27 वर्षांनी मोठ्या मराठी अभिनेत्याशी ऑनस्क्रीन रोमान्स; ट्रोल होताच म्हणाली..
झी टीव्हीवर 'तुम से तुम तक' ही मालिका नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. यामध्ये शरद केळकर आणि निहारिका चौक्सी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 27 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्याबद्दल निहारिका व्यक्त झाली.

छोट्या पडद्यावरील ‘तुम से तुम तक’ ही मालिका सध्या विशेष चर्चेत आहे. यामागचं कारण म्हणजे या मालिकेतील कलाकारांची जोडी. यामध्ये अभिनेता शरद केळकर आणि निहारिका चौक्सी यांच्या मुख्य भूमिका आहेत. एकीकडे शरद 46 वर्षांचा असून निहारिका फक्त 19 वर्षांची आहे. या दोघांच्या वयातील फरकामुळे प्रेक्षकांनी या मालिकेला ट्रोलसुद्धा केलंय. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निहारिका शरदसोबत काम करण्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाली आहे. या मालिकेत अनु (निहारिका) आणि आर्यवर्धन (शरद) यांच्यातील अनोखं नातं आणि त्यांचा रोमान्स पहायला मिळत आहे.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत निहारिका म्हणाली, “शरद केळकरांसोबत रोमँटिक सीन शूट करताना मला कधीच अनकम्फर्टेबल किंवा संकोचलेपणा वाटलं नाही. मी याआधीही माझ्यापेक्षा 10 ते 15 वर्षांनी मोठ्या अभिनेत्यांसोबत काम केलंय. मी कधीच माझ्या वयाच्या कलाकारांसोबत काम केलं नाही. शरद सरांबद्दल बोलायचं झाल्यास, मला काहीच विचित्र वाटलं नाही. उलट मी कम्फर्टेबल राहावी याची काळजी त्यांनी विशेष घेतली आहे. जेव्हा मी एखादा सीन करते, तेव्हा मी तो अनुच्या दृष्टीकोनातून करते, जी आर्यवर्धनच्या प्रेमात आहे. त्यावेळी मी निहारिकाला व्हॅनिटी व्हॅनमध्येच सोडून येते. त्यामुळे मला कधीच संकोचलेपणा जाणवला नाही.”
View this post on Instagram
यावेळी तिने ट्रोलिंगवरही प्रतिक्रिया दिली. “आधी मला या गोष्टींचा (ट्रोलिंगचा) त्रास व्हायचा. परंतु आता मी हे समजून चुकले आहे की यात मी खरंच काही करू शकत नाही. मी त्यातून फक्त चांगल्या गोष्टी घेऊ शकते आणि त्यावर काम करू शकते. जर लोक वाटेल ते लिहित असतील, तर मी काहीच करू शकत नाही. त्या गोष्टींकडे मी गांभीर्याने पाहत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक कलाकाराला या गोष्टींचा सामना करावा लागतो. जर एखादी व्यक्ती बनावट आयडी वापरून माझ्या पेजवर लिहित असेल तर त्याची पर्वा मी का करावी? जर निर्माते किंवा कामाशी संबंधित लोकांनी काही म्हटलं, तर त्यावर मी काम करू शकते”, असं ती म्हणाली.
