एक एण्ट्री अन् सगळं बिघडलं; ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चा धमाकेदार ट्रेलर
'पुन्हा एकदा साडे माडे तीन' हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये अशोक सराफ, मकरंद अनासपुरे, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, रिंकू राजगुरू आणि संजय नार्वेकर यांच्या भूमिका आहेत.

कुरळे बंधू पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत आणि यावेळी गोंधळ, गैरसमज आणि धमाल अधिकच वाढलेली दिसतेय. ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चात आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून ही गोष्ट लक्षात येते की हा चित्रपट फक्त हसवणारा नाही, तर शेवटपर्यंत उत्सुकता टिकवून ठेवणारा आहे. या ट्रेलरमध्ये रतन, मदन आणि चंदन यांच्या आयुष्यात सतत काही ना काही विचित्र घडताना दिसतंय. कधी परिस्थिती पूर्णपणे हाताबाहेर जाते, कधी गैरसमजांचा गुंता वाढतो, तर कधी बबनची खट्याळ एण्ट्री सगळंच गणित बदलून टाकते. वेगवेगळ्या स्वभावांची चार माणसं एकत्र आली की, काय काय घडू शकतं, याची भन्नाट झलक या ट्रेलरमधून पहायला मिळते.
याच गोंधळात रिंकू राजगुरूची एण्ट्री विशेष लक्ष वेधून घेते. ती नेमकी कोण आहे, ती त्यांच्या आयुष्यात का आली आहे आणि तिच्या येण्याने सगळेच इतके अस्वस्थ का झाले आहेत, याचं थेट उत्तर ट्रेलर देत नाही. त्यामुळेच तिच्या भूमिकेबाबत एक कुतूहल निर्माण होतं. ही एण्ट्री योगायोग आहे की, एखाद्या मोठ्या वळणाची सुरुवात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणारं आहे. ट्रेलरमधील विनोदाचा टेम्पो जबरदस्त आहे. संवादांचा अचूक टाइमिंग, प्रसंगांची गंमत आणि कलाकारांमधील केमिस्ट्रीमुळे ट्रेलर एक क्षणही कंटाळवाणा वाटत नाही. बबनचा खोडकरपणा, मदनचा विनोदी अंदाज, चंदनची निरागसता आणि रतनचा ताठर स्वभाव हाच गोंधळ या ट्रेलरचा आत्मा आहे.
पहा ट्रेलर
View this post on Instagram
चित्रपटाबद्दल दिग्दर्शक अंकुश चौधरी म्हणाला, ”’पुन्हा एकदा साडे माडे तीन’ हा चित्रपट म्हणजे निव्वळ विनोद नाही, तर माणसांच्या स्वभावातून, परिस्थितीतून आणि अचानक घडणाऱ्या प्रसंगांतून निर्माण होणाऱ्या गोंधळाची धमाल गोष्ट आहे. ट्रेलरमध्ये प्रेक्षकांना जी मजा, गडबड आणि हास्य दिसतंय, त्यापेक्षा अनेक पटींनी मोठा अनुभव चित्रपटात मिळणार आहे. प्रत्येक पात्राची एक वेगळी ओळख आहे आणि ती एकमेकांवर आदळली की, जी मजेशीर साखळी तयार होते, ती मोठ्या पडद्यावर अनुभवण्यासारखी आहे.”
अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत रिंकू राजगुरूची भूमिका या गोंधळात नेमकं काय वळण आणते, हे पाहणं प्रेक्षकांसाठी नक्कीच रंजक ठरणार आहे. तसंच संजय नार्वेकर हेसुद्धा यात पाहुणे कलाकार म्हणून झळकणार आहेत.
