PM Modi 75th Birthday: मोदींच्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडकडून खास भेट; पहा व्हिडीओ
PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त बॉलिवूडकडून त्यांना एक खास भेट देण्यात आली. हे भेट म्हणजे एक देशभक्तीपर गाणं आहे. शंकर महादेवन यांच्या आवाजात हे गाणं रेकॉर्ड करण्यात आलं आहे.

PM Modi 75th Birthday: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त संगीतकार-गायक शंकर महादेवन आणि गीतकार प्रसून जोशी यांनी एकत्र येऊन एक खास देशभक्तीपर गाणं त्यांना समर्पित केलं आहे. ‘वंदनीय है देश मेरा’ असं या गाण्याचं शीर्षक असून शंकर महादेवन यांच्या आवाजात ते रेकॉर्ड करण्यात आलं आहे. तर प्रसून जोशी यांनी गाण्याचे बोल लिहिले आहेत. देशभक्ती आणि राष्ट्राप्रती अभिमान व्यक्त करणारं हे गाणं टी-सीरिजच्या बॅनरखाली लाँच करण्यात आलं आहे. ‘आज किसी ने नील गगन पर फिर से सूर्य सजाया है, युगो युगो बाद देश का संविधान लहराया है’ असे या गाण्याचे बोल आहेत.
या गाण्याच्या व्हिडीओमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हातात राष्ट्रध्वज घेऊन चालताना, देशाच्या नागरिकांना संबोधित करताना, आरती करताना दिसत आहेत. मोदींच्या कार्यकाळात पार पडलेल्या मोठमोठ्या कामगिरींची दृश्येही यात पहायला मिळत आहेत. ऑपरेशन सिंदूर, अयोध्येतील राम मंदिर, चांद्रयान मोहीम 3 यांसारख्या ऐतिहासिक क्षणांचा व्हिडीओत समावेश करण्यात आला आहे. ‘वंदनीय है देश मेरा’ हे गाणं मोदी आणि त्यांच्या सरकारच्या कामगिरीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात देशाच्या विविध संस्कृती आणि प्रदेशांची झलकही दिसते. युट्यूबवर या गाण्याला चांगलीच पसंती मिळतेय.
पहा गाणं-
मोदींच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावरही शुभेच्छांचा वर्षाव होतोय. बॉलिवूड, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टी आणि टेलिव्हिजन क्षेत्रातील सेलिब्रिटींनीही सोशल मीडियावर पोस्ट लिहित मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मोदींच्या दूरदृष्टीचं आणि नेतृत्व कौशल्याचं त्यांनी कौतुक केलं आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मध्य प्रदेशातील धार इथं त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. याठिकाणी ती सेवा पखवाडाची सुरुवात करणार आहेत. या कार्यक्रमात त्यांचा खास पोशाखसुद्धा पहायला मिळाला.
मोदींच्या वाढदिवसानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांमध्ये देश-विदेशातील मान्यवराकडून पंतप्रधानांना शुभेच्छा देण्याचं नियोजनही करण्यात आलं आहे. त्याचप्रमाणे ‘चलो जीते है’ हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट देशभरातील शाळांमध्ये आणि काही चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात येणार आहे.
