एअर इंडियाच्या त्या कोसळलेल्या विमानाशी काहीही संबंध नसताना मंदिरा बेदीवर आघात, उचलावं लागलं मोठं पाऊल
अभिनेत्री मंदिरा बेदीने अहमदाबाद विमान दुर्घटनेचा चांगलाच धसका घेतला आहे. या घटनेचा मानसिक स्थितीवर परिणाम झाल्याचं तिने म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने मोठं पाऊल उचललं आहे.

एअर इंडियाच्या अहमदाबाद-लंडन विमानाला गुरुवारी 12 जून रोजी दुपारी सरदार वल्लभभाई पटेल विमानतळानजीक झालेला भीषण अपघात हळहळ व्यक्त करण्याबरोबरच अनेक प्रश्न उपस्थित करणाराही ठरला. या विमान अपघातात अनेकांनी आपले प्राण गमावले. या घटनेचा केवळ मृतांच्या नातेवाईकांवरच नाही तर इतर अनेकांवर खूप वाईट परिणाम झाला. अभिनेत्री मंदिरा बेदी नुकतीच याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली. विमान अपघाताच्या या घटनेचा तिच्या मनावर खोलवर परिणाम झाल्याचं तिने सांगितलं आहे. तिच्या मनावर हा इतका मोठा आघात होता की त्यातून बाहेर पडण्यासाठी तिने मोठं पाऊल उचललं आहे. यासोबतच तिने तिच्या भावनाही नेटकऱ्यांसमोर मांडल्या आहेत.
12 जून रोजी अहमदाबादमध्ये झालेल्या विमान अपघाताने संपूर्ण देशाला हादरवून टाकलं आहे. या घटनेला काही दिवस उलटले असले तरी लोक अजूनही त्याच्या धक्क्यातून सावरत आहेत. या घटनेत 270 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनीही यावर पोस्ट लिहून शोक व्यक्त केला आहे. अलीकडेच मंदिरा बेदीनेही याविषयी व्हिडीओ पोस्ट केला. या अपघाताचा तिच्या मनावर खूप परिणाम झाल्याचं तिने सांगितलं आहे.
View this post on Instagram
सोशल मीडियावरील व्हिडीओद्वारे मंदिराने खुलासा केला की या धक्क्यातून सावरण्यासाठी तिला एका समुपदेशकाची (काऊन्सलर) मदत घ्यावी लागली. “ती घटना माझ्या मनातून बाहेर पडतच नव्हती. मला आतून त्याचा खूप त्रास होत होता. या घटनेमुळा माझ्या सर्व कामांवर परिणाम होत होता. जरी मी माझ्या मुलांसोबत वेळ घालवला, तरी मनातून ती घटना जात नव्हती”, असं तिने या व्हिडीओमध्ये म्हटलंय.
“अहमदाबाद विमान अपघातानंतर माझ्या छातीवर सतत एक ओझं जाणवत आहे. हे एक अशा प्रकारचं दु:ख आहे जे संपत नाहीये. मी काम करताना, माझ्या मुलांसोहत वेळ घालवतानाही मला सतत त्याचा विचार येतोय. आता मी एकटीच या गोष्टीचा सामना करणार नाही. तर एखाद्या सल्लागाराची मदत घेईन. जर तुम्हालाही नैराश्य, चिंता किंवा मानसिक असंतुलन जाणवत असेल तर तुम्ही एकटे नाही आहात”, अशा शब्दांत ती व्यक्त झाली.
