रितेश देशमुखचा ‘राजा शिवाजी’ पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट; ‘अंगावर अक्षरश: काटा..’

Raja Shivaji : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी रितेश देशमुखचा 'राजा शिवाजी' हा चित्रपट सहकुटुंब पाहिला. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे.

रितेश देशमुखचा राजा शिवाजी पाहिल्यानंतर रोहित पवारांची पोस्ट; अंगावर अक्षरश: काटा..
Rohit Pawar on Raja Shivaji
Image Credit source: Instagram
| Updated on: May 03, 2026 | 12:36 PM

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनीत ‘राजा शिवाजी’ हा चित्रपट 1 मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्यगाथेवर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळतोय. यामध्ये रितेशने छत्रपती शिवाजी महाराजांची मुख्य भूमिका साकारली असून त्यात बॉलिवूड आणि मराठी कलाविश्वातील दमदार कलाकारांची मोठी फौज पहायला मिळतेय. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीसुद्धा सहकुटुंब हा चित्रपट पाहिला. त्यानंतर त्यांनी एक्स (ट्विटर) अकाऊंटवर पोस्ट लिहिली आहे. ‘महाराजांचं वैभव, खडतर संघर्ष, जबरदस्त युद्धदृश्य आणि भावनिक खोली असलेला हा चित्रपट पाहणाऱ्याचं अगदी मन जिंकतो,’ असं त्यांनी म्हटलंय.

काय म्हणाले रोहित पवार?

‘रयतेचं स्वराज्य निर्माण करण्यासाठी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी बारा बलुतेदार आणि अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र आणून स्वाभिमानाने लढायला शिकवलं आणि त्यांचा हाच थरारक संघर्ष माझे मित्र आणि अभिनेते रितेश जी देशमुख यांनी ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर आणला आहे. सहकुटुंब हा चित्रपट बघितला. ‘राजा शिवाजी’ हे नावंच इतकं ताकदीचं आहे की, त्यासाठी पूर्ण बॉलिवूड एकत्र आलं आणि एक अद्भुत असा चित्रपट तयार झाला. अजय-अतुल या मराठमोळ्या जोडीने दिलेलं संगीत आणि अभिनेते रितेश देशमुख यांच्यासह संजय दत्त, अभिषेक बच्चन आदी सर्वांच्याच ताकदीच्या भूमिकांनी जणू महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची गाथा रचली आणि देदिप्यमान इतिहास पुन्हा एकदा जिवंत केला,’ असं रोहित पवार यांनी लिहिलं आहे.

या पोस्टमध्ये त्यांनी पुढे म्हटलंय, ‘या चित्रपटातील अनेक प्रसंग पाहताना अंगावर अक्षरशः काटा येतो आणि ज्या संघर्षातून महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते पाहून छाती अभिमानाने फुलून येते. महाराजांचं वैभव, खडतर संघर्ष, जबरदस्त युद्धदृश्य आणि भावनिक खोली असलेला हा चित्रपट पाहणाऱ्याचं अगदी मन जिंकतो. महापुरुषांनी केलेला संघर्ष आपण अनेक पुस्तकात वाचलाय पण या चित्रपटाच्या निमित्ताने महाराजांचा संघर्ष अनुभवायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच संघर्षशील इतिहासातून प्रेरणा घेऊन आज देशासाठी खऱ्या अर्थाने संघर्ष करण्याची आणि त्यासाठी दुसऱ्याच्या घरात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याची वाट न पाहता प्रत्येकानेच महाराजांच्या भूमिकेत उतरून संघर्ष करण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे. ही प्रेरणा तुम्हाला या चित्रपटातून नक्की मिळेल, त्यासाठी प्रत्येकाने चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट आवर्जून पहावा.’

‘राजा शिवाजी’ने शनिवारी 10.55 कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. तर पहिल्याच दिवशी 11.35 कोटी रुपयांची कमाई झाली होती. त्यामुळे दोन्ही दिवसांच्या कमाईचा आकडा हा 21.90 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. राजा शिवाजी या चित्रपटासोबतच बॉक्स ऑफिसवर आमिर खानचा मुलगा जुनैद याचा ‘एक दिन’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. मात्र रितेशच्या चित्रपटावर या बॉक्स ऑफिस टक्करचा फारसा परिणाम झाला नाही.

Follow Us