पंकज धीर यांना अखेरचा निरोप देताना मुलाला अश्रू अनावर; सलमान खानने सावरलं
अभिनेते पंकज धीर यांचं बुधवारी निधन झालं. गेल्या काही काळापासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. बुधवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मुलगा निकितीन धीर भावूक झाला होता. अभिनेता सलमान खानने त्याला मिठी मारत सावरण्याचा प्रयत्न केला.

ऐंशी-नव्वदच्या दशकात लोकप्रिय असलेल्या ‘महाभारत’ या मालिकेत कर्णाच्या भूमिकेतून नावारुपाला आलेले अभिनेते पंकज धीर यांचं बुधवारी (15 ऑक्टोबर) निधन झालं. ते 68 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर बुधवारी संध्याकाळी विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा अभिनेता निकितीन धीर आणि परिवार आहे. गेल्या काही दिवसांपासून ते कॅन्सरशी झुंज देत होते. त्यांच्यावर दोन शस्त्रक्रियाही झाल्या होत्या आणि ते कॅन्सरमधून बरेही झाले होते. मात्र गेल्या काही दिवसांत पुन्हा त्यांचा आजार बळावला. अखेर बुधवारी त्यांचा हा संघर्ष कायमचा थांबला.
पंकज धीर यांना अखेरचा निरोप देण्यासाठी कलाविश्वातून अनेक मंडळी उपस्थित होते. त्यांच्या अंत्यविधीचे काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खानसुद्धा तिथे उपस्थित होता. सलमान हा निकितीनचा खूप चांगला मित्र आहे. याशिवाय सिद्धार्थ मल्होत्रा, पुनीत इस्सार, हेमा मालिनी, मिका सिंह आणि मुकेश ऋषीसुद्धा तिथे हजर होते. वडिलांच्या निधनानंतर निकितीन खूप खचला होता. भावूक होत त्याने मित्र सलमानला मिठी मारली. आणखी एका व्हायरल फोटोमध्ये तो आईला मिठी मारत त्यांना सावरण्याचा प्रयत्न करताना दिसला. तर अभिनेता कुशल टंडनने निकितीनसोबतच पंकज धीर यांच्या पार्थिवाला खांदा दिला.
View this post on Instagram
पंकज धीर यांनी 1981 मध्ये ‘पूनम’ या हिंदी चित्रपटातून अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. मात्र अभिनेता म्हणून त्यांना खरी ओळख 1988 मध्ये दूरचित्रवाहिनीवर आलेल्या ‘महाभारत’ या मालिकेनं मिळवून दिली. त्यांनी साकारलेली सूर्यपूत्र कर्णाची भूमिका लोकप्रिय ठरली. ‘चंद्रकांता’, ‘द ग्रेट मराठा’, ‘युग’, ‘झी हॉरर शो’, ‘कानून’, ‘ससुराल सिमर का’ अशा मालिकांमधूनही त्यांनी काम केलं. तर ‘बादशाह’, ‘सडक’, ‘सनम बेवफा’, ‘सोल्जर’, ‘अंदाज’, ‘जमीन’, ‘टार्झन- द वंडर कार’ अशा चित्रपटांमध्येही ते झळकले होते.
पंकज यांचा मुलगा निकितनसुद्धा कलाविश्वात कार्यरत आहे. त्याने ‘चेन्नई एक्स्प्रेस’मध्ये थंगबलीची भूमिका साकारली होती. निकितनेही त्याच्या वडिलांप्रमाणेच पौराणिक मालिकांमध्ये काम केलंय. ‘श्रीमद् रामायण’ या मालिकेत त्याने रावणाची भूमिका साकारली होती. त्याची पत्नी म्हणजेच पंकज यांची सून कृतिका सेंगरसुद्धा अभिनेत्री आहे.
