एका इमोजीने सर्वकाही बदललं; नाग चैतन्यने सांगितला सोभिताच्या पहिल्या भेटीचा किस्सा
सोभिता धुलिपालाशी पहिली भेट कशी झाली, याविषयीचा किस्सा नाग चैतन्यने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सांगितला आहे. गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात या दोघांनी लग्नगाठ बांधली. नाग चैतन्यचं हे दुसरं लग्न आहे.

अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा पूर्व पती आणि दाक्षिणात्य अभिनेता नाग चैतन्यने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात अभिनेत्री सोभिता धुलिपालाशी दुसरं लग्न केलं. समंथाला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्य सोभिताला डेट करू लागला होता. या नात्यामुळे त्याला आणि सोभिताला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत नाग चैतन्यनने सोभितासोबतच्या पहिल्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. या दोघांच्या लव्ह-स्टोरीची सुरुवात कोणत्या चित्रपटाच्या सेटवर नाही तर इन्स्टाग्रामवर झाली होती. एका इमोजीमुळे दोघं एकमेकांच्या संपर्कात आले आणि पुढे त्याचं प्रेमात रुपांतर झालं.
कुठे आणि कशी झाली पहिली भेट?
‘झी 5’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील जगपती बाबू यांच्या ‘जयम्मू निश्चियमु रा’ या टॉक शोमध्ये नाग चैतन्यने हजेरी लावली होती. यावेळी त्याने सांगितलं की इन्स्टाग्राममुळे त्याची आणि सोभिताची भेट झाली होती. “आम्ही इन्स्टाग्रामवर भेटलो होतो. मी कधीच विचार केला नव्हता की, माझ्या पार्टनरला मी इन्स्टाग्रामवर भेटीन. मला तिचं काम माहीत होतं. एकेदिवशी जेव्हा मी शोयूबद्दल (क्लाऊड किचन) एक पोस्ट शेअर केली, तेव्हा तिने कमेंटमध्ये एक इमोजी पोस्ट केला होता. तिथूनच आमच्यात संवाद सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच आम्ही भेटलो.”
View this post on Instagram
“तिच्याशिवाय राहू शकत नाही”
सोभिता ही माझी सर्वांत मोठी ‘सपोर्ट सिस्टिम’ असल्याचंही नाग चैतन्यने या मुलाखतीत सांगितलं. रॅपिड फायर सेगमेंटदरम्यान जेव्हा त्याला विचारलं गेलं की, तो कोणत्या गोष्टीविना राहू शकत नाही? त्यावर नाग चैतन्यने लगेच उत्तर दिलं, ‘सोभिता, माझी पत्नी.’ इतकंच नव्हे तर ‘थांडेल’ या चित्रपटातील एका गाण्यावर सोभिता का चिडली होती, याविषयीचाही त्याने मजेशीर किस्सा सांगितला. “ती ‘बुज्जी तल्ली’ या गाण्यामुळे माझ्यावर नाराज होती. खरंतर हे तिने दिलेलं टोपणनाव आहे. तिला असं वाटलं की दिग्दर्शकांना मी ते चित्रपटात वापरण्याचा सल्ला दिला. त्यामुळे काही दिवस ती माझ्याशी बोलत नव्हती. पण मी असं का करेन”, असा सवाल करत तो हसला.
सोभिता धुलिपाला आणि नाग चैतन्य यांनी 4 डिसेंबर रोजी लग्नगाठ बांधत आयुष्याची नवी सुरुवात केली. हैदराबादमधील अन्नपूर्णा स्टुडिओजमध्ये हा लग्नसोहळा पार पडला होता. हा सर्वांत चर्चेत राहिलेला विवाहसोहळा ठरला आणि त्यामागचं कारणही तसंच होतं. अभिनेत्री समंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिल्यानंतर नाग चैतन्यने हे दुसरं लग्न केलं होतं. समंथा आणि नाग चैतन्य यांचा संसार फक्त चार वर्षेच टिकला होता. ही जोडी इंडस्ट्रीत खूप चर्चेत होती.
