वयाच्या 17व्या वर्षापासून गीतलेखन, दहा हजारांवर गाणी लिहिली; वाचा, कोण होते हरेंद्र जाधव?

प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून गीत लेखनास सुरुवात केली होती. (know all about lyricist harendra jadhav)

वयाच्या 17व्या वर्षापासून गीतलेखन, दहा हजारांवर गाणी लिहिली; वाचा, कोण होते हरेंद्र जाधव?
harendra jadhav


मुंबई: प्रसिद्ध गीतकार हरेंद्र जाधव यांनी वयाच्या 17व्या वर्षापासून गीत लेखनास सुरुवात केली होती. त्यांनी दहा हजाराच्यावर गाणी लिहिली. त्यांनी भीमगीते, भक्तीगीते, लोकगीते, भावगीते, कोळीगीते, लग्नगीते, लावण्या, पोवाडे आणि देशभक्तीपर गीते आदी गाण्यांचे विविध प्रकार हाताळले. याशिवाय त्यांनी वगनाट्ये, लोकनाट्ये आणि कथा आदी लोककलेचे प्रकारही हाताळले. सोप्या शब्दांत मोठा आशय मांडण्याची हातोटी त्यांच्याकडे होती. वर्तमान परिस्थिती मांडत गाण्याच्या माध्यमातून व्यवस्थेवर ओरखडे ओढणारे ते प्रतिभावंत गीतकार होते. (know all about lyricist harendra jadhav)

सधन कुटुंबात वाढले

हरेंद्र जाधव यांचा जन्म 16 फेब्रुवारी 1933 रोजी नाशिकच्या निफाड तालुक्यातील मिग ओझर येथे झाला होता. जाधव हे पेक्षाने शिक्षक होते. त्यांचे वडील नाशिकच्या करन्सी नोट प्रेसमध्ये कामाला होते. जाधव यांची कौटुंबीक परिस्थिती अत्यंत चांगली होती. त्यांना गरीबीशी कधीच सामना करावा लागला नाही. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यामुळे प्रभावीत होऊन ते समाजकार्यात ओढले गेले. त्यावेळी जलसा मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केलं जात होतं. जाधव यांनाही लिहिण्याची गोडी लागली आणि त्यांच्या सिद्ध हस्त लेखणीतून अनेक बहारदार गाणी उतरली.

17 व्या वर्षी पहिलं गाणं लिहिलं

अबब गर्दी ही किती झाली,
बाबांची मोटार आली,
गर्दी तुम्ही हटवा…

हरेंद्र जाधव यांनी वयाच्या 17 व्या वर्षी म्हणजे 1950 मध्ये लिहिलेलं हे पहिलं गाणं होतं. या पहिल्याच गाण्याने त्यांना नाव मिळवून दिलं होतं. त्या काळातील अनेक जुण्या गायकांनी त्यांच्या गाण्याचं तोंडभरून कौतुक केलं होतं. त्यांच्या शब्दांची आणि शैलीचंही कौतुक करण्यात आलं. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. जाधव यांनी तब्बल 45 वर्षे गीतलेखन केलं. त्यांनी सुमारे दहा हजाराच्यावर गाणी लिहिली.

व्यवस्थेवर आसूड ओढले

जाधव यांनी छंद म्हणून गाणं लिहिलं नाही. पेशाने शिक्षक असलेल्या जाधवांना प्रचंड सामाजिक भान होतं. आजूबाजूला घडणाऱ्या सामाजिक आणि राजकीय घटनांवर त्यांचं बारकाईने लक्ष होतं. म्हणूनच त्यांनी प्रबोधनासाठी लेखणी चालवली. त्यांनी जनजागृतीसाठी गाण्याचं माध्यम निवडलं. त्यांनी देवांवरही गाणी लिहिली. पण देवांचा वापर त्यांनी एक प्रतिक म्हणून केला. त्या प्रतिकाच्या माध्यमातून त्यांनी ज्वलंत सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली. त्यांची देवाला उद्देशून असणारी गाणी भक्ती करणारी नव्हती. तर तक्रार करणारी गाणी होती. काही गाण्यांमधून त्यांनी देवाच्या अस्तित्वावरही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी भक्तीगीतातून चालू घडामोडीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. महागाई, हुंडाबळी आणि गरीबीवरून त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. शेतकरी, कामगारांचे प्रश्न मांडले आहेत. तूच सुखकर्ता, तूच दुखहर्ता हे गाणंही त्याच पठडीतलं होतं. त्यांनी आपल्या गीतांमधून चांगल्या पद्धतीने प्रबोधनाची बाजू मांडली आहे. गीतातील लोक प्रबोधन हा बाज त्यांनी कायम ठेवला. कॅसेट कंपनीत विभाग प्रमुख म्हणून काम करत असताना येणाऱ्या प्रत्येक प्रोजेक्टवर नोकरी म्हणून काम करावं लागायचं. पण वैयक्तिक गीतलेखनातून त्यांनी नेहमीच प्रबोधनाचं काम केलं होतं.

आता तरी देवा मला पावशील का?
सुख ज्याला म्हणतात ते दावशील का?

हे गाणं त्याचं उत्तम उदाहरण आहे. या गाण्यातून खोचक पण मर्मभेदी प्रश्न त्यांनी विचारला आहे. समाजातील नाही रे वर्गाचं दुख त्यांनी या गाण्यातून मांडलं आहे.

33 वर्ष विद्यादान

जाधव यांनी 33 वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली. यातील काही काळ त्यांनी मुख्याध्यापक म्हणूनही काम पाहिलं. पण या काळात आपला शिक्षकी पेशा सांभाळून त्यांनी गीत लेखन सुरूच ठेवलं. 1991 साली निवृत्त झाल्यानंतर त्यांनी गीतलेखन आणि समाजकार्य सुरुच ठेवलं होतं. त्यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शनवर मिळून 15 लोकनाट्ये सादर केली. दारुबंदी, साक्षरता, बाबासाहेबांचे जीवन कार्य, राष्ट्रीय एकात्मता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावरील लोकनाट्ये त्यांनी प्रभावीपणे सादर केली. त्यांचे गीत भीमायण सुद्धा लोकांनी प्रचंड उचलून धरले होते.

गाजलेली आंबेडकरी गीतं

हे खरंच आहे खरं, श्री भीमराव रामजी आंबेडकरं,
बाबासाहेब आंबेडकरं, नाव हे गाजतंय हो जगभरं…

आणि

लयास गेली युगा युगांची हीनदीन अवकळा,
पहा, पहा मंजुळा हा माझा भीमरायाचा मळा….

आणि

या दिनी होऊ दे, भीम जन्म पुन्हा

आणि

भीम सैनिका आता हो रे पुढे… (साभार, आंबेडकरी कलावंत) (know all about lyricist harendra jadhav)

संबंधित बातम्या:

‘तूच सुखकर्ता’ ते ‘माझ्या नवऱ्याने सोडलीया दारू…’; वाचा, हरेंद्र जाधवांची हिट गाणी कोणती?, ज्यांनी महाराष्ट्राला वेड लावलं

गाण्यासाठी उर्दू, अरबीही शिकल्या; निशा भगत यांची गाजलेली गाणी माहीत आहे का?

गाणं ऐकून रेल्वेचा अधिकारी म्हणाला, ‘बेटा, रेल मे नोकरी करोगी?’; वाचा, गायिका निशा भगत यांचा किस्सा

(know all about lyricist harendra jadhav)