Dashavatar: ‘दशावतार’ ठरला संस्कृती, बॉक्स ऑफिसचा राखणदार, स्पेशल स्क्रिनींग करत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक
Dashavatar: 'दशावतार' सिनेमाचा फक्त महाराष्ट्रातच नाही तर, 'या' राज्यांमध्ये देखील बोलबाला, स्पेशल स्क्रिनींग करत मुख्यमंत्र्यांकडून कौतुक, सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त 'दशावतार' सिनेमाची चर्चा सुरु आहे.

Dashavatar: गेल्या काही दिवसांपासून ‘दशावतार’ सिनेमा बॉक्स ऑफिस आणि चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. ‘दशावतार’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सिनेमाचे सर्व शो हाऊसफूल होत आहेत. सर्वच स्तरातून ‘दशावतार’ सिनेमाचं कौतुक होत आहे. एवढंच नाही तर, दिग्गज अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचं देखील सर्वत्र कौतुक होत आहे. वयाच्या 81 व्या वर्षी मोठ्या पडद्यावर दिलीप प्रभावळकर यांनी साकारलेली भूमिका सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
सर्वच स्तरातून कौतुक होत असताना गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी संपूर्ण टीमला विशेष आमंत्रण देत त्यांचं अभिनंदन केलं आहे. दिलीप प्रभावळकर यांचा सन्मान प्रमोद सावंत म्हणाले, ‘दशावतार हा लोकप्रकार सिंधुदुर्ग, कारवार येथे मोठ्या प्रमाणात होतो. पण गोव्यात देखील हा लोकप्रकार तितकाच लोकप्रिय आहे. मला आनंद आहे, या सिनेमाच्या निमित्ताने दशावतार ही कला जागतिक पातळीवर जात आहे…’ यावेळी दशावतार सिनेमाचं स्पेशल स्क्रिनींगही करण्यात आलं.
कुठे झालं सिनेमाचं शुटिंग…
दिग्दर्शक सुबोध खानोलतर यांनी सांगितल्यानुसार, ‘सिनेमाचं बहुतांश शुटिंग कुडाळ आणि गोवा सीमेवर झालं आहे. म्हणून गोंयकर प्रेक्षकांना सिनेमा आपलासा वाटत आहे. कोकण व गोव्याची संस्कृती व परंपरा एकमेकांना जोडून ठेवतात, त्यामुळे गोव्याच्या प्रेक्षकांनीही या चित्रपटाला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.’ सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त ‘दशावतार’ सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांनी देखील सिनेमा डोक्यावर घेतला आहे.
सिनेमातील कलाकार
सांगायचं झालं तर, ‘दशावतार’ या भव्य मराठी ब्लॉकबस्टर सिनेमाने फक्त महाराष्ट्रातच नाही तर, गोवा, दिल्ली, आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्यप्रदेश अशा अनेक राज्यांत जबरदस्त यश संपादन केले आहे. ‘दशावतार’ सिनेमात दिलीप प्रभावळकर, महेश मांजरेकर, भरत जाधव, विजय केंकरे, सिद्धार्थ मेनन, प्रियदर्शिनी अशी कलाकारांची फौज या चित्रपटात आहे. थिएटरमध्ये ‘दशावतार’ चित्रपटाचे शोज हाऊसफुल्ल होत आहेत.
सिनेमा ऑनलाईन लीक
कोकणातील परंपरेची झलक दाखवणारा सिनेमा ऑनलाईन लीक झाला आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा तगडी कमाई करत असताना लिक झाल्यामुळे सिनेमाच्या टीमने चिंता व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर, ऑनलाईन सिनेमा लिक करु नका… अशी विनंती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून केली आहे.
