भीषण अपघातानंतर अभिनेत्री उर्मिला कोठारेचा मोठा निर्णय, कोर्टात घेतली धाव
गेल्या वर्षाच्या शेवटी, 28 डिसेंबरला विख्यात मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या ड्रायव्हरने भरधाव वेगाने गाडी चालवत मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं होतं. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि उर्मिला, तिचा ड्रायव्हर आणि एक कामगार हे गंभीर जखमी झाले .

गेल्या वर्षाच्या शेवटी, 28 डिसेंबरला विख्यात मराठी अभिनेत्री उर्मिला कानिटकर कोठारे हिच्या कारचा भीषण अपघात झाला होता. उर्मिलाच्या ड्रायव्हरने भरधाव वेगाने गाडी चालवत मेट्रोचं काम करणाऱ्या दोन मजुरांना उडवलं होतं. ज्यामध्ये एकाचा मृत्यू झाला आणि उर्मिला, तिचा ड्रायव्हर आणि एक कामगार हे गंभीर जखमी झाले होते. या अपघातात उर्मिलाच्या कारचाही चक्काचूर झाला होता. या अपघाताला आता जवळपास दीड महिना उलटून गेलेला असून त्याचदरम्यान उर्मिलाने एक मोठा निर्णय घेतला आहे. या अपघाताप्रकरणी तिने मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या या अपघाताचा तपा, सीआयडी किंवा अन्य तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशी मागणी तिने या याचिकेतून केली आहे. फौजदारी याचिकेच्या माध्यमातून तिने मुंबई उच्च न्यायालयात ही मागणी केली असून मुंबई पोलीस हे सीसीटीव्ही फुटेज देत नसल्याची तक्रारही तिने याचिकेत केली आहे.
काय म्हटलं आहे याचिकेत ?
जिथे हा अपघात झाला तिथले सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी विनंती उर्मिलाच्यावतीने याआधी मुंबई पोलिसांकडे करण्यात आली होती. मात्र तिथं सीसीटीव्हीच नसल्याचं पोलीस सांगत आहेत. त्यानंतर उर्मिलाने हायकोर्टात धाव घेत याचिका केली. मुंबई पोलीस एका खासगी कंपनीला पाठीशी घालत असल्याचा कोठारेंचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. तसेच मेट्रोच्या कामामुळे रस्ता खोदलेला होता, तिथे कोणतेही योग्य दिशादर्शक फलकही तिथं लावलेले नव्हते असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. त्यामुळे कंत्राटदारही तितकाच जबाबदार असल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकेची दखल घेत हायकोर्टाने या अपघाताचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांना नोटीस जारी केलीय. त्यामुळे दोन आठवड्यांनी होणाऱ्या पुढील सुनावणीत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टाने समता नगर पोलीस ठाण्याला दिले आहेत.
नेमकं काय झालं होतं ?
28 डिसेंबर 2024 रोजी उर्मिला कोठारेच्या कारचा कांदिवली परिसरातील पोईसर मेट्रो स्टेशनजवळ अपघात झाला होता. या घटनेत तिच्या कारने दोन मजुरांना धडक दिली , त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. तर अभिनेत्री उर्मिला कोठारे देखील गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी अभिनेत्रीचे कार चालक गजानन पाल यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलिसांकडून या अपघाताचा तपास सुरू आहे.
अपघातानंतर काही दिवसांनी जानेवारी महिन्यात उर्मिलाने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला होता, ज्यामध्ये ती, तिची मुलगी आणि वडील गणपती बाप्पासमोर नमस्कार करताना दिसले. त्या फोटोच्या कॅप्शनमध्ये उर्मिलाने तिच्या कार अपघाताविषयी माहिती दिली होती.