Justin Bieber: जस्टीन बीबरचं भारतात Live कॉन्सर्ट; ‘या’ तारखेपासून तिकिट बुकिंग सुरू

Justin Bieber: जस्टीन बीबरचं भारतात Live कॉन्सर्ट; 'या' तारखेपासून तिकिट बुकिंग सुरू
Justin Bieber
Image Credit source: Facebook

याआधी मे 2017 मध्ये तो मुंबईत आला होता. त्यावेळी आलिया भट्ट, बिपाशा बासू, हुमा कुरेशी, सोफी चौधरी, कनिका कपूर, भूमी पेडणेकर, अयान मुखर्जी, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटी कॉन्सर्टला हजर होते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: स्वाती वेमूल

May 24, 2022 | 4:38 PM

कोरोना महामारी आणि लॉकडाउनमुळे जवळपास दोन वर्षे लाइव्ह कॉन्सर्ट किंवा मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन करता आलं नाही. मात्र आता रसिकांना फार प्रतीक्षा करावी लागणार नाहीये. जस्टीन बीबरच्या (Justin Bieber) भारतातील चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. येत्या ऑक्टोबर महिन्यात जस्टीन भारतात परफॉर्म करण्यासाठी येणार आहे. मंगळवारी या टूरची घोषणा करण्यात आली. जस्टीन वर्ल्ड टूर करणार असून येत्या 18 ऑक्टोबर रोजी तो भारतात येणार आहे. नवी दिल्लीतील (New Delhi) जवाहरलाल नेहरु स्टेडियममध्ये त्याचं कॉन्सर्ट असेल. भारतात लाइव्ह कॉन्सर्ट (Justin Bieber concert) करण्याची त्याची ही दुसरी वेळ आहे. याआधी मे 2017 मध्ये तो मुंबईत आला होता. त्याच्या ‘पर्पज वर्ल्ड टूर’दरम्यान नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमध्ये लाइव्ह कॉन्सर्टचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी आलिया भट्ट, बिपाशा बासू, हुमा कुरेशी, सोफी चौधरी, कनिका कपूर, भूमी पेडणेकर, अयान मुखर्जी, पूजा हेगडे, जॅकलिन फर्नांडिससह अनेक सेलिब्रिटी कॉन्सर्टला हजर होते. आता ऑक्टोबरमध्ये दिल्लीत त्याचं हे कॉन्सर्ट असेल.

कोरोना महामारीनंतर जस्टीनचा हा पहिला स्टेडियम शो असेल. बुक माय शो आणि लाइव्ह नेशनद्वारे या कॉन्सर्टचं प्रमोशन सुरू असून येत्या 4 जूनपासून तिकिटं बुक करता येतील. दुपारी 12 वाजल्यापासून बुक माय शोच्या साइटवर कॉन्सर्टची तिकिटं बुक करता येतील. तर प्री-सेल विंडो 2 जूनपासून सुरू होणार आहे. या कॉन्सर्टची 43 हजार तिकिटं विकली जाणार असून त्याची किंमत 4 हजारांपासून सुरू होणार आहे.

इन्स्टा पोस्ट-

 

View this post on Instagram

 

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

‘जस्टीस वर्ल्ड टूर’दरम्यान जस्टीन बीबर हा जगभरातील 40 देशांमध्ये जवळपास 125 हून अधिक शोज करणार आहे. मे 2022 ते मार्च 2023 दरम्यान हा वर्ल्ड टूर असेल. आतापर्यंत या वर्ल्ड टूरमधील कॉन्सर्टचे जवळपास 13 लाख तिकिटं विकली गेल्याची माहिती समोर येत आहे. 2020 मध्येच जस्टीन हा टूर करणार होता. मात्र कोरोनामुळे त्याची तारीख पुढे ढकलण्यात आली.

मेक्सिकोपासून या टूरची सुरुवात होणार असून त्यानंतर तो ऑगस्टमध्ये इटली आणि स्कँडिनेव्हियाला जाणार आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये तो दक्षिण अमेरिका, दक्षिण आफ्रिका आणि मध्य पूर्वेकडील देशांमध्ये जाणार आहे. या वर्षाअखेरीस तो आशिया, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलँडमध्ये फिरणार आहे. 2023 च्या सुरुवातीला युके आणि युरोपमध्ये त्याचे कॉन्सर्ट्स असतील. याशिवाय दुबई, बहारिन, सिडनी, नवी दिल्ली, मनिला, अॅमस्टरडॅम, लंडन आणि डबलिन याठिकाणी तो लाइव्ह परफॉर्म करेल.

हे सुद्धा वाचा


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें