त्याची जगण्याची इच्छा संपली होती..; भावाच्या निधनाच्या 25 दिवसांनंतर राहुल देवने सोडलं मौन
मुकुल देवने वयाच्या 54 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. निधनापूर्वी आठवडाभर तो आयसीयूमध्ये दाखल होता. त्याला आरोग्याच्या विविध समस्या होत्या, अशी माहिती राहुल देवची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री मुग्धा गोडसेनं दिली होती.

अभिनेता मुकुल देवचं 23 मे रोजी अचानक निधन झालं. या वृत्ताने सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. मुकुलचा मोठा भाऊ आणि अभिनेता राहुल देवने आता या दु:खद घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. राहुलने सांगितलं की, जसं अनेकजण विचार करत होते, तसं मुकुलच्या मृत्यूचं कारण नैराश्य नव्हतं. तर त्याच्या खाण्यापिण्याच्या वाईट सवयी होत्या. निधनाच्या जवळपास आठ दिवस आधी मुकुलला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. डॉक्टरांच्या मते, त्याच्या खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आरोग्यावर वाईट परिणाम झाला होता. इतकंच नव्हे तर निधनाच्या चार-पाच दिवसांपूर्वीच त्याने पूर्णपणे खाणं बंद केलं होतं.
‘टाइम्स नाऊ’ला दिलेल्या मुलाखतीत राहुल त्याच्या भावाविषयी म्हणाला, “मुकुलला खूप एकटेपणा जाणवत होता. त्याची जगण्याची इच्छाच उरली नव्हती, असं वाटत होतं. त्याला मिळणाऱ्या सर्व कामाच्या ऑफर्स तो नाकारत होता. आता वास्तव हळूहळू समोर येत आहे आणि मला माहीत आहे की या वेदना आणखी खोलवर जाणवणार आहेत. मुकुल 2019 मध्ये वडिलांची काळजी घेण्यासाठी दिल्लीला गेला होता. पण त्याच वर्षी वडिलांचं निधन झालं होतं. त्यानंतर 2023 मध्ये आईसुद्धा आम्हाला सोडून गेली. त्यानंतर मुकुलने स्वत:ला कामात व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न केला. तो सतत काहीतरी लिहित असे. पण हळूहळू तो समाजापासून दूर गेला. त्याला त्याच्या मुलीची खूप आठवण येत असे. तो त्याच्या आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नव्हता.”
मुकुल देवच्या निधनानंतर अनेक वृत्तांमध्ये म्हटलं गेलं होतं की तो नैराश्यग्रस्त होता. परंतु हा दावा राहुलने फेटाळून लावला. तो पुढे म्हणाला, “जे लोक आता मुकुलबद्दल बोलत आहेत, ते कधीच त्याच्या संपर्कात नव्हते. त्याची प्रकृती ठीक नव्हती, असा दावा ते करतायत. परंतु त्याने अलीकडेच हाफ मॅरेथॉन पूर्ण केलं होतं. त्याचं वजन निश्चितच वाढलं होतं. परंतु जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:ची काळजी घेत नाही, तेव्हा या गोष्टी दिसू लागतात. मला हे विचारायचं आहे की 2019 ते 2024 दरम्यान मुकुलला भेटायला कोण आलं होतं? रुग्णालयात दाखल झाल्यानंतर कोण भेटायला आलं होतं? त्याला प्रार्थना सभेला कोण उपस्थित होतं?”
