आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!

महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रात सध्या शिंदेशाही खूप गाजत आहे. (marathi playback singer anand shinde and his first stage performance)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:19 PM, 7 Mar 2021
आजी-आजोबा गाणं गात भिक्षा मागायचे, पहिल्याच स्टेज परफॉर्मन्सवेळी ड्रेस नव्हता; वाचा, आनंद शिंदेंची फिनिक्स भरारी!
anand shinde

मुंबई: महाराष्ट्रातील संगीतक्षेत्रात सध्या शिंदेशाही खूप गाजत आहे. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे ते आनंद-मिलिंद आणि आता आदर्श शिंदे अशा तीन पिढ्यांनी महाराष्ट्राच्या मनावर गारुड निर्माण केलं आहे. शिंदेशाहीचं हे यश वाटतं तितकं सोपं नाही. या यशापर्यंत पोहोचण्यासाठी आनंद शिंदे यांचे आजोबा भगवान शिंदे यांच्यापर्यंतच्या तीन पिढ्यांना संघर्ष करावा लागला. प्रसंगी आजोबांना भिक्षाही मागावी लागली आहे. आनंद शिंदे यांच्याच शब्दातील हा संघर्ष वाचाच. (marathi playback singer anand shinde and his first stage performance)

आजी-आजोबा भिक्षा मागायचे

आनंद शिंदे यांचे आजोबा भगवानबाबा हे हार्मोनियम वाजवायचे. तर आजी सोनाबाई तबला वाजवायच्या. त्यांचं घराणं चोखामेळा परंपरेतील गोसावी घराणं होतं. गाणी, भजनं आणि किर्तन करून त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. हार्मोनियमवर गाणी गात त्यांचे आजी-आजोबा भिक्षा मागायचे. आमच्या पूर्वजांपासून चालत आलेली गाण्याची ही कला माझ्याकडे आली. आता माझ्या मुलांकडे आली आहे, असं आनंद शिंदे सांगतात.

पहिलंच गाणं, पण कपडे नव्हते

आनंद शिंदे यांचं बालपण कल्याणच्या कोळशेवाडीतील सिद्धार्थ नगरमध्ये गेलं. तिथेच त्यांचं शिक्षणही झालं. शाळेत असतानाच त्यांना कोळशेवाडीतील मंडईच्या स्टेजवर गाण्याची संधी मिळाली. मनोहर लोकरे म्हणून कवी होते. त्यांचं…

लेवून आरती सुगंधी फुला,
आलो शरण गणराया तुला… !!!

हे गाणं त्यांनी पहिल्यांदा स्टेजवर गायलं. त्यांचा हा पहिला सार्वजनिक परफॉर्मन्स होता. पण स्टेजवर जाऊन गाणं गाण्यासाठी त्यांच्याकडे ड्रेसही नव्हता. त्यामुळे शाळेच्याच ड्रेसवर स्टेजवर जाऊन त्यांनी हे गाणं गायलं होतं.

एकच खंत

आनंद यांनी गायक म्हणून स्वत:ला प्रस्थापित केलं आहे. त्यांच्या गाण्याचा वेगळा लहेजा आहे. त्यांचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. आज आनंद शिंदेंकडून गाणं गाऊन घ्यायचं म्हणून गाणं लिहिलं जातं. फार कमी गायकांच्या वाट्याला हे भाग्य येतं. त्यातले आनंद एक आहेत. पण एवढं यश मिळूनही त्यांना आज एका गोष्टीची खंत वाटते. शास्त्रोक्तपद्धतीने गाणं गायला शिकता आलं नाही किंवा शिकायला मिळालं नाही, असं ते सांगतात. शास्त्रोक्त पद्धतीने गाणं गायला शिकलो असतो तर अधिक चांगलं झालं असतं त्यांना वाटतं. पण आपल्या मुलाने आदर्शने आपलं हे स्वप्न सुद्धा पूर्ण केल्याचं ते सांगतात. वडील प्रल्हाद शिंदे यांच्यासोबत कव्वाली सामने आणि गायन पार्ट्यांमध्ये जाऊन त्यांना तबल्याची साथ करायचो. त्याचवेळी कोरसही करायचो. कोरस करता करताच गाणं कसं गायचं हे वडिलांना पाहून शिकलो. गाण्याची फेक, शब्दोच्चार, आवाजाचा चढ-उतार हे सर्व पाहूनच शिकलो. शिवाय गाणं गाताना त्या गाण्याचे भाव काय आहेत? हे आधी पाहतो आणि मग त्यानुसार गाण्यात समरस होऊन गाणं गातो. जोपर्यंत तुम्ही गाण्यात समरस होत नाही, तोपर्यंत कोणतंही गाणं उत्तम आणि दर्जेदार होत नाही, त्यासाठी गायकाने गाण्यात समरस झालंच पाहिजे, असा संदेशही ते नवोदित गायकांना देतात.

गायकी टिकून ठेवा

नवोदित गायकांना गायक म्हणून टिकून राहण्यासाठी आनंद अत्यंत मोलाचा सल्ला देतात. तुम्हाला स्पर्धेत भाग घ्यायचा तर जरूर घ्या. स्पर्धेत पराभूत झाला तरी हरकत नाही. पण सहजासहजी हार मानू नका. शेवटपर्यंत किल्ला लढवा. तुमच्यातही काही तरी वेगळंपण आहे हे परीक्षकांना दिसलं पाहिजे. माझा मुलगा आदर्श जेव्हा स्पर्धेत भाग घेण्यासाठी गेला तेव्हा त्याला मी हाच सल्ला दिला होता, असं ते सांगतात. तसेच गायन क्षेत्रात आल्यावर हुरळून जाऊ नका. काही लोक सुरुवातीला गाणं शिकायचं म्हणून खूप मेहनत घेतात. नंतर नंतर ते ढेपाळतात. गायकीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ते या क्षेत्रातून बाद होतात. वंचित घटकातील गायकांच्याबाबतीत असं नेहमीच होतं. त्यामुळे तुम्ही जर या क्षेत्रात येत असाल तर तुमची कला कायम टिकवून ठेवा. यश मिळो वा न मिळो गायकी टिकवून ठेवा… उशिरा का होईना पण यश मिळेलच, असंही ते सांगतात. (marathi playback singer anand shinde and his first stage performance)

संबंधित बातम्या:

बाप महाराष्ट्राचा स्वर सम्राट, मुलगा सेंच्युरी मिलमध्ये; अशी झाली मिलिंद शिंदेंची जडणघडण

आडनाव टाकलं अन् मुंबई गाठली; ‘पोपट फेम’ आनंद शिंदेंचं खरं आडनाव माहिती आहे का?

दहा हजारांच्या नोटांवर झोपवून बारसं, पत्नीसाठी जोडवेही सोन्याचे; आनंद शिंदेंचे हे किस्से माहीत आहेत काय?

‘पोपटा’चं गाणं सर्वात आधी कुणी गायलं?; आनंद शिंदेंकडे ते कसं आलं?; वाचा आनंद शिंदेंना स्टार बनविणाऱ्या गाण्याचा किस्सा!

(marathi playback singer anand shinde and his first stage performance)