REVIEW : राजकारण की प्रेमकथा, द्वंद्वामध्ये अडकलेला ‘कागर’

REVIEW : राजकारण की प्रेमकथा, द्वंद्वामध्ये अडकलेला 'कागर'

सध्या देशात निवडणुकीचे वारे वाहतायेत. सगळ्यांचा मुडही तोच आहे. मग आता हे असं सगळं वातावरण असतांना फिल्ममेकर्स तरी का मागे राहतील. ‘रिंगण’ आणि ‘यंग्राड’नंतर राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक मकरंद मानेनं हाच विषय ‘कागर’ या सिनेमात हाताळला आहे. ग्रामीण भागातील राजकारणावर या सिनेमातून भाष्य करण्यात आलंय. पण राजकारण की प्रेमकथा यामध्ये मकरंदची गफलत झाल्यामुळे ‘कागर’ विस्कळीत झाल्यासारखा वाटतो.

‘सैराट’नंतर सगळ्यांची लाडकी आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचा हा दुसरा सिनेमा असल्यामुळेही या सिनेमाची चांगलीच चर्चा होती. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक सोबतीला राष्ट्रीय पुरस्कार विजेती अभिनेत्री असल्यामुळे जास्त अपेक्षा घेऊन तुम्ही हा सिनेमा बघायला जाल तर तुमचा अपेक्षाभंग होईल.

ही गोष्ट आहे विराईनगर गावात राहणाऱ्या राणी(रिंकू)ची. राणीचे वडील गुरुजी (शशांक शेंडे) गावातील प्रथितयश व्यक्तिमत्त्व. गुरुजी गावातील राजकारणाचे महत्त्वाचे सल्लागार असतात. अहो, त्यांच्या हातात सत्तेचा रिमोट कंट्रोल असतो असंच म्हणा ना! राजकारणात येणारे बरेच तरुण गुरुजींना आपला आदर्श मानतात. गुरुजींचा हात आपल्या डोक्यावर असेल, तर नक्कीच आपल्या स्वप्नांचे मनोरे पूर्ण होतील असा जणू त्यांना विश्वासचं असतो. असाच एक महत्त्वाकांक्षी तरुण युवराज(शुभंकर तावडे) गुरुजींना आपला आदर्श मानत असतो.

गावातलं अजून एक मोठं व्यक्तिमत्त्व म्हणजे आबा(सुहास पळशीकर). कधीकाळी आबांचे स्नेही असलेले गुरुजी आता आबांनाच राजकारणाच्या पटलावर आव्हान देतायेत. आबांना आगामी निवडणुकीत शह देण्यासाठी गुरुजी भैय्यासाहेबां(शंतनू गंगावणे)ना पाठिंबा जाहीर करतात आणि इथून सुरु होतो राजकीय शहकाटशहाचा खेळ. यासोबतच राणी आणि युवराजची प्रेमकथाही पुढे सरकत राहते. गावात बदल व्हायला हवा, नव्या नेतृत्वाला संधी मिळायला हवी यासाठी गुरुजी डाव आखायला सुरुवात करतात आणि युवराजला आबांचा काटा काढायला सांगतात. आता युवराजच्या वडिलांची हत्या आबांनीच केली असल्यामुळे युवराजलाही आबांवर सूड उगवायचा असल्यामुळे तो त्यांचा काटा काढायला तयार होतो. पण या सगळ्यादरम्यान अशी काही घटना घडते की, त्यामुळे राणी आणि युवराजचं आयुष्यचं बदलून जातं. आता ती घटना नेमकी काय? युवराज आबांना संपवतो का? गुरुजींनी कोणता डाव मांडलेला असतो, त्यांचा नेमका हेतू काय असतो?, युवराज आणि राणीचं लग्न होतं का? राणीचा राजकारणात शिरकाव कसा होतो? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हवी असतील तर तुम्हाला ‘कागर’ बघावा लागेल.

राजकारणावर आतापर्यंत अनेक चित्रपट आलेत. प्रत्येकानं हा विषय आपापल्यापरीनं चवीनं चघळला आहे. ‘कागर’मध्येही ग्रामीण भागातील राजकारणाचे विविध पैलू दिसतात, परंतू एकूणच या सिनेमात प्रेम आणि राजकारण यामध्ये दिग्दर्शक मकरंदची गफलत झाल्यामुळे सिनेमा विस्कळीत झाला आहे. सिनेमाची सुरुवात मस्त झालीये. मकरंद पुन्हा एकदा काहीतरी वास्तवदर्शी दाखवणार असं आपल्याला वाटू लागतं. पण हळूहळू सिनेमा भरकटत जातो. मध्येच राजकारणाचे डाव-पेच आखले जातात, तर मध्येच प्रेमाचा लपंडाव सुरु होतो. बऱ्याचदा सिनेमात ‘फॅंड्री’ आणि ‘सैराट’ डोकावू लागतो. सिनेमात प्रत्येक गोष्टीचा योग्य ताळमेळ बसवला असता तर एक उत्तम चित्रपट झाला असता.

बरं.. हा चित्रपट बिहारमध्ये घडतोय का तर नाही. हा चित्रपट महाराष्ट्रातील एका गावात घडतोय. मग गुरुजी कितीही पॉवरफुल असले तरी कुठलाही पुढचा मागचा विचार न करता एका चॅनलमधील वरिष्ठ माहिला पत्रकाराला थेट गोळी घालतो, हे अजिबात मनाला पटणारं नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आधीपासूनच या सिनेमासाठी रिंकुला प्रमोट करण्यात आलं. तिचं राणी हे पात्रही खुपच पॉवरफुल होतं. पण या पात्राला योग्य न्याय मिळालेला नाही. आबा आणि गुरुजी वादात चित्रपटात बराच वेळ राणी चित्रपटातून गायब असते. तिच्या पात्राला फारंच कमी वाव दिला गेला आहे. मध्यतरांनंतर लगेचच राणीचं पात्र एकदम पावरफुल बनवण्यात आलंय. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आबा आणि गुरुजी कितीही पावरफुल पात्र असली, तरी त्या गावापुरतीच. मग एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्या(उमेश जगताप)ला त्यांच्यासमोर इतकं हतबल का दाखवलं आहे, हे कल्पनेपलिकडील आहे.

दिग्दर्शकाला हा चित्रपट प्रेमकथा म्हणूनच मांडायचा असल्यामुळे सिनेमाचा शेवटही थोडा ताणल्यासारखा वाटला. जर योग्य ठिकाणी चित्रपट थांबवला असता तर नक्कीच त्याचा प्रभाव चांगला पडला असता. एवढं सगळ्या उणीवा असूनही चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे मकरंदनं चित्रपटाची गती चांगली ठेवलीये. त्यामुळे हा सिनेमा बोर होत नाही. ग्रामीण राजकारणातील बारकावे, तिथली परिस्थिती, युवकांचा राजकारणाच्या पटलावर होणारा सोंगट्यांसारखा वापर उत्तम पध्दतीनं रेखाटण्यात आला आहे.

सिनेमातलं सगळ्यात प्रभावी पात्र म्हणजे गुरुजी. हे पात्र शशांक शेंडे यांनी जबरदस्त वठवलंय. बेरकी, शांत, संयमी आणि तितकाच खतरनाक वाटणारा गुरुजी शशांक यांनी अप्रतिम वठवलाये. सुहास पळशीकरांनी रंगवलेला आबा लाजवाब. शुभंकर तावडेनं रंगवलेला युवराज पहिल्या पात्रात एकदम डॅशिंग दाखवलाये. तर मध्यंतरानंतर रिंकूवर फोकस झाल्यामुळे युवराज हे पात्र डावलल्यासारखं वाटलं. तरीही शुभंकरनं रंगवलेला युवराज लक्षात राहतो. आता बोलुयात रिंकूबद्दल. रिंकूच्या राणीमध्ये सारखी आर्ची डोकावते. राणीचं पात्र प्रचंड सशक्त होतं. मात्र, रिंकू हे शिवधनुष्य पेलण्यात अयशस्वी ठरलीये. रोमॅण्टिक सीन्समध्ये तर रिंकू अवघडलेली वाटली. काही प्रसंगात रिंकूनं बाजी मारलीये, पण तिला अजून मेहनत घेण्याची गरज आहे.

ए.व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी या सिनेमाला संगीत दिलंय. सिनेमातील ‘लागलीया गोडी तुझी’ आणि ‘नागिन डान्स’ मस्त जमून आलंय. ‘नागिन डान्स’ची कोरिओग्राफी भन्नाट झालीये. चित्रपटाच्या शेवटी येणारी कव्वाली मात्र, उगाच घुसवल्यासारखी वाटते. एकूणच काय तर आपल्याला फक्त राजकारणावरचं फोकस करायचा आहे किंवा आपल्याला फक्त प्रेमकथेवरचं फोकस करायचा आहे, हे जर मकरंदनं पक्क केलं असतं तर निश्चितच ‘कागर’ एक उत्तम सिनेमा झाला असता. परंतू मकरंद प्रेमकथा की, राजकारण या द्वंद्वामध्ये अडकल्यामुळे सिनेमा विस्कळीत झाला आहे.

‘टीव्ही 9 मराठी’कडून या सिनेमाला मी देतोय

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI