेखक जावेद अख्तर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर यांनी रेहमान यांचा हा विचार फेटाळून लावत ते असं वक्तव्य करतील याबद्दल शंका व्यक्त केली. “ए. आर. रेहमान यांना इंडस्ट्रीमध्ये खूप आदर आहे. परंतु त्यांच्या कामाच्या उंचीमुळे बरेच लोक त्यांच्याकडे जाण्यास कचरतात”, असं मत अख्तर यांनी मांडलं.
‘इंडिया टुडे’शी बोलताना जावेद अख्तर म्हणाले, “मी याच्याशी सहमत नाही आणि ते असं कधी बोलतील याबद्दलही मला शंका आहे. रेहमान हे उत्तम संगीतकार आहेत आणि बरेच लोक त्यांचा आदर करतात. पण त्यांचं व्यक्तीमत्त्व खूप मोठं असल्याने त्यांना भेटायला लोक घाबरतात, त्यांच्याशी बोलायला कचरतात. लोक त्यांच्याबद्दलच्या भीतीयुक्त आदरामुळे त्यांच्यापासून दूर राहतात. ते आमच्या आवाक्याबाहेरचे आहेत, ते खूप मोठे आहेत, असं लोक म्हणतात. त्यामुळे त्यांना चुकीचा समज झाला असेल.”
‘बीबीसी एशियन नेटवर्क’ला दिलेल्या मुलाखतीत ए. आर. रेहमान यांना इंडस्ट्रीतील पक्षपातीपणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी त्यांनी वैयक्तिकरित्या भेदभावाचा सामना केला नाही असं म्हणत अशा गोष्टींना इंडस्ट्रीतील बदलणारे पॉवर स्ट्रक्चर्स हे योगदान देणारे घटक ठरू शकत असल्याचं मत मांडलं होतं. “मला कदाचित याबद्दल कधी कळलंच नाही. कदाचित ते लपवलं गेलं असेल. पण मला यापैकी काहीही जाणवलं नाही. गेल्या आठ वर्षांत इंडस्ट्रीत बरीच सत्तांतरे झाली आहेत. जे लोक सर्जनशील नाहीत, त्यांच्याकडे आता सत्ता आहे. कदाचित ही एक सांप्रदायिक गोष्टदेखील असेल पण ती माझ्यासमोर दिसली नाही. मी कामाच्या शोधात नाही. मला कामाच्या शोधात जायचं नाही. मला काम माझ्याकडे यावं असं वाटतं. मी ज्यासाठी पात्र आहे, ते मला मिळेल”, असं वक्तव्य रेहमान यांनी केलं होतं.
