पाकिस्तानचा उदो-उदो करणाऱ्या राखी सावंतला भारतातून हाकला; मनसे आक्रमक
अभिनेत्री राखी सावंत सध्या तिच्या एका व्हिडीओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडीओत ती 'जय पाकिस्तान' अशी घोषणा देताना दिसतेय. त्याचप्रमाणे मी पाकिस्तानी लोकांच्या बाजूने आहे, असं तिने म्हटलंय. याविरोधात मनसे आक्रमक झाली आहे.

‘ड्रामा क्वीन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान तणावाचं वातावरण असताना राखीने या व्हिडीओमध्ये चक्क पाकिस्तानचा जयघोष केला आहे. “मी पाकिस्तानी लोकांसोबत आहे, जय पाकिस्तान” असं तिने म्हटलंय. यावरून सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त होत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही राखी सावंतला जोरदार विरोध केला आहे. “राखी सावंतने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर स्वत:चं नाव आणि पैसा कमावला आहे. आज ही बाई पाकिस्तानचा उदो उदो करतेय,” अशी टीका मनसे कार्यकर्ता अनिश खंडागळे यांनी केली.
सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओमध्ये राखी म्हणते, “नमस्कार, मी राखी सावंत, मी सत्य बोलेन आणि सत्याशिवाय काहीही बोलणार नाही. मी पाकिस्तानच्या लोकांसोबत आहे, जय पाकिस्तान.” तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. राखी सावंतने पाकिस्तानला जावं, असं एकाने म्हटलंय. तर पाकिस्तानी कलाकारांप्रमाणेच राखी सावंतवरही बंदी आणा, तिला बॉयकॉट करा.. असं दुसऱ्याने लिहिलंय. दहशतवादी हल्ल्या इतक्या निष्पाप लोकांचे प्राण गेले तरी राखीचा ड्रामा सुरूच आहे.. अशीही टीका नेटकऱ्यांनी केली.
View this post on Instagram
राखीच्या या व्हिडीओबद्दल मनसे कार्यकर्ते अनिश खंडागळे म्हणाले, “व्हायरल व्हिडीओमध्ये या बाई म्हणतायत की, पाकिस्तानवालों.. मैं तुम्हारे साथ हूँ. आता मी त्या देशाचं नाव पण घेऊ इच्छित नाही. भारत-पाकिस्तानदरम्यान इतका तणाव असताना या बाई आपल्या विरोधी देशाचं नाव घेत आहेत आणि त्याचा विजय असो असं म्हणतायत. मी राखी सावंतचा जाहीर निषेध करतो. राखीने भारतात राहून इथल्या प्रेक्षकांच्या जीवावर नाव गमावलं, पैसा कमावला. आता ती पाकिस्तानचा उदो-उदो करतेय. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात म्हटलंय की मी प्रथमत: भारतीय आणि अंतिमत: सुद्धा भारतीय. मला राखी सावंतने उत्तर द्यावं की, तुम्ही प्रथमत: भारतीय आहात, मग अंतिमत: तुम्ही कोण आहात? मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि पंतप्रधानांना विनंती करतो की अशा व्यक्तीला भारतातून हाकललं पाहिजे, जेणेकरून अशी लोकं भारतात राहून, भारतामध्ये मोठं होऊन, पैसा कमवून पाकिस्तानचा उदो-उदो करणार नाहीत.”
