6 ऑस्कर जिंकलेल्या Dune चित्रपटाचं भारत कनेक्शन; नमित मल्होत्रा यांची अभिमानास्पद कामगिरी!

6 ऑस्कर जिंकलेल्या Dune चित्रपटाचं भारत कनेक्शन; नमित मल्होत्रा यांची अभिमानास्पद कामगिरी!
Oscar winner Dune india connection
Image Credit source: Twitter

हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94वा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा पार पडला. कलाविश्वातील हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. 'अँड द ऑस्कर गोज टू..' हे शब्द आयुष्यात एकदा तरी कानावर पडावेत, असं स्वप्न असंख्य कलाकारांचं असतं. याच पुरस्कार सोहळ्यात यंदा 'ड्युन' (Dune) या चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा पुरस्कार पटकावले.

स्वाती वेमूल

|

Mar 29, 2022 | 2:21 PM

हॉलिवूडमधील डॉल्बी थिएटरमध्ये 94वा ऑस्कर (Oscar 2022) पुरस्कार सोहळा पार पडला. कलाविश्वातील हा अत्यंत प्रतिष्ठित पुरस्कार मानला जातो. ‘अँड द ऑस्कर गोज टू..’ हे शब्द आयुष्यात एकदा तरी कानावर पडावेत, असं स्वप्न असंख्य कलाकारांचं असतं. याच पुरस्कार सोहळ्यात यंदा ‘ड्युन’ (Dune) या चित्रपटाने एक-दोन नव्हे तर तब्बल सहा पुरस्कार पटकावले. या सायन्स फिक्शन चित्रपटाला एकूण 10 नामांकनं मिळाली होती. त्यापैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्स, सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफर, सर्वोत्कृष्ट साऊंड, सर्वोत्कृष्ट ओरिजिनल स्कोअर, सर्वोत्कृष्ट फिल्म एडिटिंग आणि सर्वोत्कृष्ट प्रॉडक्शन डिझाइन या सहा विभागांमध्ये ‘ड्युन’ने बाजी मारली. या सहा विभागांपैकी सर्वोत्कृष्ट व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी (VFX) मिळालेल्या ऑस्कर पुरस्काराचं भारताशी विशेष कनेक्शन आहे. ज्या कंपनीने ‘ड्युन’मधील व्हिज्युअल इफेक्ट्सचं काम केलं, त्या कंपनीचं नेतृत्व भारतीय व्यक्ती करते. नमित मल्होत्रा (Namit Malhotra) असं त्यांचं नाव आहे.

नमित मल्होत्रा हे DNEG कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी

DNEG असं या कंपनीचं नाव असून नमित मल्होत्रा हे त्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जगातील आघाडीच्या व्हिज्युअल इफेक्ट्स कंपन्यांपैकी एक ही कंपनी आहे. त्यांनी याआधी ‘एक्स मशीना’, ‘इंटरस्टेलर’, ‘फर्स्ट मॅन’, ‘ब्लेड रनर 2049’ आणि ‘टेनेट’ या चित्रपटांसाठी ऑस्कर पुरस्कार पटकावला आहे. DNEG या कंपनीनं अवतार, स्टार वॉर्स, हॅरी पॉटर, डार्क नाईट रायडर्स, डंकर्क या अनेक गाजलेल्या चित्रपटांचं VFX केलंय. ड्युनच्या व्हिज्युअल इफेक्टसाठी ऑस्कर जिंकणाऱ्या टीममध्ये पॉल लॅम्बर्ट, ट्रिस्टन मायल्स, ब्रायन कॉनर आणि गर्ड नेफ्झर यांचा समावेश आहे.

बॉलिवूड निर्माते नरेश मल्होत्रा यांचे पुत्र आणि सिनेमॅटोग्राफर एम.एन. मल्होत्रा यांचे नातू

DNEG ही कंपनी आधी ‘डबल निगेटिव्ह्स’ म्हणून ओळखली जात होती. यूके-आधारित एका कंपनीचा ते भाग होते. 2014 मध्ये मल्होत्रा यांनी ही कंपनी विकत घेतली. नमित मल्होत्रा हे बॉलिवूड निर्माते नरेश मल्होत्रा यांचे पुत्र आणि सिनेमॅटोग्राफर एम.एन. मल्होत्रा यांचे नातू आहेत. नमित यांच्या आजोबांनी 1953 मध्ये ‘झांसी की रानी’ या चित्रपटाची निर्मिती केली होती तर त्यांच्या वडिलांनी बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना घेऊन ‘शेहनशाह’ हा चित्रपट बनवला होता. नमित यांनी वडील आणि आजोबांच्या पुढे एक पाऊल टाकत हॉलिवूडमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

मंत्री अनुराग ठाकूर यांचं ट्विट

‘ड्युन’ला व्हिज्युअल इफेक्ट्ससाठी ऑस्कर जाहीर होताच जगभरातून चित्रपटाच्या टीमवर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. “एव्हीजीसी (ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि कॉमिक्स) क्षेत्रात भारत आघाडीवर आहे. आम्ही आमच्या नवनवीन कल्पना आणि प्रतिभेसह जागतिक स्तरावरील मागण्या पूर्ण करण्यासाठी सज्ज आहोत,” असं भारताचे माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर ट्विटद्वारे म्हणाले.

डेनिस विलेन्युव्ह दिग्दर्शित ड्युन हा चित्रपट अमेरिकन लेखक फ्रँक हर्बर्टच्या 1965च्या त्याच नावाच्या कादंबरीवर आधारित आहे. यामध्ये टिमोथी शालमेट, झेंडाया, ऑस्कर आयझॅक, जेसन मोमोआ आणि रेबेका फर्ग्युसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘ड्युन’ला मिळालेले ऑस्कर पुरस्कार-

बेस्ट साऊंड- मॅक रुथ, मार्क मंगिनी, थियो ग्रीन, डग हेम्फिल आणि रॉन बार्टलेट
बेस्ट ओरिजिनल स्कोअर- हॅन्स झिमर
बेस्ट एडिटिंग- जो वॉकर
बेस्ट प्रॉडक्शन डिझाइन- पॅट्रिस वर्मेट
बेस्ट सिनेमॅटोग्राफी- ग्रेग फ्रेझर

हेही वाचा:

Rakh: मराठमोळ्या संदीप पाठकचा कॅनडामध्ये डंका

‘मी चुकलो..’; ऑस्कर पुरस्कार सोहळ्यानंतर विल स्मिथचा जाहीर माफिनामा

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें