Tukaram Mundhe: अनेक कंपन्यांच्या नाकीनाऊ आणलंय..; ‘रामायण’च्या सुनील लहरींचं तुकाराम मुंढेंबद्दल खास आवाहन
'रामायण' या मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारलेले अभिनेते सुनील लहरी यांनी नुकताच एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये ते एफडीएचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविषयी बोलताना दिसत आहेत.

Tukaram Mundhe: महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे सध्या रिअल लाइफमधील ‘सिंघम’ म्हणून ओळखले जात आहेत. तुकाराम मुंढे यांनी 25 मे 2026 रोजी महाराष्ट्र FDA आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली त्यानंतर अवघ्या 100 दिवसांत त्यांनी राज्यभरात 904 ठिकाणी छापेमारी केल्या. या कारवाईदरम्यान 457 जणांना अटक करण्यात आली. खाद्यपदार्थांमधील भेसळ, स्वच्छतेचा अभाव, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमधील अस्वच्छता, खाद्यपदार्थांच्या ठिकाणी आढळणारी घाण तसंच अन्नसुरक्षा नियमांचं उल्लंघन याविरोधात त्यांनी मोठ्या प्रमाणात मोहीम सुरू केली. त्यांच्या या कारवाईचं देशभरातून कौतुक होत आहे. आता ‘रामायण’ मालिकेत लक्ष्मणाची भूमिका साकारणारे अभिनेते सुनील लहरी यांनीही तुकाराम मुंढे यांच्याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.
सुनील लहरी सध्या टेलिव्हिजनच्या दुनियेत फारसे सक्रिय नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून ते अनेकदा महत्त्वाच्या विषयांवर आपलं मत व्यक्त करताना दिसतात. नुकताच त्यांनी तुकाराम मुंढे यांच्याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सुनील लहरी म्हणाले, “आज मी आपल्यासमोर अशा एका व्यक्तिमत्त्वाबद्दल बोलू इच्छितो, ज्यांनी आपल्या देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात स्ट्रीट फूड विक्रेत्यांपासून मोठमोठ्या रेस्टॉरंट चेनपर्यंत, सरकारी कॅन्टीन, फूड प्रोसेसिंग कंपन्या, फूड मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या आणि काही औषध कंपन्यांचीही झोप उडवली आहे.”
पहा व्हिडीओ-
एक ऐसी शख़्सियत जिसने कुछ गलत करने वाले लोगों की नाक में दम करके रखा है और जिसे महाराष्ट्र सरकार का पूरा समर्थन है उन्हें और सरकार को नमन🙏 pic.twitter.com/ahjP6j1qvB
— Sunil lahri (@LahriSunil) September 7, 2026
“होय, तुम्हाला कदाचित समजलं असेल. तुम्ही त्यांचं नाव ऐकलं असेल. मी महाराष्ट्र FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याबद्दल बोलत आहे. मी त्यांना आणि महाराष्ट्र सरकारला सलाम करतो, जे त्यांना पूर्णपणे पाठिंबा देत आहेत,” असं ते पुढे म्हणाले. सुनील लहरी यांनी यावेळी तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी देशभरातील प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक विभागात असावेत, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ते म्हणाले, “संपूर्ण भारतात प्रत्येक राज्यात आणि प्रत्येक विभागात मुंढे यांच्यासारखा प्रामाणिक, समर्पित आयुक्त असता तर आपला देश खूप लवकर पुन्हा ‘सोने की चिडिया’ बनला असता. कारण सर्वजण निरोगी, आनंदी आणि समृद्ध राहतील.” सुनील लहरी यांच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
