Pankaj Dheer : पंकज धीर यांच्या निधनाच्या काही तास आधी मुलाकडून ‘क्रिप्टिक’ पोस्ट शेअर
ज्येष्ठ अभिनेते पंकज धीर यांचं वयाच्या 68 व्या वर्षी कॅन्सरने निधन झालं. त्यांच्या निधनाच्या काही तास आधी मुलगा निकितीन धीर याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक पोस्ट शेअर केली होती. निकितीनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Pankaj Dheer death : बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या गाजलेल्या मालिकेत कर्णची भूमिका साकारलेले अभिनेते पंकज धीर यांचं निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. पंकज यांच्या निधनाच्या काही तास आधी त्यांचा मुलगा आणि अभिनेता निकितीन धीर याने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केलेली पोस्ट आता चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये शंकराच्या फोटोसह एक संदेश लिहिण्यात आला आहे.
निकितीन धीरची पोस्ट-
‘जे काही येतं, त्याला येऊ द्या. जे काही राहतं, त्याला राहू द्या. जे काही निघून जातंय, त्याला जाऊ द्या. एक शिवभक्त म्ङणून ‘शिवार्पणम’ असं म्हणून आयुष्यात पुढे निघा. तो सर्व गोष्टींची काळजी घेईल. – हे करणं खूप कठीण आहे’, असं त्यावर लिहिलं आहे. निकितीन आणि त्याचे कुटुंबीय शिवभक्त आहेत. वडिलांप्रमाणेच त्यानेसुद्धा पौराणिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत निकितीनने रावणाची भूमिका साकारली होती. पंकज यांच्या निधनानंतर निकितीनची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

पंकज यांनी एकदा कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली होती. परंतु काही महिन्यांपूर्वी त्यांना पुन्हा कॅन्सरने ग्रासलं होतं. त्यासाठी त्यांच्यावर सर्जरीसुद्धा करण्यात आली होती. पंकज यांची दुसऱ्यांदा कॅन्सरशी झुंज अयशस्वी ठरली. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.
पंकज धीर यांनी आजवर अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलंय. परंतु बी. आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ या मालिकेतल्या कर्णाच्या भूमिकेनं त्यांना विशेष लोकप्रियता मिळवून दिली. शिवाय ‘चंद्रकांता’मधील त्यांच्या शिवदत्तच्या भूमिकेवरही प्रेक्षकांनी भरभरून प्रेमाचा वर्षाव केला. ‘बढो बहू’, ‘युग’, ‘द ग्रेट मराठा’, ‘अजूनी’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी काम केलंय. याशिवाय ‘सोल्जर’, ‘तुमको ना भूल पाएंगे’, ‘रिश्ते’, ‘अंदाज’, ‘सडक’ आणि ‘बादशाह’सारख्या चित्रपटांमध्येही ते झळकले. मुंबईतील विलेपार्ले इथल्या स्मशानभूमीत संध्याकाळी 4.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पंकज यांच्या निधनावर CINTAA नेही शोक व्यक्त केला आहे. पंकज हे CINTAAचे माजी जनरल सेक्रेटरी होते.
