ती खूप दुखावली गेली पण..; पूर्व पत्नीसोबतच्या नात्याबद्दल जावेद अख्तर काय म्हणाले?
प्रसिद्ध गीतकार आणि लेखक जावेद अख्तर यांचं खासगी आयुष्य अनेकदा चर्चेत आलं. जावेद यांनी 1972 मध्ये हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि 1984 मध्ये त्यांनी अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं.

ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर हे विविध मुलाखतींमध्ये त्यांच्या खासगी आयुष्याविषयी मोकळेपणे व्यक्त झाले. जावेद यांनी आधी हनी इराणी यांच्याशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ते विभक्त झाले आणि अभिनेत्री शबाना आझमी यांच्याशी दुसरं लग्न केलं. निखिल तनेजाला दिलेल्या नुकत्याच एका मुलाखतीत ते पूर्व पत्नीसोबत असलेल्या नात्याविषयी व्यक्त झाले. अख्तर हे विवाहित असताना आणि दोन मुलांचे पिता असताना त्यांचा शबाना आझमींवर जीव जडला होता. पतीच्या या विश्वासघाताबद्दल हनी यांच्या मनात सुरुवातीला फार कटुता होती. मात्र हळूहळू त्यांनी जावेद यांना समजून घेतलं.
पूर्व पत्नी हनी इराणी यांना सर्वोत्कृष्ट मैत्रीण असं म्हणत जावेद यांनी सांगितलं, “आमचं नातं हे लग्नाच्या 11 वर्षांनंतर तुटलं होतं. त्यामुळे काही गोष्टींना अत्यंत वाईट वळण मिळू शकलं असतं. काही काळ आमच्यातही ती कटुता होती, कारण अर्थातच ती खूप दुखावली गेली होती. पण हळूहळू गोष्टी बदलल्या आणि आज आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र आहोत. जर तुम्ही मला विचारलात की आयुष्यातील तीन खूप चांगल्या मित्रांची नावं सांगा, तर मी त्यापैकी एक नाव मी हमखास हनीचं घेईन आणि बाकी दोन नावांचा विचार करेन. तिच्या बाजूनेही असंच आहे. तिला माझ्यावर खूप विश्वास आहे. आम्ही एकमेकांसोबत मस्करी करतो, भावनिक क्षणांचाही एकत्र सामना करतो. आमच्यात खूप चांगली मैत्री आहे.”
View this post on Instagram
या मुलाखतीत जावेद हे पत्नी शबाना आझमी यांच्याविषयी व्यक्त झाले. “तीसुद्धा माझी खूप चांगली मैत्रीण आहे. माझी आणि शबानाची मैत्री इतकी चांगली आहे की लग्नसुद्धा आमचं काहीच बिघडवू शकली नाही. दोन जण एकत्र तेव्हाच खुश राहू शकतात, जेव्हा त्यांच्यात एकमेकांविषयी आदर आणि प्रेम असेल. यासोबतच हे स्वीकारलं पाहिजे की दोघांपैकी एक स्टार आणि दुसरा ग्रह नाही. दोघंही स्टार आहोत. ज्याप्रकारे मला माझी स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, ध्येय ठेवण्याचा अधिकार आहे, तसाच दुसऱ्या व्यक्तीलाही आहे. फक्त एका व्यक्तीच्या आनंदाच्या जोरावर तुम्ही वैवाहित आयुष्य यशस्वी ठरवू शकत नाही.”
