‘क्रांतिज्योती विद्यालया’ची पोरं ठरली हुशार; पहिल्याच वीकेंडला जबरदस्त कमाई
हेमंत ढोमे दिग्दर्शित 'क्रांतिज्योती विद्यालय : मराठी माध्यम' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. अगदी पहिल्या दिवसापासून या चित्रपटाचे शोज हाऊसफुल जात आहेत. अशातच पहिल्या वीकेंडच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत.

मराठी भाषेच्या शाळांचं वास्तव दाखविणारा ‘क्रांतिज्योती विद्यालय: मराठी माध्यम’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. हेमंत ढोमे दिग्दर्शित या चित्रपटाची सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर जोरदार चर्चा सुरू आहे. हा चित्रपट पाहिलेल्यांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामुळे तिथेही ‘क्रांतिज्योती विद्यालय’ ट्रेंडिंगमध्ये आहे. एखाद्या विषयाला अगदी हलक्या-फुलक्या आणि तितक्याच प्रभावी पद्धतीने मांडण्याचं वकुब दिग्दर्शक हेमंत ढोमेमध्ये असल्याने पडद्यावर ते पाहतानाही प्रेक्षकांना फार मजा येते. ‘क्रांतिज्योती विद्यालय’च्या बाबतीतही हेच घडलंय. त्यामुळे बॉक्स ऑफिसवरही त्याचा सकारात्मक परिणाम पहायला मिळतोय. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला दमदार कमाई केली आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय’ हा चित्रपट पहिल्याच दिवसापासून अनेक शहरांमध्ये हाऊसफुल आहे. मराठी शाळेच्या आठवणींमध्ये रमलेले प्रेक्षक भावूक होऊन थिएटरबाहेर पडताना दिसत आहेत. चित्रपटातील आशय, संवाद, भावनिक क्षण आणि वास्तववादी मांडणी यांमुळे प्रेक्षकांशी थेट नाळ जुळली आहे. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनीच या चित्रपटाला डोक्यावर घेतलं आहे. प्रेक्षकांसोबतच समीक्षकांकडूनही या चित्रपटाला भरभरून दाद मिळतेय. त्याचसोबत मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियावरून या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं आहे. या चित्रपटाने पहिल्याच वीकेंडला 3.91 कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.
View this post on Instagram
“प्रेक्षकांचं प्रेम पाहून मी अक्षरश: भारावून गेलो आहे. आमच्या प्रत्येक चित्रपटावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलंय. मात्र यावेळी विषय फार वेगळा होता. एक संवेदनशील विषय आम्ही प्रेक्षकांसमोर मांडला आणि त्यांनी तो मनापासून स्वीकारला आहे. याचं खूप समाधान वाटतंय”, अशी प्रतिक्रिया दिग्दर्शक हेमंत ढोमेनं दिली आहे.
‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’ या चित्रपटात दिग्गज अभिनेते सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी अशी दमदार स्टारकास्ट आहे. या चित्रपटात हेमंतने पात्रांवर अधिक भर दिला आहे. या पात्रांच्या आधारे शिक्षणाकडे आणि मातृभाषेकडे पाहण्याचे विविध दृष्टीकोन त्याने कथेत मांडले आहेत. मराठी भाषा, मराठ भाषा यासंबंधीची सद्यस्थिती, प्रश्न, वास्तव या चित्रपटातून समोर येतात. या चित्रपटाचा विषय जरी सामाजिक असला तरी तो उपदेशपर वाटू नये, यासाठी हेमंतने पूर्ण प्रयत्न केले आहेत.
