AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

REVIEW : युवा पिढीची गोष्ट सांगणारा ‘मिस यू मिस्टर’

सिनेमातले छोटे छोटे प्रसंग तुम्हाला कधी हसवतात तर कधी रडवतात. सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला आपलंस वाटू लागतं. फक्त समीरनं पटकथेचा पसारा जरा आवरता घेतला असता तर हा सिनेमा अजून जास्त प्रभावशाली झाला असता

REVIEW : युवा पिढीची गोष्ट सांगणारा 'मिस यू मिस्टर'
| Updated on: Jun 27, 2019 | 5:24 PM
Share

आज युवापिढीमध्ये पैसे कमवण्यासाठी असलेली चढाओढ, स्पर्धेच्या युगात पैसा कमावणं हे एकच ध्येय असल्यामुळे नात्यांमध्ये येणारा दुरावा आणि नात्यात विसंवाद निर्माण झाला की त्याचे काय परिणाम होतात हे प्रकर्षानं दाखवणारा चित्रपट म्हणजे ‘मिस यू मिस्टर’… व्यावसायिक, आर्थिक प्रगती व्हावी या उद्देशानं अनेक तरुणांच्या महत्त्वांकाक्षा वाढल्या आहेत.  याच महत्त्वाकांक्षेमुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात त्सुनामी येणार असल्याची चाहुल मात्र त्यांना लागत नाही आणि जेव्हा याची जाणीव त्यांना होते तोपर्यंत खुप उशीर झालेला असतो. मग पुन्हा ती नाती जुळवण्यासाठी कशी धडपड करावी लागते. अगदी हेच दिग्दर्शक समीर हेमंत जोशी यांनी ‘मिस यू मिस्टर’ या सिनेमात अचूक हेरण्याचा प्रयत्न केला आहे.

पहिला पाऊस पडल्यावर फुलणाऱ्या टवटवीत पालवीसारखी या सिनेमाची सुरुवात होते. पण नंतर मात्र पटकथेत बराच पसारा झाल्यामुळे अपेक्षित परिणाम साधण्यात मात्र हा सिनेमा अयशस्वी ठरला आहे. सिनेमाला मिळालेली ट्रीटमेंट फ्रेश आहे, मात्र काही गोष्टींवर लक्ष केंद्रित केलं असतं तर हा सिनेमा नक्कीच उजवा ठरला असता.

कथेची सुरुवात

वरुण(सिध्दार्थ चांदेकर) आणि कावेरी(मृण्मयी देशपांडे) या दोघांची मिस यू मिस्टर या सिनेमात कथा दाखवली आहे. नव्यानं लग्न झालेलं या जोडप्याचं आपलं स्वत:चं ऑफिस असावं अशी इच्छा असते. त्यासाठी त्यांची धडपडही सुरु असते. वरुणला कंपनीच्या कामानिमित्त 18 महिन्यांसाठी लंडनला जाण्याची संधी मिळते. त्यामुळे जोडप्याकडे मग १८ महिने वेगळे राहण्याशिवाय पर्याय उरत नाही. आधी सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलवर आधी वरुण-कावेरी तासनतास बोलून एकमेकांशी संवाद साधतात. पण मग हळूहळू छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांच्यात खटके उडू लागतात. एकमेकांपासून वेगळे राहिल्याने या नवविवाहित जोडप्याच्या वैवाहिक जीवनावर परिणाम व्हायला सुरुवात होते. इगो प्रॉब्लेम, विसंवाद, मी पणा यामुळे वरुण-कावेरीमध्ये दुरावा येऊ लागतो. वरुण 18 महिन्यांनी पुन्हा भारतात परततो पण तोपर्यंत हे नातं तुटण्याच्या मार्गावर असतं. तरीही वरुण कावेरीची समजून काढून सगळ्या प्रॉब्लेमवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतो. पण पुन्हा एकदा अशी काही घटना घडते की कावेरी वरुणपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेते. आता ती घटना नेमकी काय? वरुण-कावेरी परत एकत्र कसे येतात? व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्य या द्विधा मनःस्थितीत अडकलेला वरुण कसा मार्ग काढतो ?, दोघांचं स्वप्न असलेले त्यांचं स्वत:चं ऑफिस पूर्ण होतं का? मी पणावर प्रेम मात करण्यात यशस्वी ठरतं का हे बघण्यासाठी तुम्हाला ‘मिस यू मिस्टर’ बघावा लागेल.

सिनेमाचा शेवट ताणल्यासारखा

खरंतर वरुण आणि कावेरीसारखी अनेक जोडपी आज आपल्या आजूबाजूला आहेत. पैसा कमावण्याच्या नादात आपली नाती विस्कळीत होतांना त्यांना दिसत असतं पण तरीही आपल्या अतिमहत्त्वाकांक्षेमुळे ते याकडे कानाडोऴा करतात. समीर जोशीनं दिग्दर्शक म्हणून सिनेमाला दिलेली ट्रीटमेंट उत्तम आहे. पण सिनेमाचा शेवट उगाचच ताणल्यासारखा वाटतो.

सिनेमातले छोटे छोटे प्रसंग तुम्हाला कधी हसवतात तर कधी रडवतात. सिनेमातील प्रत्येक पात्र आपल्याला आपलंस वाटू लागतं. कथा खूप फिल्मी किंवा ड्रॅमिटीक पध्दतीनं सांगण्यापेक्षा अगदी सरळ-सोप्या पध्दतीनं सांगितली आहे. पण काही गोष्टींमध्ये तुम्हाला नाविन्याचा अभाव जाणवतो. बऱ्याच गोष्टी आपण याआधीही बघितल्यासारख्या वाटतात. सगळ्यात महत्त्वाचं वरुण आणि कावेरीच्या नात्यात दुरावा येतो या घटना वरवरच्या वाटतात. त्यामुळे समीरनं जर या बारकाव्यांवर लक्ष दिलं असतं तर बरं झालं असतं.

चित्रपटाच्या शेवटी एक प्रसंग आहे. ज्यामध्ये वरुण कावेरीला समजवण्यासाठी तिच्या घरी जातो, तिची समजूतही काढतो, त्यांच्यावर एक रोमॅण्टिक गाणंही यावेळी चित्रीत करण्यात आलं आहे. त्या प्रसंगानंतर अचानक कावेरीची आई घरी येते आणि कावेरीची तारांबळ उडते. ती वरुणला पटकन घरातून जायला सांगते, तेव्हा वरुण तिला आपलं लग्न झालं असल्याची आठवण करुन देतो. आज महत्त्वाकांक्षेपोटी आपण आपल्याच लोकांपासून किती दुरावलो आहोत याची आठवण या एका संवादावरुन होते.

पटकथा चांगली, पण पसारा जास्त

प्रत्येक नातं समंजसपणा, आपसात घडणारा संवाद यावर अवलंबून असतं. जर आपण वेळीच या गोष्टींवर लक्ष दिलं नाही तर तुम्ही पैसे, नाव, प्रसिध्दी तर कमवाल, पण या यशाचा आनंद चाखण्यासाठी फक्त आणि फक्त एकाकीपणा शिवाय दुसरं कोणीही तुमच्यासोबत नसेल. त्यामुळे प्रत्येक नात्यात आपल्या पार्टनरला समजून घेतले. तर या सगळ्या अनाकलनीय गोष्टी टळू शकतात, हे या सिनेमातून उत्तमरित्या अधोरेखित करण्यात आलं आहे. फक्त समीरनं पटकथेचा पसारा जरा आवरता घेतला असता तर हा सिनेमा अजून जास्त प्रभावशाली झाला असता.

‘येशील तू’ गाणं मात्र जबरदस्त

सिध्दार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांनी सिनेमात उत्तम काम केलंय. सिध्दार्थनं रंगवलेला वरुण भन्नाट आहे. व्यावसायिक आयुष्य की वैयक्तिक आयुष्य ही वरुणची होणारी घालमेल त्यानं उत्तम रंगवली आहे. मृण्मयीनं साकारलेली कावेरी अल्लड, समंजस आहे. पण तेवढीचं कावेरीला खमकी,लाजवाबही मृण्मयीने सांगितले. बऱ्याच प्रसंगात तर फक्त चेहऱ्यावरील हावभावाने मृण्मयीने बाजी मारली आहे. वरुणच्या आईवडिलांच्या भूमिकेत रंजन भिसे आणि सविता प्रभुणे यांनी उत्तम काम केलं आहे. विशेषत: सविता ताईंनी स्मार्टफोनच्या आहारी गेलेली सासू धमाल रंगवली आहे. ज्या गोष्टी प्रत्यक्ष आपण मुलांशी आपण बोलू शकत नाही त्या व्हाट्सअपच्या माध्यमातून काव्यात्मक रितीनं व्यक्त होण्याची त्यांची पध्दत खरंच लाजवाब आहे. श्री जाधवांच्या छोट्या भूमिकेत मात्र ऋषिकेश जोशी तितकासा जमलेला नाही. मुळात या पात्राची सिनेमात खरंच गरज होती का असा प्रश्न मला पडला आहे. अनिवाश नारकर, राधिका विद्यासगर, दीप्ती लेले यांनीही आपल्या भूमिका चोख निभावल्या आहेत. सिनेमाचं संगीत ठीकठाक आहे. सोनू निगमनं गायलेलं ‘येशील तु’ हे गाणं मस्त जमून आलं आहे.

एकूणच काय तर दिग्दर्शक समीर जोशीनं जर पटकथेवर अजून काम केलं असतं तर नक्कीच हा सिनेमा अजून आपलासा वाटला असता.

‘टीव्ही नाईन मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय अडीच स्टार्स…

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.