‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाणची नवी मालिका चर्चेत; या अभिनेत्यासोबत जमली जोडी
'जीव माझा गुंतला' आणि त्यानंतर 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकलेली अभिनेत्री योगिता चव्हाणची नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेच्या प्रोमोवर प्रेक्षकांनी भरभरून कमेंट्सचा वर्षाव केला होता.

‘जीव माझा गुंतला’ या मालिकेत अंतराची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री योगिता चव्हाण आता एका नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘तू अनोळखी तरी सोबती’ असं या नव्या मालिकेचं नाव असून सन मराठी वाहिनीवर ती प्रसारित होत आहे. या मालिकेत योगिताची जोडी अभिनेता अंबर गणपुलेशी जमली आहे. 5 जानेवारीपासून रात्री 9 वाजता ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चाळ संस्कृती ही मुंबईची खरी ओळख आहे. एकाच भागात असलेल्या पण दोन वेगवेगळ्या चाळीत राहणाऱ्या अर्पिता आणि समीर या दोघांची कथा या मालिकेत पहायला मिळणार आहे. नकळतपणे एकमेकांची काळजी घेणारे हे दोघं कसे एकत्र येतील, नियती या दोघांची मैत्री – प्रेम संबंध जुळवून कसं आणेल, हे पाहणं रंजक ठरणार आहे.
या मालिकेत अर्पिता हे मुख्य पात्र साकारणारी अभिनेत्री योगिता चव्हाण म्हणाली, “या मालिकेच्या निमित्ताने आणखी एक नवीन पात्र घेऊन प्रेक्षकांसमोर मी येत आहे. त्यामुळे मनात थोडी धाकधूक, आनंद अशा भावना आहेत. अर्पिता हे पात्र अगदीच साधं, सुशील, कुटुंबाचा विचार करणारी, प्रत्येकाचं मन जपणारी मुलगी आहे. ही एका चाळीत राहणाऱ्या मुलीची गोष्ट असल्याने प्रत्येक वयोगटाच्या प्रेक्षकांना आपलंसं करुन घेणारी ठरेल. अर्पिता आणि योगितामध्ये प्रचंड फरक आहे. अर्पिता कधीच स्वतःसाठी जगली नाही, नेहमीच दुसऱ्यांसाठी झटत राहणारी ती व्यक्ती आहे. जेव्हा तिच्या आयुष्यातही अशी एक व्यक्ती येईल तेव्हा खरंच मॅजिक होईल. मी सुद्धा गेली 21 वर्षे ठाणे इथल्या किसननगर चाळीत राहिली आहे. त्यामुळे चाळीत शूटिंग करण्याचा आंनद काही वेगळाच आहे. या मालिकेमुळे चाळीतल्या सगळ्या आठवणींना उजाळा मिळतोय. प्रेक्षकांना आमची नवी मालिका आणि अर्पिता हे पात्र नक्की आवडेल ही खात्री आहे.”
View this post on Instagram
या मालिकेत अभिनेता अंबर गणपुले समीर हे पात्र साकारणार आहे. याविषयी त्याने सांगितलं, “दोन अनोळखी व्यक्तींची ही कहाणी आहे. समीर हे पात्र खूप सौम्य, कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या आनंदाने पार पाडणारा आहे. कायम चेहऱ्यावर स्मित हास्य, नकारात्मक गोष्टींमधूनही सकारात्मक गोष्टी आत्मसात करणारा आहे. त्यामुळे या पात्राकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. मालिकेचा प्रोमो पाहून बऱ्याच जवळच्या माणसांनी कौतुक केलं. मालिकेचा विषय, साधेपणा या सगळ्याच गोष्टी मालिकेविषयी उत्सुकता वाढवणाऱ्या आहेत. मी चाळीत कधी राहिलो नाही. पण ते जीवन मी लहानपणीच्या सुट्यांमध्ये अनुभवलं आहे. चाळ म्हणजे एक मोठं कुटुंब असतं आणि आता समीरमुळे मला चाळीतलं जीवन जगायला मिळतंय.”
