शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्यानंतर राहुल सोलापूरकरांची दिलगिरी; म्हणाले “लाच हा शब्द..”
अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल ते एका मुलाखतीत बोलत होते. यावेळी त्यांच्या आग्र्याच्या सुटकेचा प्रसंग सांगताना सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं, त्यावरून तीव्र प्रतिक्रिया आल्या होत्या.

अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. आग्र्याहून सुटका करून घेण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्याही पेटाऱ्यांचा वापर केला नव्हता, तर त्यांनी चक्क औरंगजेबाच्या सरदारांना लाच दिली होती, असं ते एका पॉडकास्ट मुलाखतीत म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याचा विविध स्तरांतून निषेध व्यक्त झाला. अनेक राजकीय नेत्यांनी त्यावरून तीव्र प्रतिक्रिया दिल्या. या सर्व वादाच्या पार्श्वभूमीवर सोलापूरकर यांच्या पुण्याच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. यानंतर आता त्यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. एक व्हिडीओ जारी करत सोलापूरकर यांनी आपली भूमिका सविस्तरपणे मांडली आहे.
राहुल सोलापूरकरांकडून दिलगिरी व्यक्त
“जवळपास दीड-दोन महिन्यांपूर्वी रीमा अमरापूरकर यांच्या एका पॉडकास्टवर मी 50 मिनिटांची मुलाखत दिली होती. त्यातल्या एका प्रश्नाचं उत्तर देताना मी इतिहासातल्या काही रंजक गोष्टी कशा बनतात, यावर बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत काही गोष्टी बोललो. बिकानेरच्या राजवाड्यातील काही पुरावे, राजस्थानची काही कागदपत्रे, फारसी-उर्दू अशा ग्रंथांमधल्या तरतुदी आणि औरंगजेबाच्या जवळच्या माणसांच्या काही गोष्टी या वाचायला आणि अभ्यासायला मिळाल्या होत्या. त्यातल्याच काही गोष्टींवर बोलताना महाराजांनी कुणाला रत्ने दिली, कुणाला पैसे दिले आणि इतर काय काय केलं याबाबत मी सांगत होतो. या सगळ्या गोष्टींचं एकत्रीकरण करताना महाराजांनी औरंगजेबाच्या इतर लोकांना कशी पद्धतीने आपल्या बाजूने वळवून घेतलं आणि कशी स्वत:ची सुटका करून घेतली, हे मी सांगताना लाच हा शब्द वापरला. साम-दाम-दंड-भेद अशा चारही पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची स्वत:ची सुटका करून घेतली हे मला सांगायचं होतं”, असं ते म्हणाले.
“शिवराय हे फार मोठे राज्यकर्ते होऊन गेले याविषयी मला वेगळं काही सांगायची गरज नाही. किंबहुना छत्रपती राजर्षी शाहू महाराजांची भूमिका मी अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडली होती. अत्यंत नेकीनं हा सगळा इतिहास अभ्यासून, तसंच वंदनीय, पूजनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची अनेक व्याख्यानं मी जगभर अनेक वर्षे जेवढा माझा अभ्यास आहे, त्याप्रमाणे देण्याचा प्रयत्न करत असतो. जगभरातील लोकांनी ते वाखाणलेलं आहे. त्यामुळे छत्रपत शिवरायांचा अवमान करण्याचं माझ्या मनातही येऊ शकत नाही. कुणीतरी त्या पॉडकास्टमधली दोन वाक्ये काढून महाराजांनी लाच दिली असं हा बोलला असं म्हणून त्यावरून गदारोळ उठवण्याचा प्रयत्न केला”, अशा शब्दांत सोलापूरकरांनी आपली बाजू मांडली.




याविषयी दिलगिरी व्यक्त करत ते पुढे म्हणाले, “माझं यावर प्रामाणिक सांगणं आहे की, यात महाराजांचा अवमान करण्याचा माझा नखभरदेखील हेतू नव्हता. पण लाच या शब्दामुळे शिवभक्त, शिवप्रेमी नाराज झाले असतील, तर मी दिलगिरी व्यक्त करतो. मी छत्रपतींचं गुणगान गातच मोठा झालोय. गड-किल्ल्यांवर मी वाढलोय. मी रायगडावरचा माहितीपट त्यासाठीच केला होता. त्यामुळे यावरून उगाच महाराष्ट्रात गदारोळ उठवू नका. तुम्ही म्हणाल तर मी यापुढे छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर काही बोलणारच नाही. लाच हा शब्द महाराजांसाठी अजिबात नव्हता.”
छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सोलापूरकर काय म्हणाले होते?
“छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून सुटले, मिठाईचे पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन महाराज आले आणि त्यासाठी किती हुंडा वटवल्या आहेत, याचेसुद्धा पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजिराला आणि त्याच्या बायकोलासुद्धा महाराजांनी लाच दिलेली आहे. मोहसिन खान का मोईन खान नाव आहे बहुतेक त्याचं.. त्याच्याकडून अधिकृत शिक्क्याचे परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद पाच हत्ती घेऊन शेवटचे गेले, त्याच्या परवान्याची अजूनही खूण सुद्धा आहे. लोकांना गोष्टी रुपात सांगताना काहीतरी रंजक करून सांगावं लागतं. मग ती रंजकता आली की इतिहासाला छेद दिला जातो किंवा बाजूला टाकला जातो,” असं ते एका मुलाखतीत म्हणाले होते.