Nana Patekar: नाना पाटेकरांच्या अखेरच्या क्षणांचं गूढ उलगडणार? केअरटेकरच्या जबाबाकडे सर्वांचं लक्ष
Nana Patekar: नाना पाटेकर यांच्या निधनप्रकरणी आता गोवा पोलीस केअरटेकरकडून अधिक माहिती जाणून घेणार आहेत. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत नेमक्या कोणत्या घटना घडल्या, याविषयी ते चौकशी करणार आहेत.

Nana Patekar: ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर त्यांच्या अखेरच्या क्षणांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री अस्वस्थ वाटत असल्याचा मेसेज त्यांनी आपल्या एका मित्राला केला होता. मात्र, मित्राने हा मेसेज पाहिला तोपर्यंत परिस्थिती गंभीर झाली होती. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पाटेकर यांना वाचवण्यासाठी रुग्णालयात डॉक्टरांच्या टीमने जवळपास 45 मिनिटे प्रयत्न केले. मात्र, उपचारांना यश आलं नाही. दरम्यान, त्यांच्या निधनापूर्वी नेमकं काय घडलं, याचा तपास आता गोवा पोलीस करत आहेत. या प्रकरणात नाना पाटेकर यांचे केअरटेकर आणि संबंधित व्यक्तींकडून माहिती घेतली जाणार आहे.
मध्यरात्री 2.30 वाजता मित्राला केला मेसेज
नाना पाटेकर यांच्या निधनापूर्वीच्या घटनाक्रमाबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री साधारण 2.30 वाजताच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. त्यावेळी त्यांनी आपल्या एका मित्राला मेसेज करून तब्येत ठीक नसल्याचं कळवलं होतं. मात्र, त्या वेळी मित्राच्या नजरेस हा मेसेज पडला नव्हता. पहाटे मित्राने मोबाईलवरील मेसेज पाहिला, तेव्हा जराही वेळ न दवडता त्यांनी त्यांच्या घरी धाव घेतली. मात्र, ते घरी पोहोचेपर्यंत नाना पाटेकर यांची प्रकृती अधिकच खालावली होती.
घाम फुटला, जमिनीवर कोसळले
मित्र घरी पोहोचला, तेव्हा नाना पाटेकर यांची अवस्था गंभीर होती. त्यांना मोठ्या प्रमाणात घाम फुटला होता आणि ते जमिनीवर कोसळले होते. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन केअरटेकर आणि मित्राने त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या. यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्यात आली. प्रकृती गंभीर असल्याने प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. त्यामुळे रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरुवात करण्यात आली.
नाना पाटेकर यांना रुग्णालयात नेत असताना त्यांच्यावर सीपीआर देण्यात आला. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, एम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेतानाही सीपीआर सुरू होता. पहाटे साधारण 4.20 ते 4.30 वाजताच्या दरम्यान त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने तातडीने उपचार सुरू केले. त्यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांनी जवळपास 45 मिनिटे सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. मात्र, अथक प्रयत्न करूनही नाना पाटेकर यांना वाचवण्यात यश आलं नाही. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने चित्रपटसृष्टीसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला.
गोवा पोलिसांकडून केअरटेकरची चौकशी
दरम्यान, नाना पाटेकर यांच्या निधनप्रकरणी गोवा पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या केअरटेकरकडून संपूर्ण घटनाक्रम जाणून घेण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत नेमक्या कोणत्या घटना घडल्या, त्यांची प्रकृती कधी बिघडली आणि त्यांना रुग्णालयात कधी नेण्यात आलं, यासंबंधी माहिती गोळा केली जाणार आहे.
