झाडीपट्टीची झलक दाखवणारा ‘झॉलीवूड’चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

झाडीपट्टीची झलक दाखवणारा 'झॉलीवूड'चा ट्रेलर रिलीज, चित्रपट 3 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला

झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच या चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. झाडीपट्टी नाटक करताना येणाऱ्या अडचणी, नाटकासाठी अभिनेत्री म्हणून मुलगी न मिळणं, नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, नाटक करतानाचे वादविवाद अशी धमाल या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून दिसून येतं.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: आयेशा सय्यद

May 25, 2022 | 8:10 AM

मुंबई : झाडीपट्टी नाटकाची धमाल दाखवणाऱ्या झॉलीवूड चित्रपटाचा (Zollywood Movie) ट्रेलर (Zollywood Trailer)  सोशल मीडियाद्वारे लाँच  करण्यात आला. बऱ्याच राष्ट्रीय-आंतररष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला, पुरस्कारप्राप्त ‘झॉलीवूड’ हा चित्रपट 3 जून रोजी प्रदर्शित होत असून, पहिल्यांदाच झाडीपट्टी नाटकाचं खरंखुरं चित्रण या चित्रपटातून मांडण्यात आलं आहे. नागराज मंजुळेसारख्या मान्यवर दिग्दर्शकाने चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत.

विशबेरी फिल्म्सच्या प्रियंका अगरवाल, अंशुलिका दुबे, शाश्वत सिंग यांनी चित्रपटाची निर्मिती केली असून अमित मसूरकर आणि डयुक्स फार्मिंग फिल्म्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत तर न्यूटन, शेरनी, सुलेमानी किडा असे दर्जेदार चित्रपट दिग्दर्शित केलेले अमित मसूरकर या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्यूसर आणि प्रस्तुतकर्ते आहेत. हा चित्रपट नव्या दमाचा दिग्दर्शक तृषांत इंगळेनं दिग्दर्शित केला आहे. तृषांत या चित्रपटातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. झाडीपट्टी नाटकांची विदर्भात प्रचंड लोकप्रियता आहे, त्या भागात झाडीपट्टी ही जणू स्वतंत्र इंडस्ट्रीच आहे. पण उर्वरित महाराष्ट्रात झाडीपट्टीविषयी फारशी माहिती नाही. त्यामुळे ‘झॉलीवूड’मधून पहिल्यांदाच झाडीपट्टी चित्रपटाच्या रुपात जगभरात पोहोचणार आहे. झॉलीवूड हा चित्रपट बऱ्याच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये दाखवला गेला आहे. राज्य पुरस्कारांमध्येही या चित्रपटानं नामांकनं मिळवली आहेत.

झाडीपट्टी रंगभूमीवरच्या कलाकारांनीच या चित्रपटातील भूमिका साकारल्या आहेत हे महत्त्वाचं वैशिष्ट्य. झाडीपट्टी नाटक करताना येणाऱ्या अडचणी, नाटकासाठी अभिनेत्री म्हणून मुलगी न मिळणं, नाटकाला प्रेक्षकांचा मिळणारा प्रतिसाद, नाटक करतानाचे वादविवाद अशी धमाल या चित्रपटात असल्याचं ट्रेलरमधून दिसून येतं. मात्र मातीशी जोडलेलं दमदार कथानक, अस्सल वैदर्भीय भाषा, खरेखुरे कलाकार या चित्रपटात असल्यानं चित्रपटाला वैदर्भीय सुगंध आहे. म्हणून चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. आता ३ जूनला चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रतीक्षी आहे.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें