तोंड बंद ठेवा..; ऐश्वर्या रायवरून नेटकऱ्यांवर का भडकल्या रेणुका शहाणे?
अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांच्या एका मुलाखतीमुळे चर्चेत आल्या आहेत. या मुलाखतीत त्या ऐश्वर्या रायवरून नेटकऱ्यांवर भडकल्या होत्या. हे नेमकं प्रकरण काय आहे, नेटकऱ्यांवर त्या इतक्या का चिडल्या.. त्याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात..

अभिनेत्री रेणुका शहाणे त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे अनेकदा चर्चेत असतात. विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर ते बेधडकपणे आपली मतं मांडत असतात. रेणुका यांची एक मुलाखत सध्या सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ‘झूम’ वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्या त्यांच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल मोकळेपणे व्यक्त झाल्या. या मुलाखतीत त्यांनी अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि शाहरुख खान यांच्याबद्दल असं काही वक्तव्य केलंय, ज्याची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. ऐश्वर्या रायला ‘कान्स फेस्टिव्हल’मधील रेड कार्पेट लूकवरून बरंच ट्रोल करण्यात आलं होतं. वाढलेल्या वजनावरून अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. याच बॉडी शेमिंगवर आता रेणुका शहाणे यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे.
“इतक्या वर्षांपासून तिने या इंडस्ट्रीत जे काही मिळवलंय, त्याचा आपण आनंद साजरा करू शकत नाही का? तुमच्यासोबतचा करार मोडायला मोठ्या कंपनीला एक मिनिट लागत नाही. पण ती गेल्या कित्येक वर्षांपासून त्या कंपनीची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. दरवर्षी ती भारताचं तिथे प्रतिनिधित्व करते. आपण विचार करतो की, अरे तिने घातलेले कपडे चांगले नव्हतं. तिने असं करायला पाहिजे नव्हतं. जर तुम्ही एखाद्याबद्दल काही चांगलं बोलू शकत नसाल, तर कृपया आपलं तोंड बंद ठेवा. अभिनेत्यांपेक्षा अभिनेत्रींवर प्रचंड दबाव आणि ताण असतो. हल्ली सोशल मीडियामुळे वेगळंच विश्व तयार झालंय. कहरच झालाय, खरंच.. इतका ताण घेऊन जगणं आणि लोकांच्या मतांचा इतका सामना करणं कठीण आहे. अभिनेत्रींसाठी तर हे अधिकच तणावाचं आहे”, असं त्या म्हणाल्या.
याच मुलाखतीत रेणुका शहाणे यांनी शाहरुख खानसोबत काम करण्याचा अनुभव सांगितला. “आम्हाला त्याचा खूप अभिमान आहे. आपल्या कामाशी पूर्णपणे प्रामाणिक राहणारा तो कलाकार आहे. कामापुढे त्याला वेगळं काहीच दिसत नाही. सेटवर तो 100 नाही तर 200 टक्के समर्पण भावनेनं काम करतो. अगदी पहिल्या दिवसापासून मी त्याचा कामाप्रती असलेला हा अॅटिट्यूड बघत आले आहे”, अशा शब्दांत त्यांनी शाहरुखचं कौतुक केलं.
