फक्त मुंब्रा नको, संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा; कैसे हराया म्हणणाऱ्या AIMIMच्या नगरसेविकेला मराठमोळ्या अभिनेत्याचा टोला
मराठमोळ्या अभिनेत्याने AIMIMच्या 'कैसे हराया' म्हणणाऱ्या नगरसेविकेला चांगलेच उत्तर दिले आहेत. तो काय म्हणाला जाणून घ्या...

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुका झाल्या आणि 16 जानेवारी रोजी त्यांचे निकाल जाहीर झाले. मुंब्रा भागात AIMIM पक्षाच्या सहर शेख या युवा उमेदवार नगरसेविका म्हणून निवडून आल्या. विजयानंतर सहर शेख यांनी एका भाषणात जितेंद्र आव्हाड यांना लक्ष्य करत “कैसा हराया…” असं म्हणत त्यांची खिल्ली उडवली. तसेच, “पुढच्या पाच वर्षांत संपूर्ण मुंब्रा हिरवा करून टाकू” असं वक्तव्य केलं. या विधानामुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली आणि मोठा वाद निर्माण झाला. आता यावर मराठमोळ्या अभिनेत्याने पोस्ट केली आहे. त्याने जी काही पोस्ट केली आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
कोण आहे तो अभिनेता?
याच पार्श्वभूमीवर मराठी अभिनेता अभिजीत केळकरने सहर शेख यांच्या वक्तव्याला सडेतोड आणि हास्यपूर्ण उत्तर दिलं. अभिजीत यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला. त्यात ते बागेत रोप लावताना दिसतात आणि म्हणतात, “हरा कर दिया ना… अरे मी तर म्हणतो फक्त मुंब्रा नाही, संपूर्ण हिंदुस्तान हिरवं करा. काय ताई…? नाही कळलं?”
View this post on Instagram
काय म्हणाला अभिनेता?
पुढे ते म्हणतात, “अहो, आमच्यात पण हिरवं करतात, पण ते तसं नाही… असं… झाडे लावा, झाडे जगवा! वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे!” व्हिडीओ शेअर करत अभिजीत यांनी दिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “फक्त मुंब्रा नको, अख्खा हिंदुस्थान, पृथ्वी ‘हिरवी’गार करून टाका… झाले लावा झाडे जगवा” असे ते म्हणाले. या पोस्टला नेटकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. “छान उत्तर दिलंस… जय महाराष्ट्र जय शिवराय”, “भारी अभिजीत दादा” अशा कमेंट्सनी पोस्ट भरली.
दरम्यान, वाद वाढल्यानंतर सहर शेख यांनी पत्रकार परिषदेत स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या, “आमच्या पक्षाचा झेंडा हिरवा आहे, म्हणून मी ‘हिरवा’ असं म्हटलं. जर झेंडा वेगळ्या रंगाचा असता तर त्या रंगाचं नाव घेतलं असतं. माझ्या हातात हिरवा आणि भगवा असे दोन्ही धागे आहेत. माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढू नका.” या परिषदेत AIMIM नेते इम्तियाज जलील यांनीही “मुंब्राच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हिरवा करू” असं म्हणत वादाला आणखी हवा दिली.
