‘मेड इन इंडिया’, ‘कजरा रे’च्या गायिकेला ओळखणंही कठीण; नेटकरी थक्क!
अलिशा चिनॉय गेल्या 14 वर्षांपासून इंडस्ट्रीपासून दूर असली तरी सोशल मीडियावर ती बऱ्यापैकी सक्रिय आहे. नुकताच तिने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो पाहून अलिशाला ओळखणंही कठीण झालं आहे.

बॉलिवूड इंडस्ट्रीत असे असंख्य गायक आणि गायिका आहेत, ज्यांनी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी गायली आहेत. नंतर अचानक ते इंडस्ट्रीतून गायब झाले. त्यापैकीच एक पॉप गायिका अलिशा चिनॉयसुद्धा आहे. तिने नव्वदच्या दशकात अनेक सुपरहिट गाणी गायली आहेत. परंतु नंतर अचानक ती बॉलिवूडपासून दूर गेली. आता पुन्हा एकदा ती सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. परंतु यावेळी आपल्या सुरेल आवाजामुळे किंवा गाण्यामुळे नाही तर बदललेल्या लूकमुळे. 60 वर्षीय पॉप गायिका अलिशा चिनॉयचा आताचा फोटो समोर आला आहे. हा फोटो पाहून नेटकरीसुद्धा थक्क झाले आहेत. हा फोटो अलिशाचाच आहे का, असा प्रश्न काही नेटकरी विचारत आहेत.
‘मेड इन इंडिया गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी अलिशा आता इतकी बदलली आहे की चाहते तिला ओळखूही शकत नाहीयेत. अलिशाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:चा हा फोटो पोस्ट केला आहे. ‘या क्षणाला हातून निसटू देऊ नका.. कारण लवकरच हा क्षण एक आठवण बनून राहील’, असं कॅप्शन देत तिने हा फोटो पोस्ट केला आहे. या फोटोवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. ‘ओह माय गॉड, हा फोटो खरंच अलिशा चिनॉयचा आहे का’, असा सवाल एकाने केला. तर ‘बोटॉक्सचा चुकीचा परिणाम झाला आहे’, असं दुसऱ्याने म्हटलंय. ‘मेड इन इंडिया.. आतासुद्धा लोकप्रिय आहे’, असंही काहींनी लिहिलं आहे.
View this post on Instagram
नव्वदच्या दशकात ‘लवर गर्ल’ आणि ‘दिल दे दे’ यांसारख्या इंडी-पॉप गाण्यांनी अलिशाला वेगळी ओळख मिळवून दिली. त्या दशकात पॉप गाण्यांची एक लाटच आली होती. पॉप संगीत आणि पॉप गाणी तेव्हा भारतात हळूहळू लोकप्रिय होऊ लागल्या होत्या. तेव्हाच अलिशाला तिच्या इंडी-पॉप गाण्यांनी लोकप्रियता मिळवून दिली. तिने बॉलिवूडमध्ये ‘रुक रुक रुक’, ‘सेक्सी सेक्सी’ आणि ‘टिंका टिंका’ यांसारख्या अनेक हिट गाणी गायली आहेत. परंतु गेल्या काही वर्षांपासून ती संगीतविश्वापासून दूर आहे. 2013 मध्ये तिचं शेवटचं गाणं ‘क्रिश’ या चित्रपटातील ‘दिल तू ही बता’ प्रदर्शित झालं होतं.
