राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात 6 वर्षीय ‘चिमी’ने जिंकली सर्वांची मनं; गेल्या 70 वर्षांत पहिल्यांदाच झालं असं
'नाळ 2' या चित्रपटात चिमीची भूमिका साकारणारी अभिनेत्री त्रिशा ठोसरने राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. सोशल मीडियावरील पोस्टद्वारे तिने आनंद व्यक्त केला आहे. अवघ्या सहाव्या वर्षी त्रिशा इतका मोठा सन्मान स्विकारताना संपूर्ण सभागृहाने उठून टाळ्यांचा कडकडाट केला.

मंगळवारी 23 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. विजेत्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाहरुख खान, राणी मुखर्जी, विक्रांत मेस्सी यांसारख्या कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. तर साऊथ सुपरस्टार मोहनलाल यांना सर्वोच्च दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. या सर्वांत पाच बालकलाकारांनाही विशेष लक्ष वेधून घेतलं. त्रिशा ठोसर, श्रीनिवास पोकळे, भार्गव जगताप, कबीर खंदारे आणि सुकृती वेणी बंद्रेड्डी या बालकलाकारांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यापैकी ‘नाळ 2’ या चित्रपटात चिमीची भूमिका साकारणारी त्रिशा ठोसर जेव्हा मंचावर आली, तेव्हा सर्वांचा चेहरा खुलला. अवघ्या सहाव्या वर्षी तिने हा पुरस्कार आपल्या नावे केला आहे. त्यानंतर त्रिशाच्या इन्स्टाग्राम पेजवर विशेष पोस्ट लिहिण्यात आली.
त्रिशा ठोसरची पोस्ट-
‘कालचा दिवस माझ्या आयुष्यातील खूप मोठा, खास आणि अविस्मरणीय दिवस होता असं मी जाहीर करते. माझ्या ‘नाळ 2′ या चित्रपटातील चिमी या भूमिकेसाठी मला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी इतका मोठा सन्मान स्विकारताना संपूर्ण सभागृहाने उठून टाळ्यांचा कडकडाट केला. माझे आईबाबा आणि आजी-आजोबा एकमेकांना मिठी मारून ढसाढसा रडत होते. टाळ्या वाजवत रडता रडता हसत होते. मी नक्की काय कमावलंय हे मला अजूनही कळलं नाही, फक्त एवढंच माहितीये की या पुरस्कारामुळे माझ्या महाराष्ट्र राज्याचं आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाचं नाव मोठं झालं आहे. आई म्हणत होती, गेल्या 70 वर्षांत झालेल्या राष्ट्रीय पुरस्कारांत वयाने सर्वाधिक लहान असलेली तू पहिली बालकलाकार आहेस,’ अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.

‘माझ्या या यशासाठी माझ्या आईबाबांना, संपूर्ण कुटुंबाला, माझ्या चित्रपटाच्या संपूर्ण टीमला, माझे दिग्दर्शक नागराज मंजुळे सर, ज्यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली ते माझे सगळे ज्येष्ठ परीक्षक आणि ज्यांनी ‘चिमी’ला भरभरून प्रेम दिलं, ते माझे रसिक मायबाप प्रेक्षक.. मी तुम्हा सगळ्यांची शतश: ऋणी आहे. तुम्ही सगळे सोबत आहात म्हणून मी इतक्या लहान वयात इथे येऊन पोहोचलेय. कायम अशीच सोबत राहू द्या. मी यापुढे देखील अशीच जबाबादारीने आणि प्रामाणिकपणे काम करत राहीन,’ असं ती पुढे म्हणाली.
View this post on Instagram
त्रिशाने महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव यांच्यासोबतही काम केलंय. ‘पुन्हा शिवाजीराजे भोसले’ या चित्रपटात तिने भूमिका साकारली होती.
