Kantara Chapter 1 OTT Release : ओटीटीवर येतोय ‘कांतारा : चाप्टर 1’; तारखेवर शिक्कामोर्तब
बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा 'कांतारा : चाप्टर 1' आता तुम्ही मोबाइलवर किंवा घरबसल्या टीव्हीवर पाहू शकता. या चित्रपटाच्या ओटीटी रिलीजची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. हा चित्रपट ओटीटीवर कुठे आणि कधी पाहता येईल, ते जाणून घ्या..

कन्नड सुपरस्टार ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा : चाप्टर 1’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर 2 ऑक्टोबर रोजी हा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. तेव्हापासून आतापर्यंत याची जबरदस्त कमाई सुरूच आहे. आता प्रदर्शनाच्या जवळपास 30 दिवसानंतर हा चित्रपट ओटीटीवर स्ट्रीम होण्यास सज्ज झाला आहे. ‘कांतारा : चाप्टर 1’च्या ओटीटी रिलीजची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. ऋषभ शेट्टीचा हा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑक्टोबर महिन्यातच डिजिटल प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होणार आहे.
‘कांतारा : चाप्टर 1’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. येत्या 31 ऑक्टोबरपासून प्रेक्षक हा चित्रपट डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे मोबाइल किंवा घरबसल्या पाहू शकतात. प्राइम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मने सोशल मीडियावर ‘कांतारा : चाप्टर 1’चा दमदार टीझर शेअर केला आहे. प्राइम व्हिडीओवर हा चित्रपट कन्नड, तेलुगू, तमिळ आणि मल्याळम या चार दाक्षिणात्य भाषांमध्ये उपलब्ध असेल.
View this post on Instagram
‘कांतारा : चाप्टर 1’च्या ओटीटी रिलीजची तारीख ऐकताच चाहते उत्सुक झाले आहेत. गेल्या 25 दिवसांत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तब्बल 589.60 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर जगभरातील कमाईचा आकडा 813 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ‘कांतारा : चाप्टर 1’ने 2025 या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या भारतीय चित्रपटाचा विक्रम आपल्या नावे केला आहे. विकी कौशलच्या ‘छावा’ या चित्रपटाला नुकतंच ‘कांतारा : चाप्टर 1’ने मागे टाकलं आहे.
2022 मध्ये ‘कांतारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला देशभरातून दमदार प्रतिसाद मिळाला होता. कांतारामुळेच ऋषभ शेट्टीला देशभरात विशेष ओळख मिळाली. तीन वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्याचा ‘कांतारा : चाप्टर 1’ प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा सीक्वेल नसून प्रीक्वेल आहे. म्हणजेच कांताराची सुरुवात कुठून झाली, त्यामागे कोणती कथा दडली आहे, याची कहाणी या प्रीक्वेलमध्ये दाखवण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीसोबतच रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट जगभरात कन्नड, हिंदी, तेलुगू, मल्याळम, तमिळ, बंगाली आणि इंग्रजी भाषेत प्रदर्शित झाला आहे.
