कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या व्यथा सांगणार 52 वर्षांपूर्वीचं गाणं, जे ऐकताच कर्मचाऱ्यांना आठवतो स्वतःचा संघर्ष
कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या व्यथा माडणारं लता मंगेशकर यांचं 52 वर्षांपूर्वीचं गाणं, आजही अनेकांचं प्रचंड आवडतं. हे गाणं ऐकून कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांना आठवेल स्वतःचा संघर्ष!

बॉलिवूडमध्ये प्रेमकहाण्यांवर आधारित अनेक गाणी तयार झाली आहेत. मात्र, काही गाणी अशी आहेत, जी प्रेमासोबतच सामान्य माणसाच्या आयुष्यातील संघर्ष आणि अडचणींवर भाष्य करतात. 1974 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रोटी कपड़ा और मकान’ चित्रपटातील ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं याच प्रकारातील एक लोकप्रिय गाणं आहे. आजही या गाण्यातील भावना नोकरदार वर्गाशी जोडल्या जातात.
अभिनेत्री झीनत अमान आणि मनोज कुमार यांच्यावर चित्रित करण्यात आलेले ‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं लता मंगेशकर यांच्या आवाजात स्वरबद्ध करण्यात आले होते. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी संगीत दिले असून, वर्मा मलिक यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत.
गाण्यामध्ये कमी पगाराची नोकरी, कामाचा ताण आणि प्रेमासाठी पुरेसा वेळ न मिळणे, यांसारख्या भावनांचे चित्रण करण्यात आले आहे. गाण्यात झीनत अमान आपल्या प्रियकराच्या कमी पगाराच्या नोकरीमुळे नाराजी व्यक्त करताना दिसतात. नोकरीच्या जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक नात्यांमधील संघर्ष आजच्या नोकरदारांनाही अनुभवायला मिळतो.
चित्रपटाची कथा होती सामान्य माणसाभोवती
मनोज कुमार यांनी ‘रोटी कपड़ा और मकान’ या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. हा चित्रपट 18 ऑक्टोबर 1974 रोजी प्रदर्शित झाला. बेरोजगारी, महागाई आणि सामान्य माणसाच्या संघर्षावर आधारित या चित्रपटात मनोज कुमार, झीनत अमान, शशी कपूर, अमिताभ बच्चन, मौसमी चटर्जी आणि प्रेमनाथ यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.
चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. उपलब्ध माहितीनुसार, सुमारे 1.30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर अंदाजे 10.40 कोटी रुपयांची कमाई केली होती. 1974 मधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये त्याचा समावेश झाला.
आजही गाण्याची लोकप्रियता कायम
‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं सुरुवातीला अभिनेत्री मौसमी चटर्जी यांच्यावर चित्रित करण्याचा विचार होता. मात्र, त्यांच्या गर्भावस्थेमुळे गाणं झीनत अमान यांच्यावर चित्रित करण्यात आले अशी माहिती समोर येते.
‘हाय हाय ये मजबूरी’ हे गाणं केवळ प्रेम आणि विरहाच्या भावनांपुरते मर्यादित नाही तर नोकरी, आर्थिक अडचणी आणि नात्यांमधील अंतर यांचेही प्रतिबिंब दाखवते. त्यामुळे अनेक दशकांनंतरही हे गाणं जुन्या पिढीसोबतच आजच्या नोकरदार वर्गालाही भावते.
