Madhuri Dixit: महागडी, डिझायनर नव्हे तर माधुरी दीक्षितने लग्नात नेसलेली ‘या’ खास व्यक्तीची नऊवारी साडी
माधुरी आणि डॉ. श्रीराम नेने यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा 27 वा वाढदिवस साजरा केला. त्यांच्या नात्यातील जिव्हाळा आणि लग्नाच्या आठवणींविषयी माधुरीने केलेल्या या खुलाशामुळे चाहत्यांना तिची एक वेगळी बाजू पाहायला मिळणार आहे.

बॉलिवूडची धकधक गर्ल अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित तिच्या अभिनयासोबतच सौंदर्य, फॅशन आणि खास स्टाइलसाठीही ओळखली जाते. तिच्या प्रत्येक लूकची चाहत्यांमध्ये चर्चा रंगते. मात्र, माधुरीच्या लग्नातील साडीचा किस्सा ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. नुकतीच माधुरीने ‘कोण होणार करोडपती’ या सोनी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रमाच्या मंचावर आपल्या लग्नाच्या खास आठवणींना उजाळा दिला. विशेष म्हणजे, लग्नात माधुरीने कोणत्याही डिझायनरची साडी नव्हे, तर आपल्या आजीची सुंदर निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. तिच्या या आठवणीने कार्यक्रमातील वातावरणही खास झालं.
‘कोण होणार करोडपती’ या कार्यक्रमात स्पर्धकांना ज्ञानाच्या जोरावर लाखो रुपये जिंकण्याची संधी मिळते. मात्र, या कार्यक्रमात रंगणाऱ्या गप्पांमुळे प्रेक्षकांना कलाकारांच्या आयुष्यातील अनेक रंजक गोष्टीही जाणून घेता येतात. आगामी भागात अमरावतीची स्पर्धक आणि लवकरच विवाहबंधनात अडकणारी मृण्मयी किटुकले हिने माधुरीसोबत आपल्या लग्नाविषयी गप्पा मारल्या. मृण्मयीने तिच्या लग्नाची पहिली पत्रिका माधुरीला भेट दिली. आपल्या आयुष्यातील महत्त्वाच्या क्षणी माधुरीला सहभागी करून घेत तिने तिच्यासोबत आनंद वाटून घेतला. यानंतर मृण्मयीने माधुरीकडे ब्रायडल स्टाइलिंगबाबत काही खास टिप्स मागितल्या. माधुरीच्या साडीतील लूकचे स्क्रीनशॉट्सही तिने इन्स्पिरेशनसाठी सेव्ह करून ठेवल्याचं सांगितलं. लग्नाच्या दिवशी कोणत्या प्रकारची साडी नेसावी, याबाबत तिने माधुरीचा सल्ला घेतला.
लग्नाच्या पोशाखाविषयी चर्चा सुरू असताना पारंपरिक भडक रंग आणि सध्या लोकप्रिय असलेले पेस्टल रंग यांचाही विषय निघाला. त्यावेळी माधुरीने स्वतःच्या लग्नातील साडीचा भावनिक किस्सा सांगितला. डॉ. श्रीराम नेने यांच्यासोबत विवाह करताना तिने आपल्या आजीची निळ्या रंगाची नऊवारी साडी नेसली होती. या साडीवर फुलांची सुंदर एम्ब्रॉयडरी असलेली शालही तिने घेतली होती. आपल्या लग्नाच्या पोशाखाविषयी बोलताना माधुरी म्हणाली, “मी माझ्या लग्नात माझ्या आजीची साडी नेसलेली. नऊवारी साडी आणि ती अशी ब्लू कलरची होती. खूप सुरेख ब्लू होता आणि त्याच्यावर मी शाल घेतली होती, ज्याच्यावर फुलांची एम्ब्रॉयडरी केलेली होती. तर असा पर्सनल टच त्यात असला पाहिजे.”
लग्नाच्या दिवशी काय परिधान करावं, याबाबत सल्ला देताना माधुरीने नववधूंना स्वतःच्या आवडीला प्राधान्य देण्यास सांगितलं. तिच्या मते, लग्नाचा पोशाख निवडताना केवळ ट्रेंड किंवा इतरांच्या अपेक्षांचा विचार न करता आपल्याला काय आवडतं, हे महत्त्वाचं आहे. “तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही नेसलं पाहिजे. कारण तो दिवस खास तुमचा असतो आणि तुमच्या कुटुंबाचा असतो. तर शुड बी युअर चॉईस,” असं माधुरीने सांगितलं.
