जिजामाता महोत्सवात ‘शाहीर’ म्हणून उदय; वाचा, शाहीर डी. आर. इंगळेंची कहाणी

मराठी कला परंपरेत शाहिरीला अत्यंत मानाचे स्थान आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर हा कला प्रकार अत्यंत लोकप्रिय होता. (know about maharashtra shahir D R Ingle)

जिजामाता महोत्सवात 'शाहीर' म्हणून उदय; वाचा, शाहीर डी. आर. इंगळेंची कहाणी
D R Ingle


मुंबई: मराठी कला परंपरेत शाहिरीला अत्यंत मानाचे स्थान आहे. अगदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात तर हा कला प्रकार अत्यंत लोकप्रिय होता. त्याला मानाचे स्थानही होते. आपल्या खड्या आणि पहाडी आवाजात शाहीर जेव्हा गातो, तेव्हा अंगावर रोमांच उभे राहिल्या शिवाय राहत नाही. आजही शाहिरी परंपरा तितकीच निष्ठेने जपली जात आहेत. डी. आर. इंगळेंसारखे शाहीर या परंपरेचे पाईक आहेत. (know about maharashtra shahir D R Ingle)

कौटुंबीक परिस्थिती

शाहीर डी. आर. इंगळे यांचं खरं नाव धोंडीराम रुंजाजी इंगळे हे होय. परंतु, ते डी. आर. इंगळे म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. शाहिरी क्षेत्रात त्यांना ‘दादासाहेब’ म्हणूनही संबोधतात. 13 एप्रिल 1948 रोजी बुलडाणा जिल्ह्यातील मांडका या गावी त्यांचा जन्म झाला. इंगळे यांचा मांडका येथे जन्म झाला असला तरी मांडका हे त्यांचं मूळ गाव नाही. नांदुरा तालुक्यातील ओसाडी हे त्यांचं मूळगाव. मांडका हे मामाचं गाव. मांडक्यात शेती होती. म्हणून त्यांचे आई-वडील मांडक्यात स्थायिक झाले. इंगळे यांचं शिक्षण बी.ए.च्या द्वितीय वर्षापर्यंत झालं. मांडक्यात चौथीपर्यंत, खामगावच्या नॅशनल हायस्कूलमध्ये हायस्कूलपर्यंत आणि औरंगाबादच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं. शिक्षण सुरू असतानाच लग्न झाल्याने त्यांचं शिक्षण अर्धवट राहिलं.

जडणघडण

इंगळे यांच्या घरात सांस्कृतिक वातावरण होतं. शिवाय त्यांच्या रक्तात गायकी भिनलेली होती. बालपणात जलसा पथकाचे अनेक कार्यक्रम पाहिल्याने त्यांच्यावर गाण्याचे संस्कार झाले होते. मांडक्यात विठ्ठलराव वानखेडे (मांडकेकर) यांनी बालकलाकार मंडळ काढले होते. (विठ्ठलराव मांडकेकर हे प्रसिद्ध गायक प्रतापसिंग बोदडे यांचे सासरे) केवळ लहान मुलांसाठी वानखेडे यांनी हे जलसापथक काढले होते. त्यात वानखेडे यांची मुलगी मायावती (मायवती या प्रतापसिंग बोदडे) गाणी म्हणायच्या. त्या या मंडळाच्या प्रमुख गायिका होत्या. या मंडळाकडे शाहीर इंगळे ओढले गेले. या मंडळात इंगळे खंजिरी वाजवायचे. सहा जणांचा हा संच होता. अल्पावधितच हा संच पंचक्रोशीत प्रसिद्ध झाला. या बाल मंडळाला कार्यक्रमही मिळू लागले आणि बिदागीही. अगदी हाफ चड्डीतच या बाल गोपाळांचे कार्यक्रम होऊ लागले. त्यावेळी इंगळे इयत्ता आठवी-नववीला असतील. तेव्हा या बाल मंडळाचा कोणी कवी नव्हता. आसपासच्या खेड्यात महाकवी वामनदादा कर्डक, श्रावण यशवंते, गोविंद म्हशीलकर आणि लक्ष्मण केदार या गायकांचे कार्यक्रम व्हायचे. हे कार्यक्रम ऐकून त्यांची भीमगीते तोंडपाठ करून ही मुलं गाणी गायची.

वामनदादांचा ढोलकीवादक

इंगळे तर या कार्यक्रमात कधी कधी बिनबुडाची बादलीही वाजवायचे. त्यामुळे त्यांचं कलेवरचं प्रेम पाहून वानखेडे यांनी त्यांना ढोलकी घेऊन दिली आणि ढोलकी वाजवायला शिकवलं. त्यात ते पारंगतही झाले. ते जसे शाहीर म्हणून प्रसिद्ध आहेत, तसेच खंजिरवादक आणि ढोलकपटू म्हणूनही लोकप्रिय आहेत. त्याकाळी इंगळे यांच्या ढोलकीच्या साथी शिवाय वामनदादांचे कार्यक्रम व्हायचे नाहीत. वामनदादांना अनेकांनी ढोलकीची साथ दिली. पण वामनदादांना इंगळे यांची साथ अधिक आवडायची. लक्ष्मण राजगुरु हे विठ्ठल वानखेडे यांचे गुरु. लक्ष्मणदादांनी बुलडाण्यातच वानखेडेंना ‘आंबेडकरी ध्येयवादी जलसा’ स्थापन करून दिला. त्यातही इंगळे कधी कधी ढोलकी वाजवायचे.

अन् शाहीर म्हणून घेऊ लागले

सुरुवातीच्या काळात इंगळेंना शाहीर म्हणून घेणं आवडत नव्हतं. पण सिंदखेड राजा येथे संपन्न झालेल्या जिजामाता महोत्सवानंतर ते स्वत:ला अभिमानाने शाहीर म्हणून घेऊ लागले. त्याचं कारणही तसं होतं. या कार्यक्रमात इंगळे यांचा शाहिरी कार्यक्रम होता. साक्षात लोकशाहीर विठ्ठल उमप, शाहीर वामनराव घोरपडे, जिल्हाधिकारी नगराळे, तत्कालिन आमदार राजेंद्र शिंगणे आणि लोकप्रिय गायक प्रतापसिंग बोदडे यांच्यासमोर इंगळेंनी कार्यक्रम सादर केला.

पहिला माझा शाहिरी मुजरा, आई जिजाऊपदी,
महाराष्ट्राची माय जन्मली, सिंदखेड राजामधी,
असं घडलंच नाही कधी, असं घडणार नाही कधी,
भारतामधी जी… जी… जी…

हा पोवाडा इंगळेंनी मान्यवरांसमोर सादर केला. अन् प्रेक्षकांमधून वन्समोअर मिळाला. इंगळे यांची शाहिरी ऐकून स्वत: उमप, बोदडे आणि घोरपडे भारावले. या साऱ्यांना वाह शाहीर वाह… असं म्हणत कौतुक केलं. उमप यांनी तर पार्टी कोणती? कुठून आली? अशी आस्थेने चौकशी केली. त्यामुळे हुरुप आला आणि त्या दिवसापासून इंगळे स्वत:ला शाहीर म्हणून घेऊ लागले. ( साभार, आंबेडकरी कलावंत) (know about maharashtra shahir D R Ingle)

संबंधित बातम्या:

आनंद शिंदेंच्या ‘नवीन पोपटा’ इतकंच सुषमादेवींचं ‘हे’ गाणंही लोकप्रिय; गाण्याचा किस्साही लाजवाब, वाचाच!

‘कांटा चुभा मेरे पांव में’ गाजलं, ‘काँटेवाली सुषमादेवी’ म्हणून ओळख मिळाली; सुषमादेवी काय सांगतात वाचाच!

लतादीदींच्या गाण्यांची नक्कल करत गाणं शिकल्या, सुषमादेवींच्या आवाजाला तोड नाही; वाचा सविस्तर

(know about maharashtra shahir D R Ingle)

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI