हनिमूनसाठी निघालेल्या जय दुधाणेला तडकाफडकी अटक का? त्याच्यावर नेमके काय काय आरोप?
'बिग बॉस मराठी 3' फेम जय दुधाणेला एअरपोर्टवर तडकाफडकी अटक का करण्यात आली, त्याच्यावर नेमके कोणकोणते आरोप आहेत, याविषयीची सविस्तर माहिती समोर आली आहे. हे संपूर्ण प्रकरण काय आहे, त्याबद्दल जाणून घ्या..

‘बिग बॉस मराठी 3’चा उपविजेता जय दुधाणे याला मुंबई विमानतळावरून रविवारी पोलिसांनी अटक केली. जवळपास 5 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी वर्तकनगर पोलिसांनी जयला अटक केली. ठाण्यातील त्याची दुकानं बँकेकडे गहाण असतानाही त्याने ती विकण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली होती. दुकानं गहाण असतानाही जयने तक्रारदारासोबत आर्थिक व्यवहार केले होते. पोलिसांकडे ही तक्रार दाखल होताच त्यांनी मुंबई विमानतळावरून जयला अटक केली. त्यावेळी जय त्याच्या पत्नीसोबत हनिमूनला जात होता. 24 डिसेंबर 2025 रोजी जयचा लग्नसोहळा पार पडला होता.
जय दुधाणेवर आरोप काय?
तक्रारदार हे इंजिनीअर असून ते शासकीय सेवेतून सेवानिवृत्त आहेत. पोखरण रोड क्रमांक एक भागातील गांधीनगर परिसरात जयच्या कुटुंबीयांची पाच दुकानं आहेत. मार्च 2024 मध्ये ही दुकानं विक्रीसाठी असल्याची माहिती तक्रारदाराला मिळाली होती. त्यांनी याबाबत जय आणि त्याच्या वडिलांकडे चौकशी करून गाळे खरेदी करण्याची तयारी दर्शविली होती. दुकानांच्या विक्रीची किंमत 4 कोटी 90 लाख रुपये ठरल्यानंतर मार्च ते मे 2024 पर्यंत तक्रारदाराने जयच्या कुटुंबीयांना 3 कोटी 25 लाख रुपये धनादेशाद्वारे पाठवलं. या खरेदीबाबत दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदणीही करण्यात आली.
जून 2024 मध्ये जयच्या वडिलांचं निधन झालं. त्यानंतर तक्रारदाराने जयकडे दुकानांच्या व्यवहारासंदर्भात विचारणा केली असता, त्याच्याकडून प्रतिसाद मिळत नव्हता. तक्रारदाराने जयकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर त्याने ही दुकानं एका बँकेकडे गहाण असल्याचं सांगितलं. व्यवहाराप्रमाणे तक्रारदाराने 94 टक्के रक्कम दुधाणेला दिली होती. पुढील प्रक्रियेसाठी जयला विचारलं असता त्याने बँकेचं तारण कर्ज फिटलं नसून दुकानांवर जप्ती येणरा असल्याची कबुली दिली होती. इतकंच नव्हे तर ही जप्ती टाळण्यासाठी त्याने आणखी 55 लाख रुपयांची मागणी केली. तसंच बँकेचं कर्जमुक्त झाल्याचं बनावट कागदपत्र दाखविल्याचा आरोप केला. यानंतर तक्रारदाराने जयविरोधात तक्रार केली.
जय दुधाणेची प्रतिक्रिया
“वडिलांची जबाबदारी घेतली, पण लोक माझ्यावरच उलटले आहेत. सत्य लवकरच समोर येईल. मी कुठे पळून गेलो नाही. जे आहे त्याला सामोरं जाणार. पोलिसांनी सर्वांवर गुन्हे दाखल केले आहेत. माझ्या आजी-आजोबांनाही सोडलं नाही. हा खोटा गुन्हा आहे आणि मी माझा चेहरादेखील लपवलं नाही,” अशी प्रतिक्रिया जयने दिली आहे.
