मुस्लीम कुटुंबाची सून झाल्यानंतर अभिनेत्रीने नाकारली कोट्यवधींची कामसूत्र जाहिरात; मिळत होतं 8 पट अधिक मानधन
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ही अभिनेत्री तिच्या लग्नाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली. मुस्लीम कुटुंबात लग्न केल्यानंतर चित्रपटसृष्टी सोडावी लागली, असंही तिने सांगितलं. परंतु तिचं हे लग्न फार काळ टिकू शकलं नाही.

अभिनेत्री पूजा बेदीने लग्नानंतर चित्रपटसृष्टीत काम करणं बंद केलं. याबद्दल तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ती मोकळेपणे व्यक्त झाली. सांस्कृतिक अपेक्षा आणि रुढीवादी मुस्लीम कुटुंबाशी जळवून घेताना काही ठिकाणी त्याग करावा लागल्याचं तिने सांगितलं. पूजा बेदीने उद्योगपती फरहान फर्निचरवालाशी लग्न केलं होतं. नवीन कुटुंबात सर्वांचा मान राखण्यासाठी आणि आपल्याला सर्वांनी स्वीकारावं यासाठी तिने जाणीवपूर्ण अभिनयातून माघार घेण्याचा निर्णय घेतला. “मी एका रुढीवादी मुस्लीम कुटुंबातून आलेल्या फरहानशी लग्न केलं. त्याचे कुटुंबीय सेटवर जाणाऱ्या सुनेला स्वीकारतील, असं या पृथ्वीवर घडणार नव्हतं”, असं पूजाने सांगितलं.
नव्वदच्या दशकात फिल्म इंडस्ट्रीत अफेअर्सचे गॉसिप होऊ लागले की एखाद्या अभिनेत्रीला सून म्हणून स्वीकारणं अनेक कुटुंबीयांसाठी कठीण व्हायचं, असं पूजा म्हणाली. “त्या काळात फिल्म इंडस्ट्रीविषयी बरेच गॉसिप व्हायचे. जेव्हा जेव्हा एखादा चित्रपट प्रदर्शित व्हायचा, तेव्हा त्यातील हिरो-हिरोइनच्या अफेअरच्या चर्चा व्हायच्या. आपोआप त्यांची नावं एकमेकांशी जोडली जायची. त्यानंतर पूर्ण ड्रामा व्हायचा. त्यामुळे चित्रपटात काम करणाऱ्या सुनेला ते स्वीकारतील, असा कोणताही मार्ग नव्हता. त्या काळात जर तुम्ही लग्न केलं, तर त्यानंतर तुम्हाला चित्रपटात काम करताच यायचं नाही. आज तसं होत नाही. ‘सेक्सी बहु’ किंवा ‘सेक्स सिम्बॉल बहु’ असा ठपका पडला तर ते सहनच व्हायचं नाही”, असा खुलासा पूजाने केला.
View this post on Instagram
लग्नानंतर पूजाने अनेक चित्रपटांमधून माघार घेतली. “मी माझ्या करिअरचा खूप विचार केला. जर मला एखादी गोष्ट करायची असेल, तर ती मी चांगलीच आणि पूर्ण आदराने करेन, असा माझा विचार होता. त्याच्या कुटुंबातील लोकांना मला पाहून कोणताच संकोचलेपणा वाटू नये, याची मी काळजी घेत होते. त्यामुळे दोनच पर्याय होते. एकतर लग्नच करू नका, कारण त्यानंतर गोंधळ निर्माण होणारच किंवा मग तुम्ही त्या दुसऱ्या विश्वाला आपलंसं करा आणि फिल्म इंडस्ट्री सोडून द्या. मी दुसरा पर्याय निवडला आणि सर्व प्रोजेक्ट्सची साइनिंग रक्कम परत केली. त्यावेळी मी कामसूत्राच्या जाहिरातीलाही नकार दिला. त्यासाठी मला आठ पट जास्त रक्कम मिळत होती”, असं पूजाने पुढे सांगितलं.
पूजा आणि फरहान यांचा घटस्फोट झाला असून त्यांना अलाया आणि ओमर ही दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतरही पूजा आणि फरहान यांच्यात मैत्रीपूर्ण नातं कामय आहे. फरहानने नंतर त्याच्या बालमैत्रिणीशी दुसरं लग्न केलं.
