‘पंचायत’ फेम अभिनेत्याने 21 दिवसांत सोडली ही वाईट सवय; हृदयविकाराच्या लक्षणांनंतर बदलली लाइफस्टाइल
'पंचायत' या गाजलेल्या वेब सीरिजमध्ये 'दामाद जी'ची भूमिका साकारणारा अभिनेता आसिफ खानला गेल्या महिन्यात रुग्णालयात दाखल करावं लागतं होतं. हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणं जाणवल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रुग्णालयातून बाहेर पडल्याच्या 21 दिवसांत त्याने धूम्रपानाला कायमचा रामराम केला आहे.

‘पंचायत’ या लोकप्रिय वेब सीरिजमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता आसिफ खान गेल्या काही दिवसांपासून त्याच्या आरोग्यामुळे चर्चेत आहे. या सीरिजमध्ये आसिफने ‘दामाद जी’ची भूमिका साकारली आहे. जून महिन्यात त्याला हृदयविकाराच्या झटक्यासारखी लक्षणं जाणवल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता त्याने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट दिली आहे. आसिफने त्याच्या आयुष्यातील अशा एका गोष्टीला कायमचा रामराम केला आहे, ज्याचं व्यसन बहुतेकांना सोडायचं असतं. 21 दिवसांत स्मोकिंग म्हणजेच धूम्रपान पूर्णपणे सोडल्याची माहिती त्याने दिली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारी जगभरात ‘फ्रेंडशिप डे’ साजरा केला जातो. यानिमित्ताने आसिफने इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहित तब्येतीविषयीची माहिती दिली.
आसिफची पोस्ट-
‘लोक म्हणतात की 21 दिवसांत चांगली-वाईट सवय सुटते. मी धुम्रपान सोडून आज 21 दिवस पूर्ण झाले. आज फ्रेंडशिप डे आहे, त्यामुळे मी माझ्या मित्रांवर किती प्रेम करतो, हे सांगण्यासाठी आजच्यापेक्षा दुसरा चांगला दिवस असूच शकत नाही. आयुष्यात चढउतार येतच असतात. वर चढताना तुमच्यासोबत एक घोळका असतो, परंतु उताराच्या वेळी जे सोबत राहिले, त्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. आपल्या चुकांची जाणीव होण्यासाठी, योग्य लोकांना ओळखण्यासाठी कोणाच्या हॉस्पिटलच्या बेडवर जाण्याची प्रतीक्षा करू नका. या मोठमोठ्या शहरांच्या मोठमोठ्या गोष्टींमध्ये हरवू नका. तुमचा साधेपणा तुमच्यासोबत कायम राहू द्या. चहावर जगा, लोकांकडे पाहून ब्लॅक कॉफीवर जाऊ नका. मित्रमैत्रिणींना रोज भेटा. आयुष्याचे सौदे 20-30 रुपयांच्या गोष्टीशी करू नका (सिगारेटचा इमोजी)’, असं त्याने लिहिलंय.
View this post on Instagram
यासोबतच आसिफने रुग्णालयातील स्वत:चे काही फोटो शेअर केले आहेत. परंतु हे फोटो जुने असल्याचंही त्याने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलंय. ‘मी आता आधीपेक्षा तंदुरुस्त आणि निरोगी आहे. रुग्णालयातील हे फोटो जुने आहेत. मी सध्या माझ्या घरीच आहे’, असं त्याने म्हटलंय.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आसिफने स्पष्ट केलं होतं की त्याला हृदयविकाराचा झटका आला नव्हता. तर gastroesophageal reflux मुळे त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं होतं. “मला लक्षणं हार्ट अटॅकसारखी वाटली होती, परंतु मी पूर्णपणे फिट आहे”, असं त्याने म्हटलं होतं.
